लग्नांमधील शाही पोशाखांमुळे लाखोंचा चुराडा : पडद्यावरचा शाही थाट जगण्यात नका आणू

लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटील, 9892162248

इच्छा अमर्याद असतात, त्या वास्तव जीवनात पूर्ण होणे शक्य नसले की व्यक्ती स्वप्न बघूनही समाधानी होऊ शकते. विवाह, जोडीदार, घर किंवा मौजमजा अशा बाबतीत आपण अनेकदा पडद्यावर बघून त्याची कल्पना करीत असतो. लग्नात असा आपला थाट हवा हे पडद्यावर बघून किंवा इतर लग्नात हजेरी लावून आपल्या डोक्यात फिट्ट बसत असते. त्यामुळे सिनेमा, मालिका, जाहिराती यांचा आपल्या जीवनातील 90 टक्के वेळेवर कब्जा असतो. त्यामुळे वास्तव आणि प्रभाव यात अनेकदा फरक करणे कठीण जाते. जे आपण सतत बघत जातो त्याला आपल्या जीवनाचा भाग समजत जातो. हे करताना त्याची आपल्याला गरज आहे का ? किंवा खिशाला परवडेल का ? याची पर्वा केली जात नाही. अलीकडे लग्नात मध्यमवर्गीय घरातील मुले बोहल्यावर जो ड्रेस घालतात तो आणि लग्नाचा थाट बघितला की असे वाटते की आपण जणू कुण्या शाही विवाहात तर आलो नाही ना ?

10 हजार ते 1 लाख रुपयांचा नवरदेव शाही पोशाख घातलेला असतो. मग नवरी का मागे राहील ? त्याच किमतीचा शालू, घागरा किंवा शाही पोशाख तिने केलेला असतो. एकदा लग्न आटोपले की पुढे अनेक वर्षे तो पोशाख कधीच घातला जात नाही. पण थाट शाही पाहिजे असतो. लग्न एखाद्या सरदार किंवा उमराव यांच्या घरचे वाटावे या थाटात होते. अगदी मुलगी पालखीतून आणणे, मंडपात मावळे उभे असणे, बोहल्यावर राजेशाही चवऱ्या ढाळल्या जाणे, हा सगळा काही तासांचा गेम असतो पण खिसा एकदम ढिला करून जातो. हे असले पडद्यावरचे नाटकी जगणे आपल्या जीवनात आणून आपण शेवटी आपण काय साधतो ? आठ दहा एकर शेती असणारा नवरदेव शाही फेटा, हाती तलवार, गळ्यात लटकणाऱ्या नकली मोत्यांच्या माळा हे सगळे कशासाठी ? कुणीतरी शेतकरी मुलाने याचा खोलवर जाऊन विचार करायला हवा. हे इतके सगळे करून फायदा काय होतो ? काहीच होत नसेल तर आपण भानावर येणार आहोत की नाही. लग्न एकदाच होते हे समाधानी वाक्य आणि वास्तव कधीच बदलत नसते. लग्न एकदाच करा की चारदा.. पण त्याचे नियोजन विचार करूनच व्हायला हवे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!