पाडळी देशमुखच्या धांडे कुटुंबाच्या उपोषणाची ४ थ्या दिवशीही प्रशासनाकडून दखल नाही : बिनशेती प्रकरणाच्या चौकशीसाठी इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू आहे उपोषण

इगतपुरीनामा न्युज, दि. १७

पाडळी देशमुख येथील गट नंबर ४२२ या गटातील काही क्षेत्र राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित क्षेत्र उताऱ्यावरून वजा न झाल्याचा गैरफायदा घेत ४२२ हा गट बिनशेती करण्यात आला. त्या बिनशेती प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आमरण उपोषणास बसलेल्या पाडळी देशमुख येथील धांडे कुटुंबाची प्रशासनाने आज ४ थ्या दिवशीही दखल घेतली नाही. उपोषण सुरूच असून न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष यांच्या पत्नीच्या नावे असणारे व महामार्गाच्या चौपदरीकरणात गेलेले क्षेत्र उताऱ्यावरून वजा न झाल्याचा फायदा घेऊन ही जमीन क्षेत्र बिनशेती झाली. ही प्रक्रिया सुरू असतांनाच व कोणत्याही सक्षम विभागाची किंवा ग्रामपंचायतची बांधकाम परवानगी न घेता ह्या गटात व्यापारी गाळे बांधुन त्या मागील शेतकरी योगीराज धांडे यांच्या शेतात जाण्यासाठी नियमाप्रमाणे रस्ता ठेवला नाही. सदर गटाबाबत वाडीवऱ्हेचे मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर न जाता चुकीचा व खोटा अहवाल बनवुन प्रशासनाची दिशाभुल केल्याचा आरोप उपोषणकर्ते धांडे यांनी केला. अनेकदा निवेदन देऊनही यावर कुठलीही कारवाई न झाल्याने उपोषण करण्याचा निर्णय योगीराज धांडे यांनी घेतला.

बिनशेती प्रकरणाची सनद उपोषणाआधी तहसीलदार यांनी रद्द तर केली मात्र या दरम्यान सदर प्रकरणाच्या आधारावर गाळ्यांचे बांधकाम मात्र अधिक वेगाने केले. यामुळे योगीराज धांडे या शेतकऱ्याने अन्याय झाल्याचे वेळोवेळी प्रशासनास सांगुनही यावर कुठलीही कार्यवाही झालीच नाही. त्यामुळे योगीराज धांडे व त्यांच्या कुटुंबाने नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन व इगतपुरीचे तहसीलदार यांना महिनाभर आधी निवेदन दिले. न्याय न मिळाल्यास सदर बिनशेती प्रकरणाच्या चौकशीसाठी उपोषण करणार असल्याचे निवेदनात सांगितले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी योगीराज धांडे व त्यांचे कुटुंब उपोषणास बसले. दुसऱ्या दिवशी १५ तारखेला राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी आपल्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून उपोषणस्थळी भेट देऊन सदर प्रकरणी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र अद्यापही यावर कारवाई झाली नाही. आमच्यावर अन्याय होत असुन आमच्या उपोषणाची चौथ्या दिवशीही कुणीही दखल घेतली नसल्याने न्याय मागायचा कुणाकडे ? प्रशासकीय स्तरावरून आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही आमच्या उपोषणावर ठाम असल्याचे उपोषणकर्ते योगीराज धांडे यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!