भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा निवडणुकीला आता रोज जोर चढत आहे. १७ उमेदवार विधानसभेत जाण्यासाठी रात्रीचा दिवस करून मतदारांपर्यंत जाऊन प्रचारयंत्रणा राबवत आहे. आरोप प्रत्यारोप, वचन, गॅरंटी, आश्वासन, विकासकामाचा शब्द देऊन आपल्या पदरात मते देण्याचे आवाहन केले जातेय. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या आपल्या उमेदवारासाठी मेहनत घेताहेत. सोशल मीडियावरील वॉर सुद्धा रंगले असून ‘अर्थपूर्ण’ भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. प्रमुख लढत मविआ इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव, महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावित या चौघा उमेदवारांमध्ये होणार आहे. प्रत्येकाने ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. मीच आमदार होणार असा आत्मविश्वास प्रत्येकाला असून मतदार राजा मलाच कौल देईल असा विजयी आविर्भाव दाखवला जात आहे.
महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उबाठा आणि मित्रपक्षांतर्फे लकीभाऊ जाधव हे पंजा निशाणी घेऊन रिंगणात उभे आहेत. आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून राज्यभर आक्रमक आंदोलने, युवकांची मोठी फळी आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढाऊ युवक म्हणून ते परिचित आहेत. इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील युवकांची त्यांना मोठी पसंती लाभत आहे. तीन माजी आमदार विरुद्ध एक लढवय्या युवक, गरीब उमेदवार विरुद्ध श्रीमंत उमेदवार, सर्वांना संधी दिली एकदा मला देऊन पहा याप्रकारचा प्रचार त्यांच्याकडून केला जात आहे. गावोगावी त्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी लकीभाऊ जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणार असा निश्चय केलेला आहे. प्रियंका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभा घेण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून घड्याळ निशाणी घेऊन उमेदवारी करीत आहेत. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जातांना बऱ्याच प्रमुख नेत्यांची फौज ते घेऊन गेले. सूक्ष्म प्रचारयंत्रणा, गाठीभेठी, कोट्यवधीची विकासकामे, लाडकी बहीण योजना, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आदीच्या जोरावर त्यांनी दुसऱ्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. हिरामण खोसकर हा एक साधा माणूस असून मतदारसंघाला असाच आमदार हवा असा प्रचार प्रामुख्याने केला जातो. पाच वर्ष कार्यकाळातील अफाट संपर्क ही त्यांच्या जमेची बाजू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन घेऊन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे ‘अभी नही तो कभी नही’ समजून जोमाने मैदानात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्याने मनसेतर्फे त्यांनी आमदार होण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. प्रचंड लोकसंपर्क, स्वतःच्या मतपेढीवर भक्कम पकड, बिगर आदिवासी मतदारांवर विशेष छाप आणि मनसेचा अजेंडा घेऊन त्यांनी प्रचारात जोर घेतला आहे. महायुतीच्या नाराज गटाचा उघड छुपा पाठिंबा त्यांना मिळतोय अशी चर्चा आहे. मनसे आणि स्वतःची प्रचार यंत्रणा कामाला लावून विधानसभेत जाण्यासाठी त्यांचे ध्येय आहे. उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार निर्मला गावित यांची काँग्रेसतर्फे उमेदवारीची आशा धुळीला मिळाल्याने त्यांनी बादली निशाणी घेऊन इगतपुरीच्या आमदारकीवर अपक्ष दावेदारी केली आहे. दोन वेळा आमदारकीचा तगडा अनुभव, महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, विकासगंगा आणणाऱ्या आमदार आणि गावोगावी सक्रिय कार्यकर्ते ही त्यांची मोठी ताकद आहे. ह्या जोरावर तिसऱ्यांदा इगतपुरीची आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी व्युव्हरचना केलेली आहे. सक्षमतेने गावोगावी जाऊन त्या आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.