इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
सामान्य जनतेसाठी २४ तास सुद्धा कमी पडत असणारे व्यक्तिमत्व म्हणून गोरख बोडके यांचा नेहमीच अभिमान वाटतो. कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बाजार समितीमध्ये कायमच अग्रेसर राहून त्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात. जिल्हा नियोजन समितीवर त्यांची झालेली निवड शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना साकार व्हायला उपयुक्त आहे. गोरख बोडके माझे लहान भाऊच असून उत्तरोत्तर त्यांच्या हातून लोकाभिमुख काम नक्की घडेल असे प्रतिपादन काँग्रेस नेते तथा घोटी बाजार समितीचे मुख्य प्रशासक ॲड. संदीप गुळवे यांनी केले. बाजार समितीचे उपसभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याच्या अनुषंगाने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
अनेक पदे येतील आणि जातीलही पण पदाला न्याय देता आला पाहिजे. पदाचा उपयोग सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी व्हायला हवा. ह्या दृष्टिकोनातून माझ्या हातून निश्चितच अनेक कामे होत आहेत आणि होतीलही. समाजाचे माझ्यावर ऋण असून ह्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नेहमीच कटिबद्ध राहील.
- गोरख बोडके, नूतन जिल्हा नियोजन समिती सदस्य
त्यांनी पुढे म्हटले की, इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक विकासकामे आणण्यासाठी अविरत झटणारे गोरख बोडके यांची नियोजन समितीवर झालेली निवड खूपच मोठी अभिमानास्पद बाब आहे. ह्या माध्यमातून आगामी काळात शेतकरी हिताची कामे उभी राहणार असल्याचा विश्वास वाटतो. यावेळी प्रशासकीय मंडळाचे संचालक नंदलाल भागडे, सुदाम भोर, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, सरपंच काशिनाथ कोरडे यांची भाषणे झाली. याप्रसंगी संचालक नाना गोवर्धने, बाजार समितीचे सचिव जितेंद्र सांगळे, ज्ञानेश्वर कातोरे, विठोबा दिवटे, विजय पगारे, रमाकांत कातकाडे आदी उपस्थित होते.