कोरोनाशी सामना करतांना..! भाग १

कोरोना आजाराच्या पायऱ्या, अवस्था, सतर्कता, काळजी, लक्षणे, टेस्टस, उपचार पद्धती, अनुभव, मार्गदर्शन आदी विषयांवर आपल्या सर्वांना अत्यंत अनुभवी माहिती आणि मार्गदर्शन करताहेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कि. गोरे…! भाग १

मार्गदर्शक : डॉ. अविनाश कि. गोरे
वैद्यकीय अधिकारी, ( बालरोगतज्ञ )
ग्रामीण रुग्णालय, घोटी
ता.इगतपुरी, जि. नाशिक
संपर्क : ७९७२४२६५८५

आज महाभयंकर कोरोनाने जगाला घेरले आहे. कोरोना बाधा झाल्यावे मानसिक स्थिरता, आत्मविश्वास ह्या दोन गोष्टी असल्या की पुढचे सोपस्कार सोपे जातात. काय करायचं ? कसं करायचं ? काय होईल ? कसं होईल ? मला ऑक्सिजन तर लागणार नाही ना ? माझा स्कोअर किती येणार ? माझे ब्लड रिपोर्ट्स कसे असतील ? मला डॉक्टर ऍडमिट करतील की ओपीडीवर उपचार करतील ? बेड मिळाला तर ऑक्सिजन मिळेल का ? ऑक्सिजन मिळाला तर रेमडेसीविर भेटेल का  ?मग माझ्यामुळे मी किती जणांना इन्फेक्ट करणार ? बरं मला अजून काय आजार आहेत ? ज्यामुळे मला कोरोनाचा कितपत त्रास होईल ? मी एकत्र कुटुंबात राहत असलो तर माझे आई-वडील, भाऊ, बहीण आणि इतर लहान मुलांना कितपत धोका होईल ? टेस्ट करावी की नाही ? टेस्ट केली तर पूर्ण कुटुंबातील लोकांना Quarantine व्हावे लागेल का ? त्यांना परत ओपीडी ट्रीटमेंट लागेल का ऍडमिट करावे लागेल ?
अशा अनेकानेक प्रश्नांची सरबत्ती एका कोव्हीड सदृश अथवा बाधित झालेल्या माणसाला सतावून सोडणारी आहे. आणि होय वरील सर्व प्रश्न हे अगदी योग्य आणि सामान्य माणसाला पडणारे आहेत. याबद्दल मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ, स्पष्ट भाषेत मार्गदर्शन करणार आहे. ही माहिती सुजाण माणसाने अगदी शांत चित्ताने वाचावी ही माझी एक नम्र विनंती आहे. तुम्हा सर्वांना वरच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत जातील.

■ कोरोनाची पुढीलप्रमाणे सर्वप्रथम लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, अंगदुखी, ताप, थंडी, कणकण, अशक्तपणा, अंगात आलेला जडपणा, काम करण्याची इच्छा नसणे, सुरुवातीला कोरडा खोकला, सर्दी, नाकातून पाणी येणे, घसा दुखणे, खवखवणे, डोळे लालसर होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, थोडं चाललं की धाप लागणे, उलट्या होणे, जुलाब होणे, पित्त वाढणे, मळमळ होणे, अस्वस्थ वाटणे.

■ लहान मुलांच्या बाबतीत सर्दी, कोरडा खोकला, छातीत कफ होणे, चिडचिड करणे, घसा दुखणे, उलट्या,जुलाब, श्वास घ्यायला त्रास होणे, पोट उडणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढणे, छातीत घरघर वाढणे, आदी त्रास, लक्षणे दिसून येतात.
घाबरून न जाता ज्यांना लक्षणे आढळून आली आहेत त्यांनी कुठलीच चिंता, विचार न करता लवकरात लवकर स्वतःची किंवा ज्याला लक्षणे आहेत त्यांची कोरोना-कोव्हीड टेस्टिंग करून घ्यायची आहे.

■ आता प्रश्न उध्दभवतो की कुठली टेस्ट करायची ? जी उपलब्ध असेल ती टेस्ट करून घ्यायची. लवकर निदान करायचे असेल तर रॅपिड अँटीजन टेस्ट करून घ्यावी. ती Positive जर आली तर पुढची टेस्ट ( RTPCR ) तुम्हाला करायची गरज नाही. जर ती Negative आली तरच तुम्हाला RTPCR टेस्ट करायची आहे. आपल्या कॉन्टॅक्ट/संपर्कात आलेल्या घरच्या, जवळच्या लोकांची पण टेस्ट्स करून घेतलेली कधी पण चांगली असते. टेस्टचा रिपोर्ट जो काही येईल तो शांत मनाने समजून घ्यावा. विनाकारण त्याचा बाऊ न करता पुढच्या प्रक्रियेला मानसिक शारीरिक सामोरे जाण्याची तयारी करावी.

■ टेस्ट पॉजिटीव्ह आली तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने ट्रीटमेंट/उपचार सुरू करावेत. कोव्हीड प्रोटोकॉल्स म्हणून आम्हा सर्व डॉक्टरांना ती ट्रीटमेंट देता येते. पुढे येतो प्रश्न तुमच्या लक्षणांकडे लक्ष देण्याचा  आणि त्यांच्यावर सूक्ष्म लक्ष ठेवण्याचा. ब्लड रिपोर्ट्स आणि इतर टेस्ट्स उदा. हाय रिजोलुशन सी टी स्कॅन ऑफ चेस्ट ( HRCT-CHEST ). डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत चाचणी करावी. तुमच्याकडे पल्स ऑक्सिमेट्री उपकरण असणे आवश्यक आहे. त्याने तुम्ही तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजू शकता.

■ कोरोनाचा विषाणू मुख्यत्वेकरून तुमच्या फुफ्फुसांवर हल्ला चढवितो. त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. ऑक्सिजनची पातळी ही किमान ९३ % च्या वर असावी असे विज्ञान सांगते. तुम्ही तुमचा बीपी (ब्लड-प्रेशर ), शुगर, हार्ट रेट आदी सुद्धा मोजून घ्यायला हवे. हे सगळं जर घरच्या घरी शक्य झाले तर करावे. नाहीतर तुमच्या नजीकच्या डॉक्टरांकडून तपासायला हवे. हे सर्व जवळपास नॉर्मल असायला हवे. तुम्हाला घरच्या घरी एक टेस्ट करायची आहे. त्याला 6 minute walk test असे म्हणतात. तुम्हाला एका ठिकाणी बसून तुमचे ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजायचं आहे. नंतर ६ मिनिटे सपाट पृष्ठभागावर सलग चालायचे आहे. त्यानंतर परत ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजायचं आहे. ते किती भरतं हे नोंद करून आपल्या डॉक्टरांना सांगायचं आहे. ते जर ९३ % पेक्षा कमी भरले तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून पुढची सावध पावले उचलायची आहेत हे लक्षात घ्या. त्यांत पुढच्या टेस्ट्स आल्या, त्यांत पुढचे Investigations आले. ते सर्व तुम्ही तुमच्या डॉक्टरांवर  सोपवावे. त्या खोलात मी जाणार नाही.

■ इथे तुम्हाला सतर्क, सजग राहण्याची गरज असते. वेळ पडली तर तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये अजून काही ऍड करावे लागते. कधीतर ऍडमिट पण व्हायची तयारी करावी लागते. ( ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ). कोव्हीड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स पूर्ण जगात जवळजवळ सारखेच असतात. त्यामुळे कुठल्याच डॉक्टरांच्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता जी ट्रीटमेंट मिळेल ती ह्या परिस्थितीला घ्यावी. डॉक्टरांना स्वतःच्या अर्धवट ज्ञानाने सल्ला द्यायचा प्रयत्न करू नये. त्यांच्या निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ करू नये याने आपलेच नुकसान होते ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत. ( पुढील भाग उद्या दि. २ मे २०२१ रोजी प्रकाशित होईल. )

टीप : वरील लेख हा मी केवळ आणि केवळ माझ्या आतापर्यंतच्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे लिहिला आहे. ह्यामध्ये बऱ्याच अर्थी शास्त्रीय दृष्टिकोन आहे. कुणाची पण भावना दुखवायचा हेतू नाहीये. डॉक्टर्स आणि नॉन -मेडिकोज ह्या दोहोंसाठी पण आहे. सामान्य जनतेच्या मनातील संभ्रम दूर करणे. त्यांना आजाराची, उपचाराची थोडी विस्तृत माहिती देणे, कुठे काय पावलं उचलायची, डॉक्टरांचे मनोबल, कार्यक्षमता उंचावणे हाच उद्देश आहे. लेखावर कमेंट करून तुम्ही तुमची शंका माझ्या ब्लॉगवर, फेसबुकवर, ह्या पोर्टलवर विचारू शकता.
डॉ. अविनाश कि. गोरे

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

error: Content is protected !!