रविवार विशेष : दहावी – बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना ….!

मित्रांनो, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर थोडं अधिकचा परिणाम दिसून येत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी इयता पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आर टी ई ऍक्ट 2009 मधील कलम 16 अनुसार कुठलीही परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याविषयी जाहीर केले. त्याचसोबत नववी आणि अकरावी वर्गात शिकणाऱ्या मुलांना देखील पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. त्याचवेळी दहावी व बारावी वर्गात शिकणाऱ्या मुलांना देखील परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश मिळेल काय अशी शंका अनेकांच्या मनात होती. पण शिक्षणमंत्री महोदयांनी दहावी व बारावी वर्गाविषयी काही ही न बोलता त्या वर्गाची परीक्षा होणार असे सूतोवाच केले. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रसार गुणाकाराच्या स्वरूपात वाढ होत असून अश्या विषम परिस्थितीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडतील का ? परीक्षेच्या काळात विद्यार्थी कोरोना बाधित झाला तर त्यांचे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याची जबाबदारी घेण्यास सरकार असमर्थता दर्शवित आहे. परीक्षा सुरळीत पार पडतील का ? सर्व विषयाची परीक्षा मी देऊ शकेन का ? परीक्षेत कोणते प्रश्न विचारल्या जाणार आहेत ? नेमकं स्वरूप कसे असणार आहे ? अर्धा तास वाढवून मिळालं असले तरी प्रश्नांची उत्तरे तरी मला येतील का ? अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर लिहिणार काय ? असे एक नाही अनेक प्रश्न दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर पडले आहेत. ज्याची उत्तरे त्यांना कोणाकडूनही मिळणार नाहीत.
विद्यार्थी मित्रानो, त्यामुळे विचारांच्या गोंधळात पडून मनात भीती निर्माण करून घेऊ नका. सकारात्मक दृष्टीने विचार करून परीक्षेला सामोरे जा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आणि आपली परीक्षा भर उन्हाळ्यात आहे त्यामुळे उन्हापासून संरक्षण करणारी सर्व साहित्य सोबत बाळगा. उन्हात जास्त वेळ प्रवास करणे टाळा. परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर मनात किंतु परंतु अश्या शंका न आणता प्रश्नपत्रिका नीट वाचून घ्या. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा मध्ये आपल्याशी संवाद साधतांना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या काळजीपूर्वक करा. अवघड प्रश्न अगोदर सोडवा आणि सोपे प्रश्न नंतर सोडवा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. सामान्य विद्यार्थ्यांना हा सल्ला जरा कठीण जातो म्हणून सोपे प्रश्न अगोदर सोडावा ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल आणि स्मरणशक्ती वाढीस लागेल. त्यानंतर अवघड प्रश्न सोडविण्यास घ्यावे, असे मला वाटते.
मित्रानो आपले मनोधैर्य खचू देऊ नका. या परीक्षेत तुम्ही नापास तर होणारच नाही याची सर्वप्रथम आपल्या मेंदूला माहिती करून द्या. राहिला प्रश्न गुणवत्तेचा तर त्याविषयी जास्त चिंता बाळगण्याचे कारण नाही. आजपर्यंतचा इतिहास सांगतो की, कमी गुण घेतलेला विद्यार्थी पुढे अत्यंत जिद्दीने व चिकाटीने पुढे जात असतो. आपली स्पर्धा ही स्वतःशी ठेवावी. अन्य कोणत्याही मित्रांशी, शेजारच्या मुलांशी कधी ही ठेवायचं नाही. पूर्वीपेक्षा काहीतरी बेस्ट करून दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहायचे. दहावी व बारावी ही परीक्षा म्हणजे जीवनातील सर्वात शेवटची आणि अत्यंत महत्वाची परीक्षा नाही. या परिक्षेमुळे आपणाला निश्चित अशी दिशा मिळते, ज्या रस्त्यावर आपणाला चालायचं आहे तो मार्ग कळतो. म्हणून मन निरुत्साह न ठेवता आनंदी ठेवा, परीक्षेला जाताना मास्कचा वापर करा, गर्दी न करता परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरची छोटी बॉटल ठेवा, स्वतःची काळजी घेऊन परीक्षा द्या. परीक्षा देऊन घरी आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवा, जमल्यास स्नान करा, त्यादिवशीचे अंगावरील सर्व कपडे लगेच धुण्यास टाका. एवढी काळजी घेऊन दहावी व बारावीची परीक्षा सुरळीतपणे पूर्ण करू या. सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा ……!

  • नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड 9423625769

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!