रविवार विशेष : खेळातून आरोग्याकडे

लेखक : ना. सा. येवतीकर

राज्यातील अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. शहरी भागात तर उंचच्याउंच टोलेजंग इमारतीत शिपटमध्ये शाळा भरवल्या जातात. खेळण्यासाठी मैदान बघायला ही मिळत नाही. ग्रामीण भागात देखील हळूहळू खेळाचे मैदान कमी होत आहे, ही खरच एक दुःखाची बाब आहे. मैदान नसल्यामुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहतात. ज्या शाळांना मैदाने नाहीत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांनी मैदान उपलब्ध करून द्यायला हवे. तर काही मैदानांना हेरिटेजचे स्वरूप आले आहेत. खेळाचा प्रसार होण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात खेळाचा स्वतंत्र विषय म्हणून समावेश करावा. मैदाने ही मुलांच्या खेळासाठीच असावेत, खेळाचे महत्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा त्यामुळे खेळाचा चांगल्याप्रकारे प्रसार होऊ शकेल. सध्याची पिढी मैदानाऐवजी मोबाईलवर जास्त दिसते. मोबाईलवर गेम खेळून त्या मुलांना अकाली वृद्धत्व येत आहे. म्हणजे शालेय जीवनातच त्यांना डोळ्यांना चष्मा लागत आहे. तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम तुम्हाला मिळत असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीयांनी आपले विचार बदलले तरच आपल्याला चांगले परिणाम पाहायला मिळतील. लहान मुलांनी मस्ती करणे मित्रासोबत वेळ घालवणे दंगा करणे तितकेच आवश्यक आहे, जेवढा आपणांस अभ्यास वाटतो. आपली शक्ती योग्य गोष्टींमध्ये आपण गुंतवायला हवे असे परखड मत भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मिशन यंग अँड फिट इंडियाच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल तसेच स्वतःच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासारखे अनेक भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या खेळाच्या कौशल्यावर आपले नाव तर प्रसिद्ध केलेच त्याशिवाय भारताचे नाव देखील जगजाहीर केले. तसे पाहिले तर मुलांना खेळ हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. खेळ असा शब्द जरी मुलांसमोर उच्चारला गेला तरी मुलांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. खेळाची आवड नसलेली मुलं शोधून काढणे फार मोठे अवघड काम आहे. वास्तविक पाहता आपल्या शरीरासाठी खेळ सर्वात महत्त्वाचे आहे. खेळल्यामुळे नकळत शारीरिक हालचाल होते आणि आपण सुदृढ व तंदुरुस्त बनतो. आपले शरीर चांगले असेल तर आपली बुद्धी सुद्धा चांगली असते. Sound in Body is Sound in Mind असे इंग्रजीत म्हटले आहे ते या अर्थानेच. आपले शरीर निरोगी व बळकट ठेवण्यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. आपण खेळ खेळलो म्हणजे आपल्या अंगात असलेली ऊर्जा संपते आणि शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करण्यासाठी काहीतरी खावे लागते. अर्थात खेळल्याने जोराची भूक लागते. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांविषयी तक्रार करतात की, भूकच लागत नाही, काही जेवतच नाही. तर त्याचे कारण म्हणजे त्याला मनसोक्त खेळायला मिळत नाही. खेळ खेळावे पण काही मर्यादित वेळेत, खेळावे म्हणजे सदानकदा खेळत राहणे हे सुद्धा वाईट आहे. शाळेत जाणाऱ्या बहुतांश मुलांना खेळायला वेळच मिळत नाही अशी तक्रार ही काही मुले करतात, तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटणारच. पण मुलांचे वेळापत्रक जवळून निरखून तपासून पाहिल्यास त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे असे वाटते. बहुतांश मुलांना सकाळच्या अगदी सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर शिकवणीला जावे लागते. शिकवणीहुन परत आले की त्यानंतर शाळेची तयारी करून शाळेला जाणे आणि शाळेत खेळासाठी अर्ध्या तासाची फक्त एकच तासिका असते त्यात कधी खेळायला मिळते तर कधी वर्गातच बसून राहावे लागते. सायंकाळी घरी गेल्यावर गृहपाठ करण्यात तासभर निघून जातो तोच सायंकाळच्या शिकवण्याची वेळ होते. रात्री नऊ किंवा दहा वाजता शिकवणी संपून घरी आले की जेवण करा आणि झोपी जा. अशा वेळापत्रकात त्यांना खेळायला फार कमी वेळ मिळते. त्यामुळे आजची मुले आरोग्याच्या बाबतीत फारच कमकुवत निघत आहेत. मोबाईलवरील किंवा संगणकावरील गेम खेळायचा प्रचंड नाद मुलांना लागत आहे, ही वाईट सवय आहे. सर्वात पहिल्यांदा आई-बाबांची किंवा भाऊ-बहिणीच्या मोबाईलला अजिबात हात न लावण्याची शपथ घ्यावी व त्याची अंमलबजावणी करावी. त्यापेक्षा बाहेर सायकल फिरवणे, पळणे, जोरात चालणे, क्रिकेट खेळणे मित्रांसोबत उड्या मारणे व गप्पा मारणे केव्हाही चांगले हे आपल्या शरीराला तारक आहे. मात्र मोबाईल किंवा संगणक आपणासाठी मारकच ठरतात. त्यामुळे ऋतुमानानुसार खेळल्या जाणाऱ्या खेळाकडे लक्ष द्यावे. अभ्यासासाठी जसे वेळ देतो आपण तसे खेळासाठी सुद्धा वेळ राखून ठेवावे म्हणजे अभ्यास करताना ताजेतवाने वाटते. शरीर बळकट, तंदुरुस्त आणि नेहमी क्रियाशील ठेवण्यासाठी मुलांनी आपले आवडते खेळ खेळत राहणे अत्यावश्यक आहे. शारीरिक स्थिती मजबूत असेल तर आरोग्य देखील मजबूत असते. अन्यथा ऐन परीक्षेच्या दिवसात आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक तथा स्तंभलेखक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!