इगतपुरीनामा न्यूज – गुरुदेव गुरुदत महाराज जन्मोत्सवाच्या मंगलमय पर्वावर महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी इगतपुरी येथील कानिफनाथ महाराज मठात हजेरी लावली. मागील आठवड्यापासून सुरु झालेला सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर बाळासाहेब भगत यांच्या यांच्या सुमधुर भक्तीगीतांचा आस्वाद भाविकांना मिळाला. आज सकाळपासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..कानिफनाथ महाराज की जय.. असे श्रद्धा ज्याच्या उरी.. त्यासी दिसे हा कानिफा मुरारी..नवनाथ महाराज की जय.. सावळीराम महाराज की जय…भाविकांच्या अशा अनेकानेक घोषणांनी इगतपुरी परिसर दत्त जन्मोत्सवानिमित्त दुमदुमला. हजारो दत्त आणि कानिफनाथ भक्तांनी दत्तजन्माचा जल्लोष केला. इगतपुरी येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ मंदिराचे सर्वेसर्वा ह. भ. प. सावळीराम महाराज शिंगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी शहरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवानिमित्त इगतपुरी शहरातून काढण्यात आलेल्या गुरुपादुका पालखी सोहळ्याने हजारो भाविक सहभागी झाले. बाल नवनाथ आणि बाल वारकऱ्यांच्या वेशभूषा भाविकांसाठी आकर्षण ठरल्या. गुरू पादुका पालखी सोहळ्यात बाल दिगंबर, बाल नवनाथ मिरवणूक काढण्यात आली. केशव महाराज भागडे यांचे हरिकीर्तन झाले. राज्यभरातील भाविकांनी रविवारपासून आजही दिवसभर हजेरी लावून विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला. इगतपुरी येथील सुप्रसिद्ध ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ मंदिराचे सर्वेसर्वा ह. भ. प. सावळीराम महाराज शिंगोळे यांच्या कुशल नियोजनाखाली आज दत्तजयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्त आठवड्यापासून शेकडो भाविकांच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली. उपस्थित भाविकांसाठी गुरुवर्य सावळीराम महाराज शिंगोळे आणि इतर तज्ज्ञ विचारवंतांनी आध्यात्मिक प्रबोधन केले. इगतपुरी शहरातून राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी गुरुपादुका पालखी सोहळ्यात दत्तगुरूंचा आणि कानिफनाथ महाराजांचा जयघोष केला. हजारो भाविकांनी दत्तजन्माचा महोत्सव साजरा केला. यानंतर हजारो भाविक भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ सेवा मंडळाने इगतपुरी परिसर आणि मंदिर भागात स्वयंप्रेरणेने चोख व्यवस्था ठेवली. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या गर्दीत कार्यक्रम सुरूच राहणार आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group