“एल्गार” आणि पालकांच्या दणक्यामुळे मुख्याध्यापकाला बनवले पिंप्री उर्दू शाळेतील पर्यायी शिक्षक : गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी आणि शिक्षकांत समन्वय नसल्याने नाराजी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पहिली ते सहावीच्या वर्गासाठी एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आज आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत लक्ष घातले होते. चालढकल आणि दिशाभूल करणाऱ्या घडामोडी घडवत अखेर इगतपुरीच्या शिक्षण विभागाने ह्या शाळेत एक शिक्षक पाठवला आहे. कायम व्यवस्था होईपर्यंत हा शिक्षक कार्यरत राहील असे आश्वासन देण्यात आले. विशेष म्हणजे ज्या शिक्षकांना ह्या शाळेत अध्यापन करण्यासाठी नेमले गेले होते त्या शिक्षकांनी वेळकाढूपणा केला. ते उपस्थित होतच नसल्याचे पाहून तारांबळ उडालेल्या शिक्षण विभागाने इगतपुरी शाळेतील मुख्याध्यापकांना ह्या शाळेत शिकवण्यासाठी पर्यायी शिक्षक म्हणून पाठवले. विना शस्त्र, विना परवानगी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करण्याची अप्रत्यक्ष धमकी देणाऱ्यांना आंदोलकांनी जुमानले नाही असे एल्गारचे अध्यक्ष भगवान मधे यांनी म्हटले आहे. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी शुक्रवारी ह्या शाळेसाठी इगतपुरी शाळेतील शिक्षकांना आदेश दिले होते. ह्या आदेशाचे पालन न करता संबंधित शिक्षक पिंप्री शाळेत आलेच नाही. आदेशाचे अनुपालन न करता अधिकाऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या ह्या शिक्षकांवर काय कारवाई करणार असा सवालही भगवान मधे यांनी विचारला आहे. 

पिंप्री सदो उर्दू शाळेतील विद्यार्थी आणि पालक पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शेळ्या वळण्याची परवानगी द्या किंवा शिक्षक द्या ह्या मागणीसाठी आज आंदोलन करणार होते. हे आंदोलन थांबवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. सकाळी दहा वाजेपासून अधिकारी वर्गाने फक्त पंधरा मिनिटात शिक्षक शाळेत येईल असे अनेकदा खोटे सांगितले. आंदोलन थांबवण्यासाठी विस्तार अधिकारी अशोक मुंढे यांनी विद्यार्थ्यांना वर्गात बसवा, शिक्षक येतोय असे सांगितले. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि शिक्षक यांच्यात समन्वय नसल्याने १२ वाजून गेले तरी शिक्षक आला नसल्याने पालक चिडले. अखेर बचाव म्हणून चक्क इगतपुरी शाळेतील मुख्याध्यापकांना पर्यायी शिक्षक म्हणून ह्या शाळेत पाठवण्यात आले. या सर्व प्रकारामुळे शिक्षण विभागाचा कारभार उघड झाला आहे. दिलेले शिक्षक नियमित उपस्थित न झाल्यास सूचना न देता आक्रमक आंदोलन करू असे पालक म्हणाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नर्गिस पटेल, उपाध्यक्ष अब्बास पटेल, सामाजिक कार्यकर्ते अमजद पटेल,  तंटामुक्त समिती अध्यक्ष बबलू उबाळे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप उबाळे, मतीन पठाण, शहानवाज पटेल, इम्तियाज पटेल, नवनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!