
इगतपुरीनामा न्यूज – जानोरी येथील कोकणे मळ्यात अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इगतपुरीचा वनविभाग सुस्त असल्याने समस्या वाढल्याचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोर यांनी सांगितले. ह्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतीची कामे करणे अवघड बनले आहे. यापूर्वी बिबट्याने गाई वासरांचा फडशा पाडला असून शाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकरी प्रचंड प्रमाणात धास्तावले आहेत. बिबट्याच्या भीतीमुळे कोकणे मळे वस्तीतील नागरिक सातच्या आत घरात राहणे पसंत करीत आहे. कोकणे मळ्यात इगतपुरी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. अन्यथा अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोर, दीपक कोकणे, संदीप कोकणे, लखन भोर, लखन पाळदे, सचिन कोकणे, बाळू भोर, निखिल सोनवणे, त्र्यंबक कोकणे, कृष्णा कोकणे आदींनी दिला आहे.