कोरोनासह अन्य कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी काय करावे ?

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे
संपर्क क्र. 9011720400
चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ
( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी )

न चिंती ते वैरी न चिंती’ अशी मराठीत एक म्हण आहे. कोरोनाच्या चौखूर उधळलेल्या संकटात जगणेच असह्य झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिवसागणिक या म्हणीचा प्रत्यय येतो आहे. मागील वर्षी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याच्या बातमीने देशाला हादरून सोडले. आणि पुन्हा एकदा “आत्महत्या” प्रश्न चव्हाट्यावर आला. त्यानंतर सर्रास बातम्या येऊ लागल्या आज याने आत्महत्या केली, उद्या त्याने..! लॉकडाऊनने भल्या भल्यांची मानसिक अवस्था इतकी बिकट होत गेली अनेक लोकांनी स्वतःसह संपूर्ण कुटुंबाला सुद्धा संपवलं.. असं का झालं ? याचा विचार करणे आवश्यक आहे.

सुरुवातीला एक महिन्याचा कालावधी असलेला लॉक डाऊन वाढत वाढत गेला. अनेक लोकांची रोजी रोटी गेली, व्यवसाय बंद पडले, पुढं कसं होणार, या सारख्या असह्य झालेल्या तणावातून नैराश्याचा जन्म होतो. आत्महत्येच्या रूपाने मृत्यूला कवटाळले जाते. गेल्या वर्षभरात ३०० लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. केवळ लॉकडाऊन मुळे म्हणा की कोरोनामुळे म्हणा पण आत्महत्या वाढताहेत. सतत वाढत जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण, एकटेपणा, केंव्हा काय होईल ? दूर कुठेतरी असलेल्या प्रिय व्यक्तीची काळजी अशा अनेक कारणामुळे मानसिक ताण तणाव वाढत गेला.

महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्याचे दिसते. रोजच बातम्या येऊ लागल्या. अजुन ही हे सत्र थांबत नाही. कोरोना झाल्यामुळे बरेच लोक मेले हे विदारक सत्य आहेच पण.. कोरोनामुळे देशात आणि राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ही आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. रोज रोज नव्या बातम्या येतात आत्महत्येच्या. हे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मागे एक बातमी वाचली. पुण्यात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांनी रात्री आपली जीवनयात्रा संपवली. आपल्यानंतर आपल्या मुलांचं कसं होईल या भीतीने स्वतः वडिलांनी स्वतःच्या मुलांना गळ फास लावून स्वतः सुद्धा फास लावून घेतला.

कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वच राज्यांमध्ये आर्थिक संकट आणि नैराश्येमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांचे मृतदेह सापडले. केरळमध्ये एका 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने ऑनलाइन क्लासला हजेरी लावण्यासाठी कॉम्प्युटर, स्मार्ट फोन नसल्यामुळे आत्महत्या केली. मध्यप्रदेशातील खंडवामधील एका व्यापाऱ्याने आपल्याच गोडाऊनमध्ये आयुष्याचा व्यवहार संपवला. उत्तर प्रदेशात भामौरा गावात चोवीस वर्षीय तरुणाने क्वारंटाईन असताना जीवनयात्रा संपविली. लॉकडाऊनच्या काळात भविष्याच्या चिंतेने गेल्या दोन-एक महिन्यात थोड्या थोडक्या नव्हे, तीनशेहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. यामध्ये गरीब, हातावर पोट असणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

भविष्यातील नफ्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यावसायिकांची आशा-आकांक्षा चक्काचूर झाली. गोरगरीब आणि मध्यमवर्गीय आर्थिक चणचणीच्या दुष्टचक्रात सापडले. गरीबावर तर मिळेल ते खाऊन जगण्याची वेळ आली. लॉकडाऊनचे हे संकट महिनाभरात दूर होईल म्हणता म्हणता तीन महिन्यांवर लांबले. त्यामुळे आधीच निराश झालेले लोक आणखी खच्चीकरणात पोहोचले. 

नुकतीच कोरोनाची दुसरी लाट आली आणि आधीपेक्षा ही अधिक कडक लॉकडाऊन झाले. रुग्णसंख्या सुद्धा वाढत गेली. आधीच खिळखिळी झालेली आर्थिक परिस्थिती अजुनच खालावली आहे. बेकारी ही वाढत गेली. तरुण पिढीला भविष्याची चिंता सतावत आहे. अनेक विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी वर्षानुवर्ष अभ्यास करत आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आधीच अभ्यासाचा ताण त्यात पुढे जाणाऱ्या परीक्षाची अनिश्चितता यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्यग्रस्त झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. काहींच्या मनात तसे विचार येत असतात.

गेले वर्षभर हॉटेल बंद आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाशी निगडीत आणि छोटे-मोठे कामगार, व्यावसायिक  बेकार आहे. भविष्याची चिंता मानसिक स्वास्थ बिघडवत आहे. अनेक कारखानदार, व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या करोडो लोकांना ‘उद्या’ची चिंता सतावत आहे. आपले सर्वस्व संपणार ही भीती भेसूर रूप घेते आहे आणि कुटुंबेच्या कुटुंबे नैराश्येच्या गर्तेत ओढली जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात तीनशे लोकांनी आत्महत्या केल्या असल्या तरी किती हजार किंवा किती लाख लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊन गेले असतील, याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. कुठे घरखर्च कसा चालवायचा हा प्रश्न, तर कुठे घरभाडे कसे भरायचे ही चिंता. लाखो लोकांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे कोरोना न होताही लोक मृत्यूला कवटाळत आहेत. मानसिक ताणतणावाचे हे बळी रोखायचे कसे ? पोटाच्या खळगीचा हा प्रश्न आहे. मानसिक तणाव दूर कसा करावा ? याविषयी सोशल मीडियावर येणारे मेसेज वाचून तो दूर होणार नाही. प्रयत्नांची शिकस्त करूनही कोरोनामुळे बळी जात आहेतच पण कोरोना रोजीरोटी हिरावून बळी घेणार असेल तर ते कसे रोखायचे ? यावर देश पातळीवर विचार करणे गरजेचे आहे कारण आज कोरोना सोबत मानसिक ताण तणाव देखील वाढले आहे. त्यांचे परिणाम ही गंभीर स्वरूपाचे दिसून येत आहे.

ह्या महत्त्वाच्या दक्षता लक्षात घेतल्या तर निश्चितच आत्महत्या रोखता येतील

1. आर्थिक अडचण, कौटुंबिक मालमत्तेतील वादात झालेली फसवणूक, वेगवेगळ्या कारणांनी समाजात, कुटुंबात होणारी मानहानी अशी वरक करणी न दिसणारी अनेक कारणे या घटनांच्या तळाशी असतात. त्यांचा वेळीच शोध घेऊन संबंधित व्यक्तीचा ताण कमी केल्यास, त्याला आधार दिल्यास अशा घटना रोखता येतील.

2. आत्महत्या ही एका रात्रीत किंवा एका दिवसात घडून येणारी प्रक्रिया नाही. बराच काळ नैराश्यग्रस्त असते अशा व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यास व्यक्तीचा बराच ताण कमी होऊ शकतो. त्यांना मानसिक आधार दिल्यास निश्चितच आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते.

3. एखादी व्यक्ती सतत आत्ममग्न सेल, उदास, निराश असेल दुःखी असेल अशा व्यक्तीला तिच्या आप्तस्वकीयांनी भावनिक आधार दिला पाहिजे. व्यक्तीला सतत बोलते करून सकारात्मक विचारांची ऊर्जा तिच्या आजूबाजूला निर्माण केली पाहिजे.

4. आत्महत्येचा विचार मनात आला की व्यक्ती आत्महत्या करत नाही. अनेक दिवस तिच्या मनात विचार ठोकून असतो. बऱ्याच व्यक्ती आत्महत्येचे विचार देखील बोलून दाखवत असतात. अशा व्यक्तींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष न करता आधार दिला पाहिजे. अशा व्यक्तीला एकटे न सोडता सतत कोणीतरी तिच्या आजूबाजूला असले पाहिजे. जेणेकरून व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येणार नाही. “हसा आणि हसवा” ही कला प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करावी. जेणे करुन जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची प्रवृत्ती निर्माण होईल.

६. पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच “आव्हानं” स्वीकारण्याची सवय लावली पाहिजे ; जेणेकरून मुले  भविष्यकाळात अपयश आले तरी, पराभवाने खचून न जाता त्याचा सामना करू शकतील.

. खिलाडू वृत्ती अंगी बाळगा, जेणेकरून कोणत्याही कठीण परिस्थितीला  सामोरे जाण्याची व्यक्तीची मानसिकता तयार होईल.

. रोज प्रत्येक किमान 30 मिनिटे योगा व्यायामाची सवय लावा. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल.
थोडक्यात “यश आणि अपयश’ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जीवनात चढ-उतार हे येतच असतात. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. घरी राहा, सुरक्षित रहा

खालील लिंकवर क्लिक करून विडिओ पाहता येईल.

https://youtu.be/psBdHWGrba8

( लेखिका डॉ. कल्पना श्रीधर नागरे ह्या चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची सेट नेट मानसशास्त्र, मनोविकृती मानसशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. )