वाकी बिटुर्ली येथील समता महिला ग्रामसंघाकडून मतदान जनजागृतीसाठी पुढाकार : २१ महिला बचत गटाच्या महिलांनी नोंदवला सहभाग

इगतपुरीनामा न्यूज – लोकशाही बळकटीसाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. ह्या कर्तव्याची जाणीव ठेवून नागरिकांनी मतदान करणे काळाची गरज आहे. हे सिद्ध करीत स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ वाकी बिटुर्ली येथील समता महिला ग्रामसंघाने मतदान जनजागृती अभियानात पुढाकार घेत मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचे महत्व पटवून दिले. यात २१ गटांच्या महिलांनी सहभाग नोंदवून मतदार राजाचे लक्ष वेधले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या महिला बचत गटांना जगण्यासाठी रोजगार मिळत असून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. यामध्ये गावच्या ग्रामसेविका ज्योती केदारे  ह्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम बघत महिलांना मतदानाचा आपला हक्क असल्याचे सांगितले. मतदान हे दान नसून आपले कर्तव्य आहे. आपल्या विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे हे मतदारांच्या मनावर बिंबवले. यावेळी विविध उपक्रम राबवित मतदान जनजागृती केली. बचत गटाच्या बीएम दीपाली वाघ, प्रभागाचे सीसी रणजित धाडसे, आयसीआरपी सविता रामनाथ कडाळे, ग्रामसेविका ज्योती केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत जल, पृथ्वी, आकाश,अग्नी, वायू या पंचतत्वाचे प्रसार करत मतदार बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला होता. महिला ग्रामसंघाने राबविलेल्या जनजागृती अभियानाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. ग्रामसंघाच्या महिलांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी परिश्रम घेतले. या मतदान जनजागृती अभियानासाठी ग्रामसंघाच्या अध्यक्षा द्वारका संदीप कुंदे, उपाध्यक्ष वनिता पांडुरंग काळे, कोषाध्यक्ष आशा कैलाससिंग परदेशी, लिपिक विद्या रमेशसिंग परदेशी, आशासेविका लीना युवराजसिंग परदेशी, अंगणवाडी सेविका अनिता दोरे, आशा सेविका संगिता चंद्रमोरे आदी महिला उपस्थित होत्या.

Similar Posts

error: Content is protected !!