इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
लग्न म्हटले की अनेक व्यर्थ खर्चाचे ओझे सर्वांच्या बोकांडी बसते. यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहून भविष्यात अनेक संकटे निर्माण होतात. त्यामध्ये कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येचा भयंकर मार्ग सुद्धा पत्करतात. अशा परिस्थितीत विवाहसोहळ्याचा वारेमाप खर्च टाळून वाचलेला खर्च आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ बालकांवर व्हावा अशी संकल्पना मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते यांनी मांडली. वर आणि वधुपक्षातील सर्वांना हे आवडल्याने हा अनोखा विवाह सोहळा त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात संपन्न झाला. आश्रमातील मुलांना आणि उपस्थितांना एक वेगळा आनंद आणि चांगला संदेश मिळाला आहे.
लग्नासाठी समाजात सध्या होत असलेला अनाठायी खर्च पाहता या नूतन वधूवरांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सर्वच मोठ्या खर्चाना फाटा देत मोजके मान्यवर आणि दोन्हीकडील आवश्यक लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा मोठ्या आनंदात पार पडला. इगतपुरी तालुक्यातील चि. समाधान व त्र्यंबकेश्वरची चि. सौ. का. शालिनी यांचा हा अनोखा विवाहसोहळा सर्वांना प्रेरणादायक ठरला आहे. मनसेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रमेश खांडबहाले, तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे, काँग्रेस नेते ईश्वर सहाणे, कल्पतरू हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत मुर्तडक, इगतपुरी मनविसे अध्यक्ष गणेश मुसळे, कर्मयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकीरा धांडे आदी मान्यवरांनी यावेळी हजेरी लावून शुभाशीर्वाद दिले. आश्रमातील मुलांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत, अक्षता वाटप आणि वधूवराचे अनोखे स्वागत केले. यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रूची दाटी झाली. कन्यादान सुद्धा आश्रमातील सर्व मुलामुलींसह सर्व लोकांनी करून निरोप दिला. अनेक सामाजिक काम असतांना हा लग्नसोहळा आगळाच होता. माझी संकल्पना असली तरी ह्या सोहळ्यासाठी दोन्हींकडून मिळालेला प्रतिसाद आनंद देणारा होता. ह्या आदर्श सोहळ्याची प्रेरणा घ्यावी असे मत मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते यांनी व्यक्त केले. विवाह सोहळे हे थाटामाटात होत असतात. पण ज्यांना कुणाला आधार नाही अशा मुलांच्या मुखात प्रेमाने दोन घास घालण्याचा हा छोटासा प्रयत्न केला असल्याची भावना वर समाधान शिंगोटे यांच्यासह वधू शालिनी यांनी व्यक्त केली.