आदिवासी बांधवांनी एकत्र यावे ही काळाची गरज …!

संग्रहित फोटो

लेखन – रमेश हिरामण मुकणे, म्हसुर्ली, 78219 64034

पूर्वीपासूनच आदिवासींना गौरवशाली इतिहास लाभलेला आहे ..! आदिवासींसारखे स्वच्छन्दी, आनंदी जीवन हे कोणाचेच नव्हते. त्याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासींच्या किमान गरजा. त्यांतील 75 टक्के गरजा ह्या जंगलातून भागवल्या जायच्या. शेती करणे, कंदमुळे गोळा करणे, मध गोळा करणे, मोहाची फुले, पळसाची पाने, आपट्याची पाने, डिंक गोळा करणे ह्यांवर आदिवासींची गुजराण व्हायची. एकत्र कुटुंबपद्धती असल्याने 20 ते 25 जणांचा कुटुंबकबिला असायचा. प्रत्येक कुटुंबात एक थोरला व्यक्ती हा त्या कुटुंबाचा प्रमुख असायचा. गाई बकऱ्याचा मोठा कळप असायचा.  नागली, वरई, उडीद, तूर, भात पिकवणे, पावसाळ्यात ओढ्यानाल्यात खेकडे, मासे पकडणे, आवडते अन्न म्हणजे मुख्यतः नाचणीची भाकर, मासे तसेच ठेचा व उडदाचे भुजे हे होय. पावसाळी रानभाज्या ह्या आदिवासी बांधवांच्या आवडीच्या भाज्या होय. नैसर्गिक रित्या पिकलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे आदिवासींमध्ये कमालीची प्रतिकार शक्ती होती. गोड अन्न पदार्थ हा फक्त सण समारंभाला मिळायचा नाहीतर तेही मिळत नसे. लगीनसराईत मोहाची दारू, ताडी पिणे.  तसेच परंपरागत लाभलेली आदिवासी नृत्यकला करणे हा एक त्यांचा मुख्य विरंगुळा होय. मुख्य सण म्हणजे आपला शिमगा असायचा ..!

अनेक मनोरंजनाचे साधने आपल्या पूर्वजांनी निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंपासून बनवल्या होत्या. उदा. तारपा, भेरी ( वाजवण्याचे साधन ), आपल्या जमातीत जवळपास 65 च्या आसपास जाती आहेत. त्यांचा एक प्रमुख असायचा. हा प्रमुख म्हणजे एक प्रकारचा सरपंच असायचा.।या प्रमुखाचा शब्द अगदी काटेकोरपणे पाळला जायचा. वाडी / वस्तीतील भांडणे मिटवणे, समारंभ पार पाडणे, दुःखिताचे सर्व सोपस्कार पार पाडणे ह्या गोष्टी ह्या प्रमुखाला बघाव्या लागत. सहसा वाद, भांडणे होत नसत. कारण समझोता हा निसर्गाकडून मिळालेला त्यांना एक महत्वाचा गुण होता. त्यांच्या वस्तीत खूप एकोपा असायचा. आक्रमकता सुद्धा वाघाप्रमाणे असायची.।आक्रमकता हा त्यांचा ब्रह्मास्त्र होते. आक्रमकता दाखवण्याची वेळ सहसा त्यांच्यावर कधी येत नसे. आणि जर आणीबाणीची गोष्ट आलीच तर समोरचा हार मानेस्तोवर त्यांचा पिच्छा सोडत नसत.

ही गोष्ट झाली स्वातंत्र्य पूर्व काळातील.।त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात खूप घडामोडी घडल्या. बाह्यजगाशी आदिवासींचा संपर्क वाढू लागला. बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडू लागल्या. वैयक्तिक स्वार्थासाठी स्वच्छन्दी, स्वतंत्र आदिवासींना व्यावहारिक जगात ओढण्याचा काही धूर्त, कपटी लोकांनी प्रयत्न केला. काहीतरी मर्यादा ठेऊन ते आदिवासी सोबत वागू लागले. म्हणजेच आदिवासींना शिक्षणापासून दूर ठेवले गेले. नाहीतर त्यांची गुलामगिरी कोण करणार !  तोपर्यंत पैसा हा आदिवासींच्या व्यवहारात आला होता .. हळूहळू एकत्र राहणारे आदिवासी बांधव विलग होऊ लागले. जंगलाशी असलेले नाते तुटू लागले. काबाडकष्ट, वेठबिगारी त्यांच्या नशिबी येऊ लागली. आदिवासी वस्तीतील प्रमुखाला सावकारांकडून चांगल्या प्रकारची व इतर आदिवासींना दुय्यम प्रकारची वागणूक मिळु लागली. त्यांच्या प्रमुखाची मुले शाळेत जाऊ लागली. इतर आदिवासींची पोर वीटभट्टी, ऊसतोडणीला आईबापाबरोबर उन्हातान्हात राबू लागली.

आजही इतिहासात डोकावून बघा जे ही काही आपले आदिवासी राजकारणी आहेत. मोठमोठ्या पगाराची नोकरी करत आहेत. त्यांच्या घरात पूर्वीपासूनच शैक्षणिक सुबत्ता होती म्हणूनच ..असो , विषय तो नाही की कुठल्या आदिवासींची किती प्रगती झाली तर महत्वाचा मुद्दा हा आहे की आदिवासी मागे पडला कुठे ?? तर त्याचे उत्तर तुमच्या मनात जे आले आहे तेच म्हणजे ‘शिक्षण’… होय शिक्षण ..! म्हणूनच  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही ..! ” सबंध लेखात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नसेल.  तर आदिवासी बांधव अजूनही एका गोष्टीत मागे पडले आहेत ते म्हणजे एकसंघपणा ! कारण संघटित झाल्याशिवाय  आदिवासी बांधवांची प्रगती होणारच नाही. आणि जर सर्व एकत्रपणे लढू लागलेच तर निस्वार्थ, परोपकारी नेतृत्वाला साथ देणे हे आपले कर्तव्य आहे. कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही आदिवासींवर राजकारण केले जाते. पण विशेष बाब अशी आहे की अजूनही असे तडफदार, निस्वार्थी, तरुण पुढे येत आहेत. हा आदिवासींच्या विकासाचा विडा उचलत आहेत , फक्त त्यांना ओळखण्याचा दृष्टीकोन बाळगा, योग्य व्यक्तीना साथ द्या …!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!