
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयराम गेणू गव्हाणे यांना नाशिक जवळ पांडवलेणी भागात मारहाण झाली आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला कुऱ्हेगावच्या दिशेने जात असताना अचानक आलेल्या तिघांनी मारहाण केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मारहाणीनंतर संशयित व्यक्ती पळून गेले. या घटनेत फिर्यादी जयराम गव्हाणे हे जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे संशयित प्रशांत उर्फ शंकर तानाजी धोंगडे आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३४१, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एस. बोंडे यांच्याकडे ह्या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. दरम्यान ही घटना राजकीय वादामधून झाली असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरु झाली आहे.


