… तर खड्ड्यांच्या रस्त्यात घटस्थापना करू ; राष्ट्रवादी नेते मदन कडू यांचा इशारा : इगतपुरी तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे ग्रामीण भागामध्ये संताप

इगतपुरीनामा न्यूज, दि. 18

इगतपुरी तालुक्याच्या प्रकल्पग्रस्त भागात ग्रामीण नागरिकांचा जगण्यासाठी आटापिटा सुरु असतांना जीवनवाहिनी असणाऱ्या रस्त्यांची वाट लागली आहे. यामुळे ह्या खड्डेमय रस्त्याने प्रवास करणारा व्यक्ती घरी येईल की नाही यांची विवंचना कुटुंबियांना लागलेली आहे. म्हणूनच खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट लागली असतांना कुटुंबाची वाट लागण्याची भीती ग्रामीण भागात पसरत आहे. इगतपुरी तालुक्यातील तळोघ, कांचनगाव. काळूस्ते, भरवज, निरपण, औचितवाडी शेणवड बुद्रुक, शिवाचीवाडी, दरेवाडी, फोडसेवाडी, मांजरगांव, आंबेवाडी, कानडवाडी, तळोशी आदी भागातील नागरिक खड्ड्याच्या रस्त्यांमुळे प्रचंड वैतागलेले आहेत. साधी डागडुजी करायची तसदी यंत्रणा घेत नसल्याने संताप वाढतो आहे. सध्या सगळीकडे “सेवा पंधरवाडा” सुरु असून ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी असा उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. प्रचंड खड्डे होण्यासाठी कारणीभूत असणारी “समृध्दी जोरात अन गावांचा रस्ता कोमात” असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते मदन कडू यांनी केला आहे. समृद्धीच्या मोऱ्या पूर्णपणे चुकीच्या असल्याने खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांची जीव धोक्यात घालून प्रवासाची कसरत सुरु आहे. घटस्थापनेपूर्वी तातडीने रस्त्यांची डागडुजी आणि नवीन रस्ते करावेत अन्यथा ह्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये घटस्थापना करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते मदन कडू यांनी दिला आहे.

मोठेमोठे खड्डे असणारे रस्ते रोजच अपघातांना निमंत्रण देत आहेत. अपघातात बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे असे चित्र निर्माण झाले असून त्याबद्दल असंवेदनशीलता दिसून येते. समृद्धी सारख्या प्रकल्पामुळे समृद्धी येण्याऐवजी ग्रामीण भागाला दरिद्री येत आहे. नियोजनाच्या अभावामुळे रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्याने ग्रामीण नागरिक वैतागले आहेत. म्हणून प्रशासनाने घटस्थापनेपूर्वी तळोघ, कांचनगाव. काळूस्ते, भरवज. निरपण, औचितवाडी, शेणवड बुद्रुक, शिवाचीवाडी, दरेवाडी, फोडसेवाडी, मांजरगांव, आंबेवाडी, कानडवाडी, तळोशी या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी. अन्यथा ह्या रस्त्यातील खड्ड्यात घटस्थापना करण्यात येईल असा इशारा मदन कडू यांनी दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!