विविध स्पर्धा परीक्षा लेखमाला आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे

संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांची फौज तयार झाली असे स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी सुप्रसिद्ध आहेत. आपल्या इगतपुरीनामा वेब पोर्टलवर त्यांचे विविध मार्गदर्शक उपयुक्त लेख प्रसिद्ध झालेले आहेत. राज्यासह मराठी भाषिक असणाऱ्या हजारो ज्ञानपिपासू विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेखातून मार्गदर्शन मिळवले आहे. तथापि लेखमालेचे वाचन करतांना निर्माण झालेल्या सर्वांच्या मनातील प्रातिनिधिक प्रश्नांचे उत्तर सुद्धा मिळणे अत्यावश्यक असल्याने ह्या लेखात प्रश्नांची उत्तरे देत आहोत. यापूर्वी प्रसिद्ध झालेले लेख हवे असल्यास कॉमेंट मध्ये संपर्क करावा.

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

स्पर्धा परीक्षांची लेखमाला
इगतपुरीनामा न्यूज पोर्टलवर दि. १५ ते ३० एप्रिल २०२१ या काळात स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या विविध संधी यावर  १५ पेक्षा जास्त लेख प्रकाशित झालेत. यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा व अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी, या परीक्षांचे स्वरूप, अभ्यास घटकांवर चर्चा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, मानसिक तयारी इत्यादी अनेक विषयांवर लेखन करून सर्वांगीण मार्गदर्शन केले गेले.

लेखमालेचे उदंड स्वागत
महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, पालक, जिज्ञासू वाचकांनी लेखांचे वाचन केल्यानंतर फोन करुन अभिनंदन केले. तसेच या संदर्भात अनेक प्रश्न सुद्धा विचारले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखमालेचे उदंड स्वागत झाले.

विद्यार्थांच्या शंका
विद्यार्थी, पालक यांनी आपल्या मनातील शंका, अडचणी, प्रश्न, पात्रता, प्रवेश परीक्षा, वयोमर्यादा, अभ्यासक्रमाचे स्वरूप, परीक्षांची तयारी करताना येणाऱ्या अडचणी आदी संदर्भात प्रश्न विचारले. लेखामध्ये मोबाईल नंबर दिल्यामुळे अनेकांचे फोन आलेत. हेच प्रश्न संपर्क केला नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे देखील आहेत. या प्रश्न उत्तराचा उपयोग निश्चितच विद्यार्थी व पालकांना होईल. अतिशय लहान लहान प्रश्न असतात. परंतु विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्ग दिसत नाही. योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थी निश्चितच पुढे जातात. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तरे देत आहे.

प्रश्न १ : इयत्ता १२ वी नंतर राज्य सेवा पूर्व परीक्षा देता येते का ?
उत्तर : नाही. पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। परंतु इयत्ता १२ वी ला असताना या परीक्षेच्या तयारीला, अभ्यासाला सुरुवात केल्यास केव्हाही चांगले.

प्रश्न २ : SET व NET परीक्षेला बसण्यासाठी वयाची अट आहे का ?
उत्तर :  SET व NET परीक्षेला वयाची अट नाही. मात्र JRF साठी खुल्या वर्गातील उमेदवारांना २८ वर्षे व मागासवर्गीय विद्यार्थी व सर्व खुल्या आणि मागासवर्गीय महिलांसाठी ३३ वर्षे ही अट आहे.

प्रश्न ३ : स्पर्धा परीक्षांसाठी रोज किती वेळ अभ्यास करणे आवश्यक आहे ?
उत्तर : योग्य नियोजन, अभ्यासाची चांगली तयारी असल्यास रोज चार ते पाच तास अभ्यासासाठी देणे गरजेचे आहे.

प्रश्न ४ : स्पर्धा परीक्षांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडविल्यास फायदा होतो का ?
उत्तर : कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गेल्या ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविल्यास निश्चितच फायदा होतो. प्रश्न कसा विचारला जातो ? प्रश्नाचे स्वरूप कसे असते ?कोणत्या घटकांवर प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात ? वेळेचे नियोजन, अभ्यास घटकांसाठी किती तयारी करायची ? इत्यादी कितीतरी प्रश्नांसाठी याचा उपयोग होतो.

प्रश्न ५ : माझे शिक्षण मराठी भाषेतून झाले आहे. स्पर्धा परीक्षेला याची अडचण येईल का ?
उत्तर : मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असले तरी स्पर्धा परीक्षा देताना कोणतेही अडचण येत नाही हे लक्षात घ्या. माध्यमाची भीती मनातून काढून टाका.

प्रश्न ६ : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वर्तमानपत्रांचे वाचन करणे आवश्यक आहे का ?
उत्तर : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चालू घडामोडी या अभ्यास घटकांच्या तयारीसाठी वृत्तपत्रांचे वाचन महत्त्वाचे ठरते. वृत्तपत्रातील अग्रलेख, दैनंदिन घडणाऱ्या घटनांवरील लेख, दिनविशेषावरील लेख याच्या वाचनामुळे एक दृष्टी प्राप्त होते. विकसित होते. भाषेवरील प्रभुत्व वाढविण्यासाठी मदत होते. राज्य, राष्ट्र,आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्याची चांगली तयारी करता येते. हे महत्त्वाचे आहे. यासाठी वृत्तपत्रांचे वाचन गरजेचे होय.

प्रश्न ७ : शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते का ?
उत्तर : होय. करता येते। स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी दुसरे शिक्षण घेत नाही. परंतु हे चुकीचे आहे. उलट दुसरे शिक्षण आपण घेतो म्हणजेच अभ्यास करतो. या अभ्यासाचा, लेखनाचा, वाचनाचा स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितच उपयोग होतो.

थोडक्यात हे आणि असेच अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांनी विचारले आहेत. त्यातील महत्त्वाचे व सर्वांना उपयोगी पडतील अशा प्रातिनिधिक प्रश्नांचा याठिकाणी विचार केला आहे. विद्यार्थ्यांना निश्चितच याचा उपयोग होईल. प्रसिद्ध झालेल्या सर्व लेखमालांची लिंक हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये ई-मेल आयडी अथवा मोबाईल नंबर दिल्यास पाठवता येणे शक्य होईल.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

4 Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    प्रश्न उत्तराच्या या शृंखलेतुन बरेच प्रश्नाचे उत्तरे मिळाली. अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे.

  2. avatar
    विलास जोपळे says:

    स्पर्धा परीक्षा काय असतात,त्याची तयारी करताना घ्यावयाची काळजी, इ. गोष्टी बद्दल.निर्माण होणारे प्रश्न याचे सविस्तर.उत्तर आपल्या लेखांमधून मिळत असतात. त्याचा नक्कीच अनेकांना फायदा होईल.धन्यवाद,!

Leave a Reply

error: Content is protected !!