कोरोना आजाराच्या पायऱ्या, अवस्था, सतर्कता, काळजी, लक्षणे, टेस्टस, उपचार पद्धती, अनुभव, मार्गदर्शन आदी विषयांवर आपल्या सर्वांना अत्यंत अनुभवी माहिती आणि मार्गदर्शन करताहेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कि. गोरे…! अंतिम भाग ३
मार्गदर्शक : डॉ. अविनाश कि. गोरे
वैद्यकीय अधिकारी, ( बालरोगतज्ञ )
ग्रामीण रुग्णालय, घोटी
ता.इगतपुरी, जि. नाशिक
संपर्क : ७९७२४२६५८५
वाचकांसाठी लेखाचा भाग १ – https://igatpurinama.in/archives/1636
वाचकांसाठी लेखाचा भाग २ – https://igatpurinama.in/archives/1652
■ ह्या सर्व पायऱ्यांमधून जातांना केवळ आणि केवळ डॉक्टर, त्यांची टीम, त्यांचा स्टाफ, त्यांचे biomedical engineer, ह्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे सर्व पेशन्ट्स लोकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. यासह स्टाफला सहकार्य करणे आवश्यक आहे. अस्पष्ट, संशयास्पद भूमिका, डॉक्टरांवर दाब-दबाव, दमदाटी, आरोप अशा क्षुल्लक गोष्टी कुठल्याही नातेवाईकांनी करायची गरज नाही. त्यामुळे उलट डॉक्टरांना व त्यांच्या सहकाऱ्यांना त्रासाशिवाय काही मिळत नसते. उलट तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे येथे गरजेचे असते.
■ लहान मुलांमध्ये सहसा अजून तरी गंभीर आजाराचे स्वरूप जास्ती करून पाहायला भेटत नाही. परंतु बऱ्याच बालकांमध्ये लक्षणे खूपच सौम्य असतात. अशा वेळी त्यांच्या पालकांनी त्यांच्या बालरोग तज्ञाकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्यावा.
क्वचित काही बालकांना ऍडमिट करण्याची पण वेळ येऊ शकते. त्यावेळी पण काय करायचे अन् काय करायचे नाही हे सर्व त्या त्या डॉक्टरांवर सोपवणे योग्य ठरेल.
■ कोरोनानंतर तुम्हाला किमान १५ दिवस ते १ महिना अंगात अशक्तपणा, खोकला, थकवा जाणवू शकतो. तो Post Covid राहू शकतो. तो तुमच्या आहाराने, तुमच्या आरामाने, डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसीन्सनी घालवता येतो. बरेच डॉक्टर तुम्हाला ( पोस्ट कोव्हीड ) होऊन गेल्यानंतर काही मेडिसीन्स देतील ती मेडिसीन्स तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी काटेकोरपणे घ्यायला हवी. त्यांत स्टिरॉइड्स, रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या, अँटिबायोटिक्स, Physiotherapy आदी गोष्टी असतात.
■ तुम्हांला ऍडमिट करायचे की नाही ? त्याची गरज आहे की नाही हे सर्व ठरवण्याचा अधिकार डॉक्टरांना द्यावा. जिथे शक्य असेल तिथे तुमच्या वेटिंग लिस्टनुसार ऍडमिट व्हावे. सरकारी रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, खाजगी कोव्हीड सेंटर्स ग्रामीण रुग्णालये, CCC, DCHC, DCH अशी रुग्णालये तालुका, जिल्ह्यात कार्यरत आहेत. आपण ज्या आरोग्याच्या गंभीर समस्येला तोंड देतोय. याचे कारण आपल्याकडे आरोग्य ह्या व्यवस्थेवर सुरुवातीपासून केलेले, झालेले दुर्लक्ष, उदासीन भावना जबाबदार आहे. आपल्याला हॉस्पिटल, डॉक्टर, त्यांचा स्टाफ याचे महत्व आज समजत आहे. पण हे उशिरा सुचतंय हे आपले दुर्दैव आहे. त्यामुळेच आपल्याला आज हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शन रेमडेसीविर,डॉक्टरांची, इतर स्टाफची कमतरता जाणवत आहे. आज सर्वत्र अभूतपूर्व अशी परिस्थिती उदभवली आहे. त्याची झळ सर्वांना पोहचत आहे. ह्या झळीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने जगण्याचा, जीवन सुसह्य करण्याच्या प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या सोयीने जिथे जमेल तिथे त्या त्या उपलब्ध हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा.
■ आपल्याला येणाऱ्या अडचणी ह्या आपल्या जवळच्या लोकांना सांगाव्यात. त्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. त्यांतील बऱ्याच गोष्टी ह्या स्वतःच्या स्वतःला सोडवायच्या असतात. ह्या गोष्टीची गाठ मनात पक्की बांधून ठेवा म्हणजे पुढच्या गोष्टी सहन करणे सोपे जाईल ( वैयक्तिक मत ). त्यामुळे आपला मार्ग आपण काढत राहावा. ह्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला जितकी शक्य आहे तितकी मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहेत हे लक्षात ठेवावे.
■ डॉक्टरांना पण जीवन असते, कुटुंब असते. त्यांना पण अशा जोखमीच्या ठिकाणी काम करणे कठीण असते. त्यांच्या जीवाला पण धोका असतो. ह्याचे भान वेळोवेळी ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
■ घरांत कुणाला पण अशीच लक्षणे आढळून आली तर वरीलप्रमाणे सारखीच पद्धती अवलंबावी पुढे करावी व त्यांना पण ह्या कचाट्यातून बाहेर काढण्यास मदत करावी.
■ सरकारने दिलेल्या सूचनेनुसार लसीकरण करून घ्यावे. याबाबत वेळोवेळी काही अडचण असल्यास जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
■ सर्वांनी न्यूज मिडिया, सोशल मीडिया आणि नकारात्मक ( negative ),बातम्यांपासून काही काळ दूर राहावे. याने मानसिकरित्या तुम्ही थोडे विचलित होऊ शकता जे की चांगले नाहीये.
■ कोव्हीड झाला म्हणून स्वतःच्या मनाला वाईट वाटून अजिबात घ्यायचे नाही. कसा आला, कुठून आला आदी विचार करण्यात तथ्य नाही. कारण ही दुसरी लाट आहे. खूप वेगाने आणि कळत-नकळतपणे ही पसरत आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या पुढच्या उपचाराकडे आणि विलगीकरनाकडे लक्ष देणे गरजेचे असते.
■ यामध्ये मला परत एकदा पंचसूत्रीचे अनुकरण करायला विसरू नका असे सांगणे योग्य वाटते। वारंवार हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, लक्षणे असतील तर टेस्टिंग करून घेणे व वेळीच स्वतःला विलग करणे. ( समाप्त )
टीप : वरील लेख हा मी केवळ माझ्या आतापर्यंतच्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे लिहिला आहे. ह्यामध्ये बऱ्याच अर्थी शास्त्रीय दृष्टिकोन आहे. कुणाची पण भावना दुखवायचा हेतू नाहीये. डॉक्टर्स आणि नॉन -मेडिकोज ह्या दोहोंसाठी पण आहे. सामान्य जनतेच्या मनातील संभ्रम दूर करणे. त्यांना आजाराची, उपचाराची थोडी विस्तृत माहिती देणे, कुठे काय पावलं उचलायची, डॉक्टरांचे मनोबल, कार्यक्षमता उंचावणे हाच उद्देश आहे. लेखावर कमेंट करून तुम्ही तुमची शंका माझ्या ब्लॉगवर, फेसबुकवर, ह्या पोर्टलवर विचारू शकता. लेखाच्या आधीच्या भागांसाठी मोबाईलवर संपर्क करावा.
– डॉ. अविनाश कि. गोरे