रविवार विशेष : शोक संदेश टाकतांना थोडा विचार करा..!

सध्या सोशल मीडियात सगळ्यात जास्त कोणत्या शब्दांचा वापर होत असेल तर ‘भावपूर्ण श्रद्धांजली!’ पूर्वी कधीतरी वापरावे लागणारे हे शब्द सध्या रोजच, रोजच काय मी तर म्हणतो अगदी तासातासाला वापरावे लागत आहेत. काळजाचा ठोका चुकवणारे हे शब्द वाचले की वाटतं की सगळ्यांना ओरडून सांगावं, अरे बास करा आता! किती श्रद्धांजली देणार! वाचायला हे विक्षिप्त वाटत असलं तरी खरं आहे. या शोक संदेशांमुळे सोशल मीडिया उघडून पाहायची सुद्धा हिंमत होत नाहीये आता!
आता तुम्ही म्हणाल याचं डोकं ठिकाणावर आहे का? शोक संदेश ही खरं तर किती संवेदनशील गोष्ट आहे. तिकडे माणसं मरताहेत आणि हा म्हणतोय श्रद्धांजली देऊ नका! आपण मृत व्यक्तीबद्दल आदराची भावना म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो, यात गैर किंवा आक्षेप घेण्यासारखं काय आहे? हे सुद्धा मान्य आहे. पण आपण ज्या वेळी केवळ औपचारिकता म्हणून श्रद्धांजली वाहतो त्यावेळी वाचणाऱ्या, पाहणाऱ्या प्रत्येकाचा विचार करतो का? कुणाचाही मृत्यू होणं हो घटना वाईटच. मृत व्यक्ती प्रत्येक वेळी आपल्या जवळची असतेच असं नाही. तरीही आपण एक औपचारिकता म्हणून का असेना श्रद्धांजली चे दोन शब्द लिहितो, अगदीच काही नाही तर किमान एखादं स्टिकर, इमोजी तरी टाकून तरी व्यक्त होतोच. हे सगळं आपण सद्भावना मनात ठेवून करत असतो हे मान्य आहे, पण या सगळ्याचा परिणाम आपण समजून घेतलाय का?

आतापर्यंत वाचली ती झाली एक बाजू! कितीही सद्भावनेने आपण व्यक्त होत असलो तरी याची दुसरी बाजू सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे. हे सगळे भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश आपण कुठे देत असतो? सोशल मीडियात! आणि शंभरपैकी नव्यान्नव वेळा ते आपण देत असतो आपल्या व्हाट्सअप ग्रुपमधून! म्हणजे अगदी डिजिटल का असेना, पण सार्वजनिक व्यासपीठावर आपण व्यक्त होत असतो. बरोबर ना? मृत व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत तुमचा श्रद्धांजली संदेश पोचतो खरा, पण तुमच्या ग्रुपमधले इतर सदस्य सुद्धा तो श्रद्धांजली संदेश वाचत असतात. त्यापैकी एखादा सदस्य किंवा त्याच्या घरातली एखादी व्यक्ती कोविडला सामोरी जात असेल तर? त्याला काय वाटेल? एक व्यक्ती बाधित असणं म्हणजे फक्त त्या व्यक्तिपुरताच तो त्रास मर्यादित नसतो, त्याचं अख्खं कुटुंब या संकटाचा सामना करत असतं. आणि अशावेळी मृत्यू झालेल्या व्यक्तीला ग्रुपमध्ये श्रध्दांजली देण्याची तुमची भावना कितीही प्रामाणिक असली तरी आधीच कोविडच्या तडाख्याने बेजार झालेले कुटुंब अशा या संदेशांमुळे अजून खचते, हेही तितकेच खरे आहे! हे वाचतांनाच त्याच्या मनातही कळत नकळत धडकी भरल्याशिवाय राहात नाही!

याआधी कधीही सामोरे गेलो नाही अशा अनामिक भितीला आपण सगळे सध्या सामोरे जात आहोत. जात्यात आहेत त्यांचं एकवेळ ठीक, ते धैर्याने सामोरे तरी जाताहेत. पण जे सुपात आहेत त्यांचं काय? अशावेळी बाधित रुग्णाच्या कुटुंबियांपैकी किंवा कधीकधी स्वतः बाधित रुग्णच हे संदेश वाचत असेल वाचतांना नकळत आपल्या पेशंटविषयी असुरक्षिततेची भावना वाचणाऱ्याच्या मनात आल्याशिवाय राहात नाही. आणि याचा कळत नकळत शारीरिक मानसिक परिणाम रुग्णांवर आणि त्याच्या कुटुंबियांच्या मानसिकतेवरही होत असतो. आधीच नकारात्मक विचारांनी त्याच्या डोक्यात काहूर माजवलेले असते आणि आपण पुन्हा या श्रद्धांजली मधून त्याच्या मनातल्या नकारात्मक विचारांना नकळत का असेना पण खतपाणी घालत असतो. खरंच शांत डोक्याने विचार करून पाहा, पटेल तुम्हाला माझं म्हणणं! कुणाचाही मृत्यू होणं ही गोष्ट वाईटच, त्यामुळे शोकसंदेश, श्रद्धांजली या गोष्टी व्यक्त केल्या जाणं हे सुद्धा अगदी नैसर्गिक आहे. पण त्याच बरोबर थोडीशी सकारात्मकता पसरवायला काय हरकत आहे? शंभर पैकी अगदी नव्वद पेशंट आठवडाभरात, दोन आठवड्यात ठणठणीत बरे होत आहेत. बाकीच्यांनाही थोडा जास्त कालावधी लागत असला तरी बरे होणाऱ्या पेशंटचे प्रमाण पुष्कळ आहे! हे सुद्धा लोकांच्या लक्षात आणून द्यायला काय हरकत आहे? तुमची एखादी व्यक्ती कोविडने बाधित आहे किंवा तुम्ही स्वतः कोविडने बाधित आहात हे खरं असलं तरी ‘तुम्ही नक्की बरे होणार आहात’ हा विश्वास आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो की! थोडंसं हेही शेअर करूया. दुर्दैवाने काही मृत्यू होत आहेत, त्यांच्याबद्दलच्या तुमच्या सद्भावना श्रद्धांजलीच्या माध्यमातून व्यक्त कराच, पण त्याच्या सोबतच लोक बरे होत आहेत, तुम्हीही नक्की बरे व्हाल हा दिलासा सुद्धा शेअर करायला काय हरकत आहे! आजूबाजूला अनेक बरे झालेले पेशंट आहेत, त्यांच्या स्टोरीज शेअर करा. कितीतरी रुग्णालयांमधून डॉक्टर आणि त्यांचा इतर स्टाफ रुग्णांसाठी जीवाचं रान करताहेत, ते शेअर करा! “काळ येणं” याचा शब्दशः अनुभव आपण सगळे घेत आहोत. वेळ कुणावरही येऊ शकते इतकी परिस्थिती बिघडली आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, मग का आपण नकारात्मकता पसरवत आहोत?

सगळेच घटक यातून बाहेर पडण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. थोडा वेळ लागेल कदाचित, पण आज ना उद्या यातून बाहेर पडणार आहोतच असा विश्वास बाळगा! काळजी करू नका, पण काळजी नक्की घ्या! बाकी सोबत आहोतच!

Similar Posts

5 Comments

  1. avatar
    Shekhar Phutke says:

    श्रद्धांजली, आपली भावना ही संबंधित नातेवाईकांच्या वैयक्तिक अकाऊंटवर व्यक्त व्हायला हवी, ग्रुप मध्ये नको…. अगदीच रास्त आणि सध्याच्या परिस्थितीत फारच महत्वाचा विचार आहे…. सुयोग्य शब्दात मांडणी केली आहे आपण गुरुवर्य 👍

  2. avatar
    निवृत्ती नाठे says:

    सुचवलेल्या मुद्द्याला हात घातला व अतिशय योग्य मांडणी केली. इगतपुरीनामा पोर्टलला धन्यवाद..!

Leave a Reply

error: Content is protected !!