घोटीतील जनता कर्फ्यु यशस्वी व्हायला पर्यायी बाजारपेठा उपयुक्त अन घातकही

लेखन : श्री. विठोबा दिवटे पाटील, नांदूरवैद्य

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील विविध भागात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. घोटी शहरात शुक्रवार, शनिवार अन रविवार असे 3 दिवस जनता कर्फ्यु लावण्यात आलेला आहे. घोटी ही तालुक्याची मुख्य असलेली बाजारपेठ, नेहमी वर्दळ, गजबजाट असलेले हे शहर सद्यस्थितीत सामसूम झालेले दिसून येतंय. शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झालेले दिसत असून सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. असे असले तरी इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात बदललेल्या काळानुरूप अनेक बाजारपेठा निर्माण झाल्या. ह्या बाजारपेठांमुळे ग्रामीण लोकजीवन समृद्धीकडे वाटचाल करीत असले तरी कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी येथेही निर्बंधांचा अंकुश गरजेचा आहे. म्हणजेच घोटी बंद असली म्हणून काय झाले ? पर्यायी बाजारपेठा असल्यावर चिंता कसली ? अशी बेफिकीर प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे.
काही वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील जनता प्रत्येक बाबतीत ह्याच घोटी शहरावर अवलंबून होती. किराणा, दवाखाना, शाळा, कपडे, बिल्डिंग मटेरिअल, मेडिकल, हार्डवेअर, बी-बियाणे, खते, कीटकनाशके अशा सुईपासून ते सुईच्या धागेदोऱ्या पर्यंत सर्वच वस्तूंसाठी घोटी शहरावर विसंबून होते. मात्र काळाच्या ओघात ह्याच तालुक्यातील प्रमुख ठिकाणे असलेली साकुर फाटा, कवडदरा, टाकेद बुद्रुक, धामणगाव, परदेशवाडी-खेड फाटा, पिंपळगाव मोर, अस्वली स्टेशन, गोंदेदुमाला, वाडीवऱ्हे, आहुर्ली, वैतरणा, मुंढेगाव, मोगरेफाटा ते बांडेवाडी इत्यादी ठिकाणी बाजारपेठा उभ्या राहिल्या. आताच्या काळात तालुक्यातील जनता घोटी शहरावर अवलंबून असण्याचं प्रमाण त्यामानाने कमी झाल्याचं दिसून येतंय. छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी उठसुठ घोटीला येणारा माणूस आता ह्या उपलब्ध बाजारपेठामुळे जवळच वस्तू खरेदी करू लागलाय. परिणामी बाजारपेठेचे विकेंद्रीकरण झाल्याने घोटीत घोषित होणारा जनता कर्फ्यु अन त्याची दाहकता त्यामानाने कमी झाली असं म्हणायला हरकत नसावी. मात्र भात-तांदळाची, अन भाजीपाला विक्रीची प्रमुख बाजारपेठ म्हणून आजही घोटीला पर्याय नाही. त्यामुळेच शेतकरी वर्गाला त्याचा दणका दरवेळी बसतांना दिसून येतोच. शेतकऱ्यांना सुद्धा पर्यायी बाजारपेठ निर्माण होण्याची निकड आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोटी शहरात गर्दी करणारा नागरिक आता पर्यायी बाजारपेठांचा वापर करू लागल्याने घोटीत कर्फ्युची दाहकता कमी आहे. मात्र उद्रेक थोपवायचा असेल तर इतर पर्यायी भागात होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन होणे गरजेचे ठरते. ( लेखक कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक असून प्रगतिशील शेतकरी आणि विचारवंत आहेत. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!