दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडियाच्या नाशिक-ओझर चॅप्टरच्या नावात झाला बदल : सीएमए भूषण पागेरे यांनी दिली माहिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडियाच्या ओझर नाशिक चॅप्टरचे नाव आता बदलले असून मुख्यालयाने ह्याला मान्यता दिली आहे. प्रकरणाच्या नावातून ओझर शब्द काढण्याची आमची विनंती मान्य करण्यात आली आहे. आता नाशिक ओझर चॅप्टर ऐवजी नाशिक चॅप्टर असे संबोधले जाईल. त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो असे नाशिक विभागाचे अध्यक्ष सीएमए भूषण उत्तम पागेरे यांनी सांगितले. नाशिक चॅप्टरकडे प्रामुख्याने विद्यार्थ्यांमधील समन्वय, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, चॅप्टरच्या कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये सीएमए करियरबद्दल मार्गदर्शन करणे हे प्रमुख कार्य येतात असेही सीएमए भूषण उत्तम पागेरे यांनी सांगितले.

अधिक माहिती अशी की, दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडिया  या संस्थेची स्थापना १९४४ ला होऊन १९५९ मध्ये ह्या संस्थेच्या कारभारासाठी संसदेत कायदा पारित करण्यात आला. तेव्हापासून ही संस्था कॉर्पोरेट मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. ह्या राष्ट्रीय संस्थेचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे ४ विभाग आहेत. १९७५ साली संस्थेने जारी केलेल्या उपविधीतील तरतुदींनुसार नाशिक चॅप्टर पश्चिम विभाग ( वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल – WIRC ) च्या अंतर्गत स्थापना झालेली आहे. त्याकाळात ओझरच्या एचएएलमध्ये अनेक सीएमए काम करत असल्याने नाशिक-ओझर असे नाव ठरले. उत्तर महाराष्ट्रात विस्तार झाल्याने नाशिक-ओझर ह्या नावात बदल व्हावा असे प्रयत्न सुरू झाले. सीएमए भूषण पागेरे आणि त्यांच्या संपूर्ण व्यवस्थापन समितीने विभागीय, केंद्रीय कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नावात बदल करून नाशिक चॅप्टर ह्या नावाला मान्यता मिळवली. त्याबद्दल नाशिक विभागाचे अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे यांनी सर्व पश्चिम विभागीय आणि केंद्रीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.

संस्थेचे कामकाज आणि सीएमए बद्दल थोडक्यात  –
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (पूर्वीची इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया-आयसीडब्ल्यूए ) ची स्थापना कॉस्ट अकाउंटन्सीच्या व्यवसायाचा प्रचार, नियमन आणि विकास करण्याच्या उद्देशाने १९४४ मध्ये कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपनी म्हणून करण्यात आली. २८ मे १९५९ ला संस्थेची स्थापना झाली. यावेळी संसदेच्या विशेष कायद्याद्वारे म्हणजे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स कायदा पारित करण्यात आला. २०११ मध्ये संस्थेच्या कामकाजाचे स्वरूप लक्षात घेऊन कायद्यात बदल झाला व आयसीडब्ल्यूए ऐवजी सीएमए नावाला मान्यता मिळाली. संस्थेच्या बोधचिन्हाची रचना पाहता समाजाला अर्थपूर्ण संदेश मिळतो. बोधचिन्हातील प्रज्वलित दिवा म्हणजेच “तमसो मा ज्योतिर्गमय” याचा अर्थ “ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर होवो”. ही संस्था ६० वर्ष जुनी असून संस्थेत नोंदणीकृत सदस्यांची संख्या ९० हजारापेक्षा जास्त असून संस्थेने शिक्षणाचा दर्जा राखला आहे. सीएमएच्या परीक्षा मुख्य कार्यालय, कलकत्ता येथून आयोजित केल्या जातात. या परीक्षांचे संपूर्ण नियंत्रण मुख्य कार्यालयाकडे असते.

सध्याच्या काळात आर्थिक उलाढाल आधारित मर्यादा निर्धारित करणार्‍या बहुतेक उत्पादन आणि सेवा उद्योगांना कंपनी (कॉस्ट ऑडिट आणि रेकॉर्ड ) नियम २०१४ लागू झाले आहेत. वैधानिक खर्च लेखापरीक्षण अनिवार्य झाले. ज्यामुळे सीएमए व्यावसायिकांना लेखापरीक्षण करण्याची अतिरिक्त संधी मिळाली. व्यवसाय शाश्वत पद्धतीने विकसित करण्यासाठी सीएमए हे डायनॅमिक व्यवस्थापकीय विचारांचे खजिनदार मानले जातात. त्यांची भूमिका आर्थिक व्यवस्थापक, बजेट विश्लेषक, आर्थिक जोखीम व्यवस्थापक, आर्थिक विश्लेषक, खर्च व्यवस्थापक, खर्च लेखापाल, मुख्य आर्थिक अधिकारी, नातेसंबंध व्यवस्थापक इत्यादींसह विविध श्रेणींमध्ये आहे. आज सीएमए उद्योगात उच्चस्तरीय पदांवर आहेत आणि ते सामूहिक व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णयांचा भाग आहेत. पुढे ते त्यांचे ज्ञान आणि कौशल्य उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी योगदान देतात. ज्यामुळे राष्ट्र उभारणीस मदत होते.

Similar Posts

error: Content is protected !!