इगतपुरीनामा विशेष : ही वेळ चुकलीच…!

भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा

इगतपुरी तालुका भयानक अशा कोरोना संकटाला सामोरे जात असतांना ज्या पोटतिडकीने लोकांना साहाय्य करायला हवं त्या आस्थेने ते होत नसल्याचं दुर्दैव आहे. काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक कोरोना काळात पायाला भिंगरी लावून कोरोनाशी दोन हात करायला सदैव पुढेच आहेत. अशा वातावरणात नागरिक सुद्धा भयप्रद परिस्थितीला तोंड देत आहेत. मात्र काही लोकांनी ह्या मदत कार्यामध्ये पुढे येण्याऐवजी अन्य राजकीय कामांना प्राधान्य दिल्याने त्यांच्या पुढच्या भवितव्याचा विचार होणे अत्यंत साहजिक आहे. ज्यांच्या शक्तीमुळे आपण जन माणसात काम करतो अशा जनतेला डावलून स्वतःचे स्थान बळकट करण्याचे अनेकांचे प्रयत्न आहेत. असे असतांना चुकीची वेळ निवडून ती वेळ चांगली असल्याचा भ्रम बाळगणाऱ्यांची प्रतिमा मात्र लोकांमध्ये बिघडली म्हणावे लागेल.
गेल्या वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात कोरोनामुळे अनेकानेक स्थित्यंतरे झाली आहेत. आदिवासी अतिदुर्गम असणारा हा तालुका ह्यावर्षी मात्र कोरोनाने चांगलाच होरपळून निघाला आहे. चांगल्या व्यक्ती, कर्ते पुरुष आणि गरीबांच्या घरातील व्यक्तींना करकचून आवळणारा कोरोना आपलं उग्र स्वरूप धारण करतोय. इगतपुरी तालुक्यावरचे हे अभूतपूर्व संकट आहे. ह्या संकटाला तोंड देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील काही मोजक्या व्यक्ती लोकांच्या सोबत हाताला हात देऊन काम करताहेत. अपुरा ऑक्सिजन, अपुरे बेड, इंजेक्शन, दिलासा, अर्थसहाय्य आणि महत्वाचा दिलासा देण्याचे काम करून रुग्णसेवा करीत आहेत. अद्यापही ह्या मदत कार्यात ज्यांची स्थिती चांगली आहे असे अनेक लोक “नॉट रिजेबल” झालेले आहेत.

संकटग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याऐवजी अशी दूरदूर राहणारी मंडळी आता आपला मूळ धर्म निभावण्यात धन्यता मानीत आहेत. त्यामुळे त्यांची वेळ निश्चितपणे चुकली असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल. एकतर मदतीच्या जगापासून दोन हात दूर असतांना साधा कोणाला दिलासा न देणारे काही लोक अन्य कारणांसाठी सक्रिय झाल्याने त्यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. काय करावे अन काय नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी ज्या जनतेच्या जीवावर आपण काम करतो त्या जनतेसाठी आपलं काही उत्तरदायित्व आहे की नाही ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थाने विचार केला तर अजूनही काही फार वेळ गेली नाही. अजूनही जागे होऊन इगतपुरी तालुक्यातील जनतेसाठी ह्या संकटकाळात मोठ्या ताकदीने पुढे येऊन होणाऱ्या चर्चांवर संबंधितांनी पडदा टाकला पाहिजे.
अन्य कोणी जितके मदतकार्य करताहेत त्यांच्याही पेक्षा जास्त ताकदीने मदतीच्या मैदानात उतरून जनमानसातील आपले स्थान बळकट करणे आवश्यक आहे. ह्या काळात ज्यांच्याकडून मदतीच्या अपेक्षा आहेत असे सन्माननीय लोक संपर्काच्या बाहेर असल्याने लोकांनीच अपेक्षा सोडून दिली होती. पण आता ह्या मदत कार्यात साहाय्य करण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ आपण चुकवली तर मात्र लोकांच्या मनातलं आदराचं स्थान मात्र गमावून बसल्याशिवाय गत्यंतर नाही. आपलं लोकांप्रती असलेलं उत्तरदायित्व दाखवून देण्यासाठी संपर्काबाहेर असणाऱ्यांनी तरी वेळ चुकवू नये अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Similar Posts

3 Comments

 1. avatar
  SIDDHARTH SAPKALE says:

  माऊली खरं आहे.. यासाठी मात्र इगतपुरीतील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना मदतीसाठी निधी जमवत आहेत…. त्याचा इगतपुरीतील सर्व बांधवांसाठी निश्चितच उपयोग होईल….

 2. avatar
  बाप्पा गतिर says:

  अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. ज्यांच्या जीवावर आपण सत्ता भोगत आहोत त्याचे भान राहू द्या.

 3. avatar
  D.D.DHONGADEpatil says:

  हे ‘फोदे’ जन्मजात असेच निष्क्रिय, स्वार्थी आहेत. त्यांच्याकडून तशा फारश्या अपेक्षा नव्हत्याच..

  पण दुःख याचे आहे की आमची अज्ञान जनता बावळटपणा सोडून जागे होत नाहीये..

Leave a Reply

error: Content is protected !!