इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुक्यातील विविध भागात राष्ट्रीय किटकजन्य कार्यक्रमांतंर्गत हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमानुसार सहाय्यक संचालक हिवताप विभाग नाशिक कार्यालयाचे अधिकारी यादव बोराडे, आरोग्य सहाय्यक सुधाकर भामरे यांनी सर्वेक्षण व मार्गदर्शन केले. ह्या संपूर्ण कार्यक्रमानुसार हिवताप व इतर कीटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबर त्याच्या प्रतिरोध उपायांविषयी ग्राम पातळीवर माहिती दिली जाणार असल्याची माहिती यादव बोराडे यांनी दिली.
अॅनाफिलीस डासांची मादी चावल्याने हिवताप होतो. ह्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते. ताप, थंडी, घाम येणे, डोकेदुखी, मळमळ आदी त्याची प्राथमिक लक्षणे आहेत. हिवतापाच्या उद्रेकाने अनेक मृत्यू होत असतात. त्यामुळे प्रबोधन कार्यक्रम होत आहेत. नागरिकांनी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवून कीटकनाशक फवारणी करावी, घरावर पडलेल्या भंगार सामानाची विल्हेवाट लावावी, घरातील पाण्याच्या साठ्याला घट्ट झाकण लावून साठवलेले पाणी प्रवाहित करावे, ज्या ठिकाणी शक्य नाही, तेथे गप्पी मासे सोडण्यात यावे अशी माहितीही यादव बोराडे यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतंर्गत देवळे, प्राथमिक आरोग्य केंद्र काननवाडी अंतर्गत घोटी बुद्रुक येथे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली ठाकरे, डॉ. रवी क्षीरसागर, डॉ. तेजस्विनी मेदडे, डॉ. पुरी, समुदाय आरोग्य आधिकरी डॉ. बडगुजर, आरोग्य सहाय्यक रमेश आवारी, आरोग्य सेवक सागर दिंडे, श्रीमती गायकवाड, सागर थोरात, संदीप दिवटे, पंढरी इंगळे. मानसिंग पावरा, परसराम चौधरी, सागर गुंड, कल्पना इंदरके, भारती वानखेडे आदी उपस्थित होते.