वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
संपावर असलेल्या महिंद्रा कंपनीच्या कामगारांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर महिंद्रा कंपनीने एक महिन्यापुर्वी कामगारांना पगारवाढ व प्रॉव्हीडंड फंड देण्याचे मान्य करत कामावर घेतले होते. मात्र प्रत्यक्षात कंपनीने कामगारांची फसवणुक करून ना पगारवाढ दिली ना प्रॉव्हीडंड फंड दिला. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असुन कामगारांना न्याय देण्यासाठी कंपनी गेट बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
इगतपुरीतील महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीत गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सुमारे दोनशे स्थानिक कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. या कामगारांना कामगार कायद्यानुसार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील महिन्यात १४ दिवस कामबंद आंदोलन केले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांनी या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करुन या कामगारांना कामावर घेतले. या चर्चे दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने मागील १० ते १५ वर्षापासुन कामगारांचा थकीत असलेला प्रॉव्हीडंड फंड व पगारवाढ देण्याचे मान्य करत २ जुलैपर्यंत वेळ मागितला होता. यासाठी २ जुलै रोजी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांच्या बरोबर चर्चा करण्याचे मान्य केले होते.
मात्र २ जुलै रोजी ऐनवेळी कंपनी व्यवस्थापनाने चर्चा करण्यास नकार देऊन कंपनी आवारात पोलिस बंदोबस्त लावला. मनसेचे सरचिटणीस सचिन गोळे महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करण्यास कंपनी गेटवर जात असताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस पथकाने त्यांना अडवुन कंपनीच्या आत जाण्यास मज्जाव केला. यामुळे महिंद्रा कंपनी व्यवस्थापनेच्या विरोधात मनसेने दंड थोपटले असुन कामगारांना न्याय मिळवूनच देणार असल्याची ग्वाही मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी कामगारांना दिली. या प्रसंगी अध्यक्ष मनोज चहाण, कार्याध्यक्ष संतोष धुरी, सरचिटणीस सचिन गोळे, चिटणीस परशुराम साळवे, राकेश जाधव, उपचिटणीस तुषार जगताप, जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष मूलचंद भगत, भोलेनाथ चव्हाण, राज जावरे, सुमित बोधक, शत्रु भागडे आदी उपस्थित होते.