इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. १३ पैकी संपूर्ण १३ जागांवर गोरख बोडके यांनी संचालक बिनविरोध निवडून आणले. सामान्य शेतकरी आणि गावाच्या विकासाचा कणा असणाऱ्या मोडाळे सहकारी सोसायटीचे संचालक म्हणूनही गोरख बोडके यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे ह्या निवडणुकीत सामाजिक सलोखा, विविध जातींना प्राधान्य आणि समावेशक संचालक मंडळ मोडाळे गावाला लाभले आहे.
मोडाळे हे गाव जिल्हाभरात विकासाचे मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाले आहे. ह्या गावातील ग्रामस्थ विकासाच्या प्रक्रियेतील शिलेदार असून त्यांचे नेहमीच सहकार्य असते. यानुसार मोडाळे सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली १३ जागांसाठी फक्त १३ जणांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकरी श्री. पगारे यांनी १३ संचालक बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. संचालक मंडळात गोरख बोडके यांचा समावेश असून इतर सर्व संचालक मंडळात सर्व जाती धर्म आणि कामे करणाऱ्यांचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यात नवनिर्वाचित बिनविरोध संचालकांचे अभिनंदन सुरू आहे.
सध्याच्या काळात सर्व सहकारी सोसायट्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय क्षीण असून निवडणुकांचा खर्च झेपण्याची क्षमता नाही. अशा संस्थांना आधार देण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मोडाळे सोसायटी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यानुसार आज १३ पैकी सर्व संचालक बिनविरोध निवडून आल्याचे घोषित झाले. बिनविरोध निवडणुकांचा पायंडा सर्व सोसायट्यांनी सुरू करून एकोपा राखावा अशी माझी अपेक्षा आहे.
- गोरख बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य