भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज “ओलें मूळ भेदी खडकाचें अंग | अभ्यासासी संग कार्यसिध्दी” ह्या अभंगाद्वारे असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करतात. त्या अभंगाचा सारांश असा आहे की, दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. विष पचायला अत्यंत कठीण असते पण हेच विष सातत्याने थोडे थोडे घेतले तर तेही पचविणे शक्य होते. मातेच्या उदरात जन्माच्या वेळी बाळाचा आकार मावेल एवढी जागा नसतानाही हे जन्म घेणारे बाळ आपल्या गरजेनुसार हळूहळू जागा निर्माण करीत जाते. ओल्या मूळाचे खडक भेदणे, दोऱ्याने दगड कापणे, सरावाने विष पचणे या साऱ्या गोष्टी अभ्यासाने, सातत्याने आणि प्रयत्नांनी शक्य होऊ शकतात. म्हणजे ह्या जगात अशक्य काहीच नाही. अशाच प्रकारे अतिदुर्गम आदिवासी भागातील सामान्य कुटुंबातील मुलीने वारकरी पताका हाती घेऊन प्रबोधनाचा मार्ग साध्य केला आहे. म्हणजेच इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी ह्या छोट्या वाडीतुन वारकरी कीर्तनकार म्हणून एक “पौर्णिमा” खुलली आहे. संत परंपरा, संत साहित्य, संतांची नियमितता, गायन, वादन आदी शिक्षण जिद्धीने घेऊन तिने इगतपुरी तालुक्यातील पहिली महिला कीर्तनकार म्हणून मान पटकावला आहे. हभप कु. पौर्णिमाताई ज्ञानेश्वर कडू असे तिचे नाव असून तिच्या ध्येयापुढे गगन ठेंगणे झाल्याचे म्हणता येईल.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तर महिला कीर्तनकारांची महत्वपूर्ण उच्च परंपरा आहे. धर्माचा महिमा, भक्तीचा संदेश आणि समाजाचे प्रबोधन यासाठी संत मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई आदींचे कार्य उच्चतम आहे. त्यांच्या मार्गाने जाण्याचा छोटासा प्रयत्न हभप कु. पोर्णिमाताई ज्ञानेश्वर कडू हिने केला. वडील ज्ञानेश्वर एकनाथ कडू, आई बानुबाई ज्ञानेश्वर कडू यांच्या सुसंस्कारी घरातील मुलगी लहानपणापासून वारकरी परंपरा जोपासत आहे. पौर्णिमा हिने कीर्तनकार होऊन समाज बदलासाठी अनेकांगी मार्गाने सातत्यपूर्ण प्रयत्न करावे अशी तिचे मामा तबला विशारद कैलास म्हसणे यांची इच्छा होती. त्यानुसार अनेक कार्यक्रमांमध्ये ते पौर्णिमा हिला सोबत न्यायचे. त्यातून परमार्थमार्गाची प्रचंड आवड, पाठांतर, सुंदर चाली ती शिकली. आईवडिलांच्या आणि मामांच्या इच्छेसाठी पौर्णिमा वारकरी शिक्षण घेण्यासाठी मनापासून तयार झाली. त्याआधी तिने श्री क्षेत्र सावकी ता. कळवण येथे सुमधुर आणि अभ्यासपूर्ण प्रवचने केली. बीड जिल्ह्यातील चकलांबा ता. गेवराई येथील श्री सद्गुरु कल्याण स्वामी संस्थान अंतर्गत अन्नपूर्णा माता मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत तिला दाखल करण्यात आले. गुरुवर्य हभप साध्वी सोनाली दीदी कर्पे यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली हभप कु. पौर्णिमाताई ज्ञानेश्वर कडू ही इगतपुरी तालुक्यातील पहिली महिला कीर्तनकार घडली. अभंगाची अभ्यासपूर्ण सोडवण, संतांचे दाखले, संस्कृत श्लोकांचा वापर, थोडीसी विनोदबुद्धी, प्रमाणाच्या चाली आदींनी पौर्णिमाचे कीर्तन भाविकांना भुलवत आहे. भाऊ पवन, तन्मय आणि बहिण सानिका यांना पौर्णिमाताईच्या यशाचा प्रचंड आनंद झाला आहे. आईवडिलांसह मामाच्या संस्कारांचे चंद्रमौळी जीवन जगताना वारकरी पताका आणि संतांची भक्ती लोकांपर्यंत सुलभ मार्गाने पोहोचवण्याचे तिचे व्रत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिच्यासाठी इगतपुरीनामा परिवाराकडून अनेकोत्तम शुभेच्छा. रामकृष्णहरी
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग |
अभ्यासासी संग कार्यसिध्दी
नव्हे ऐसें काही नाहीं अवघड ।
नाहीं कईवाड तोंच वरी।
दोरें चिरा कापे पडिला कांचणी।
अभ्यासें सेवनीं विष पडे ।
तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव ।
जठरी बाळा वाव एकाएकीं।