आश्रमशाळेतील शिक्षकांनी घेतले इंटरनेटच्या स्मार्ट वापराचे धडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – आदिवासी विकास विभाग नासिक प्रकल्प कार्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता कक्ष अंतर्गत शिक्षकांचे चार दिवसीय एज्युफेस्ट ( शिक्षण परिषद ) घेण्यात आले. ह्या एज्युफेस्टसाठी नाशिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांमधील जवळपास ५०० पेक्षा जास्त शिक्षकांना इंटरनेट वापरा विषयीचे धडे देण्यात आले. यावेळी विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा मुंढेगाव येथे इयत्ता पहिली ते चौथी आणि अनुदानित आश्रम शाळा वाघेरा ता. त्र्यंबक येथे इयत्ता पाचवी ते सातवीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या प्रशिक्षणात जीमेल आयडी तयार करणे, मेल पाठविणे, मेलला उत्तर देणे, गुगल ड्राइवर फोल्डर तयार करणे, ड्राईव्हवर फोटो, फाईल कसे अपलोड करायचे, फोल्डर मेलच्या माध्यमातून आणि लिंकच्या माध्यमातून कशा पद्धतीने सहज शेअर करता येईल आधीचे प्रशिक्षण देण्यात आले.

शेवटच्या सत्रात माझे शैक्षणिक प्रयोग यामध्ये शिक्षकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणाला सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रल्हाद भोई यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्ताराधिकारी नामदेव भांगरे, संजय कापडणीस, खंडू भोये, संदीप चंदनशिवे, धम्मानंद गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवून प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे विषयमित्र दिपाली आहेर आणि ज्योती पाटील यांनी चार दिवसीय प्रशिक्षणात सर्व प्रशिक्षकांना सविस्तर असे मार्गदर्शन करून इंटरनेटचे धडे दिले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी मुंढेगाव येथील मुख्याध्यापक तनवीर जहागीरदार, वाघेरा येथील मुख्याध्यापक नितीन पवार, संदीप चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Similar Posts

error: Content is protected !!