इगतपुरीनामा न्यूज : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाउघड गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यानूसार अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत आहे. पथकाने उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे सध्याचे राहण्याचे वास्तव्य याबाबत माहिती काढून समांतर तपास केला. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पथक त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील गुरनं २९७ /२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्ह्याचा समांतर तपास केला. ह्या गुन्ह्यात २१ नोव्हेंबरला त्र्यंबकेश्वर जव्हार फाटा परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यक्रमस्थळावरून कोणीतरी अज्ञात आरोपींनी गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी यशवंत महाले, रा. वाढोली यांची नवीन ह्युंडाई क्रेटा कारची चावी हातचलाखीने काढून चोरी केली होती. सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नवनाथ सानप यांना खबऱ्यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरीस गेलेली कार पाथर्डी, जि. अहमदनगर परिसरात असल्याचे निदर्शनास आले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर व बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती घेवून बीड शहरातून सराईत गुन्हेगार परशुराम मोहन गायकवाड, वय २४, रा. बीड यास पाळत ठेवून ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार तुकाराम अशोक पांचाळ, रा. अंकुशनगर, बीड याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील आरोपींकडून १५ दिवसांपूर्वी पाथर्डी शहरानजीक ह्या कारचा अपघात झाला असल्याचे समजले आहे. ही कार अपघातग्रस्त स्थितीत पाथर्डी पोलीस ठाण्यात जमा असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी परशुराम मोहन गायकवाड व त्याचा साथीदार तुकाराम अशोक पांचाळ हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, चारचाकी वाहने चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील ताब्यात घेतलेला आरोपी परशुराम गायकवाड यास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याचेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, पोकॉ विनोद टिळे, चापोना निवृत्ती फड यांच्या पथकाने ह्या गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group