

इगतपुरीनामा न्यूज – मागील महिन्यात प्रचंड चूरशीच्या झालेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १६ संचालक निवडून आले होते. शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागा काबीज करता आल्या होत्या. खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना ( ठाकरे ) उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश मिळवले होते. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्याकडून विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी १.३० ह्या वेळेत निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दोन्ही पदांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता असल्याने निवडीची घोषणा आधीच होऊ शकते. निवडीके इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागलेले असून कोणाच्या गळ्यात सभापती, उपसभापती पदाची माळ पडते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
निवृत्ती भिकाजी जाधव, ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने, सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे, राजाराम बाबुराव धोंगडे, अर्जुन निवृत्ती भोर, संपत किसन वाजे, भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा, रमेश खंडू जाधव हे शेतकरी विकास पॅनलचे संचालक विजयी झाले होते. शेतकरी परिवर्तन पॅनलचे दिलीप विष्णू चौधरी, ॲड. मारुती रामभाऊ आघाण हे दोघे संचालक म्हणून बाजार समितीवर विजयी झालेले आहेत. बाजार समितीचा सभापती, उपसभापती कोण होईल हे गुलदस्त्यात असून याचे आज सकाळी ११ वाजेनंतर चित्र स्पष्ट होईल.