इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
त्र्यंबकेश्वर येथील मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत ‘सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत लोंढे, सर्पमित्र मयुरेश दीक्षित, समन्वयक प्रा. डॉ. शरद कांबळे, उपप्राचार्य सुरेश देवरे उपस्थित होते. डॉ. भागवत लोंढे ‘सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, किमान दोन लाख लोकांना वर्षभरात सर्पदंश होऊन त्यापैकी पन्नास हजार लोकांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. म्हणून जनजागृतीतून माहिती मिळाली तर हे मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी साप हा प्राणी अतिशय महत्त्वाचा आहे. तो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून अप्रत्यक्ष काम करत असतो. त्यामुळे साप चावल्यानंतर लवकरात लवकर वैद्यकीय इलाज करून प्राण वाचवावेत असे याप्रसंगी सांगीतले.
सर्पमित्र प्रा. डॉ. शरद कांबळे यांनी ‘भारतातील साप विविधता अडचणी आणि उपाय’ याविषयी सांगीतले की, बिनविषारी सापांची संख्या सर्वाधिक असून विषारी सापांची संख्या कमी प्रमाणात आहे. यासह अंधश्रद्धा, सापांची तस्करी, सापांचे प्रजनन, साप व त्याचे वर्तन, साप चावल्यानंतरच्या खुणा व त्यावर केला जाणारा प्रथमोपचार, साप पकडण्याचे प्रशिक्षण अशी सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्पमित्र मयुरेश दीक्षित म्हणाले की, त्र्यंबकेश्वर भागात संर्पदंशाने अनेक लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे सर्पमित्राशी संपर्क करून जीव रक्षण करण्यास मदत होऊ शकते. प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये शेताची कामे हंगामी असतात. त्या हंगामात शेतीची कामे करताना काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी सापांविषयी समाजात जनजागृती व्हावी. ट्रेकिंग, दलदल, शेतीची कामे याठिकाणी सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता त्या रुग्णावर तात्काळ उपाययोजना करून उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. उपप्राचार्य प्रा. सुरेश देवरे यांनी सापाचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे राहण्याचे ठिकाण, सापांविषयी समज- गैरसमज याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांबाबत चर्चा केली. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी समाधान गांगुर्डे यांनी, सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर माळे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. आशुतोष खाडे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.