– श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
कोरोनाचे संक्रमण आता बहुतांशी वाढू लागले आहे. गेल्या वर्षभर आपल्याला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात असणाऱ्या मोठ्या मोठ्यांना ह्या आजाराशी तीव्रतेने सामना करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. कोरोना वाढण्यासाठी बेशिस्तपणा, फाजील आत्मविश्वास कारणीभूत तर आहेच पण अजूनही इतर अनेक कारणे आहेत. पैकी एक महत्वाचे कारण म्हणजे व्यक्तीकडे ध्येय निश्चित केलेले नसणे हे होय.
प्रत्येकाने आणि कोरोना बाधित व्यक्तीने आपला “गोल” सेट केलेला असेल तर बाधित होण्यापासून तो वाचेलच पण मृत्यूच्या दारातून सुद्धा त्याचा “गोल” त्याला निश्चितपणे वाचवू शकेल. यासह त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून त्याच्यावर “पॉझिटिव्ह” विचारांचा प्रभावी वापर केला तरी तो वाचू शकतो हे अनेक अनुभवांच्या आधारे मी सांगू शकतो. ज्या रुग्णालयात रुग्ण अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत असतो त्यावेळी त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क खंडित असतो. अशा वेळी संबंधित रुग्णालयात सकारात्मक विचार पेरणारा समुपदेशकाडून रुग्णांशी संवाद आणि रुग्णाच्या खोलीमध्ये रुग्णालयाने निर्मित केलेले सकारात्मक अनुभवांचे विडिओ टीव्हीवर सुरू ठेवल्यास अत्यवस्थ रुग्ण त्यातून प्रेरणा घेऊन लवकर बरा होऊ शकतो. अशा बिकट प्रसंगी संबंधित रुग्णाने स्वतः निश्चित केलेला “गोल” त्याला वारंवार स्मरण करून ह्यासाठी तुला जगायचं आहे असे अंगी बाणवले तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर फैलावत असलेला कोरोना आपल्यातून अनेक चांगल्या व्यक्तिमत्वांना हिरावून नेतो आहे. एक झाले तर दुसरे लगेचच ऐकायला मिळते. परिणामी जनतेमध्ये अभूतपूर्व घबराट पसरली आहे. शासनाच्या लॉकडाऊनला जो स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळायला हवा तो मिळत नाही. काही दिवस घरातल्या अन्न धान्यावर काढले तर काही बिघडणार नाही पण कर्ता पुरुष जगला पाहिजे हे ध्यानात घ्यायला हवे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य होईल तितकी कामे घरातून करण्याऐवजी टाईमपास करण्याचा मुंगळा असणारे लोक संक्रमणाच्या जाळ्यात सापडतात. मग संपूर्ण कुटुंब बाधित होतांना आपण पाहत आहोत. आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी, मुले आदींना संकटामध्ये ही मंडळी तर टाकतातच पण स्वतः कुटुंबाचा आधारवड असतांना स्वतःलाही मरणाच्या दारात नेऊन ठेवतात. अशा मंडळींमध्ये मला माझ्या कुटुंबासाठी काय करायचंय ? माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय स्वप्न आहेत ? भावाचे बहिणीचे लग्न थाटात करायचे आहे, मला माझे हक्काचे घर बांधायचेय, माझी मुले मोठे अधिकारी करायचे आहे, आईवडिलांना सुख द्यायचे आहे अशा प्रकारचा एकही “गोल” सेट नसतो. गोल सेट असणारे लोक काहीही करून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यानुसार प्रत्येकाने आपला “गोल” सेट करून त्यावर अंमलबजावणी प्रक्रिया केल्यास कोरोनाच्या अक्राळविक्राळ जबड्यात जाण्यापासून तो व्यक्ती दूर राहू शकतो. एवढं सगळं करूनही कोरोनाचे संक्रमण झालेच तर जास्त चिंता करण्याची गरज नाही.
चिता चिंता समाप्रोक्ता बिंदुमात्रं विशेषत: ।
सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता: ।।
संस्कृतमध्ये असलेल्या ह्या सुभाषिताचा अर्थ असा आहे, चिता आणि चिंता या दोन शब्दांमध्ये फक्त एका टिंबाचाच फरक आहे. जिवंत व्यक्ती चिंतेत जळतो तर मृत व्यक्ती चितेत जळतो.
कोरोना बाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी बरेच रुग्ण निव्वळ चिंतेनेच पोखरून जातात. त्यांच्या मनात एकटे पडल्याचे द्वंद्व निर्माण होते. मला कोरोना झाला, आता सगळे संपले अशी धारणा होते. यातच जर त्याच्याकडे काहीतरी एखादा “गोल” नसेल तर त्याच्यात जगण्याची उर्मी दिसून येत नाही आणि येथेच कोरोना खऱ्या अर्थाने त्याच्यावर स्वार होतो. यासह उपचाराचे सोपस्कार सुरू असतात, उपचार करणारे डॉक्टर, नर्स आदी व्यक्ती आपलं काम करून निघून जातात. त्याला घरच्यांशी, प्रिय जणांशी काहीतरी बोलायचं असतं. घरच्यांनाही त्या व्यक्तीशी बोलायचे असते. अशावेळेस कुटुंबीयांनी, मित्रांनी कुठल्याही नकारात्मक गोष्टी न बोलता त्याला धीर देऊन, त्याचे मन हलके करून तो निश्चितच कोरोनावर मात करून घरी येणार आहे आणि आपले जीवन पुढे पहिल्यासारखे बनणार आहे हे समजावणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीला त्याचा “गोल”ची वारंवार आठवण सुद्धा कोणीही करून द्यावी म्हणजे त्यातून त्याला जगण्याची उर्मी मिळेल.
पण होते उलटेच. परिणामी अत्यवस्थ व्यक्ती अधिकाधिक अत्यवस्थ होतो आणि जगण्याची आशा सोडतो.
80 ते 99 वर्षांपर्यंतचे अनेक कोरोना बाधित अत्यवस्थ रुग्ण फक्त त्यांच्या “गोल” मुळे कोरोनाचा सामना करून धडधाकटपणे घरी आल्याची अनेक उदाहरणे आहेत. गोल सेट तर करावाच पण रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोना कक्षात रुग्णांशी आपुलकीने 2 मिनिट का होईना बोलणारा समुपदेशक असायला हवा. हा समुपदेशक त्या रुग्णाला जगवण्यासाठी “पॉझिटिव्ह” विचारांची पेरणी करेल. यासह घरच्या जिवलग लोकांना नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या व्हिडिओ कॉलच्या आधारे बहुतांशी शक्ती निर्माण करील. त्या कक्षात टीव्हीवर संबंधित रुग्णालयाने तयार केलेले सकारात्मक व्हिडिओ ( उदा. पहा हा 80 वर्षाचा व्यक्ती कसा दाखल झाला, कसा व्यवस्थित होऊन घरी गेला ) असे विडिओ पाहून रुग्णात निर्माण झालेला आत्मविश्वास त्याला जगण्यासाठी वरदान ठरू शकतो. एखाद्या मित्रांसोबत फोनद्वारे रुग्णाला त्याच्या ध्येयाचे स्मरण सतत करून दिल्याचेही अनेक फायदे होतात.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर अशा प्रकारे “पॉझिटिव्ह” विचारांचा उतारा बहुगुणी ठरू शकतो. माझ्या लेखात व्यक्त केलेल्या मता व्यक्तिरिक्त अजूनही काही चांगले उपाय योजून आपल्याला वेगळ्या ढंगाने कोरोनाचा लढा तीव्रतेने लढता येऊ शकतो. सोशल मीडियामुळे अनेकांकडे अशा ” पॉझिटिव्ह” कला आहेत. ह्या कलांद्वारे कोरोनाशी संबंधित सकारात्मक व्हिडीओ, लघुपट, ऑडिओ क्लिप, बॅनरचा सुद्धा उतारा अनमोल ठरू शकतो.
लेखकाशी संपर्क – 9881258443, bhaskarsonawane8443@gmail.com
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी
कोरोनाच्या वाढत्या महामारीपासून बचावासाठी आणि लवकर रोगमुक्त होण्यासाठी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी प्रभावी असल्याचा माझा आणि अनेकांचा अनुभव आहे. ही औषधी आपल्या जवळच्या मेडिकल स्टोअर, अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 7057235819.

खरंय माऊली
आज खरोखर कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांना पॉझिटिव्ह विचारांचा उतारा महत्वाचा आहे… धीर देणं, आधार देणं सर्वात महत्वाचं आहे.
अगदी खरं आहे माऊली. प्रत्येकाने आपला गोल सेट करायला हवा. अशा परिस्थिती मध्ये घाबरून जायला नकोय. आणि तुमच्या या लेखातील माहितीमुळे रुग्णाची अर्धीच्या वर मानसिकता उभी राहू शकेल.
एकदम पॉझिटिव्हली लेख आहे. खूप सार्या महत्वपूर्ण गोष्टी ची माहिती मिळाली.
संपादकीय लेख आवडला.
धन्यवाद सर
धन्यवाद मॅडम
धन्यवाद सर
धन्यवाद कैलासजी
खुप छान माहिती आहे..
माऊली.. आपण ह्या माध्यमातून खुप लोकांना वाचवले जाण्यासाठी उपयुक्त असे लिखाण केले आहे.
आपला लेख प्रेरणादायी असून सर्वांनी जर सकारात्मक विचारसरणी, काळजी व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवल्यास सर्वांवर आलेल्या कोरोनारूपी राक्षसाचा नक्कीच नायनाट करू… तसेच गोल सेट केल्यास निश्चित ध्येय प्राप्त करू 👍
धन्यवाद सर
धन्यवाद नाना
अनेक अनुत्तरित असणाऱ्या गोष्टींची उत्तरे काही क्षणार्धात मिळाली…👌
धन्यवाद
सध्या कोरोनाच्या चालू असलेल्या थैमानामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण झालेलं आहे. असं असतांना अशा सकारात्मक विचारांची गरज आहे. प्रेरणा देणाऱ्या शब्दांत अफाट ताकद असते. असे शब्द रुग्णाला नवसंजीवनी देणारे ठरू शकतात. रामबाण औषधाचे काम करू शकतात. सोशल मिडियातुन सध्या सततच्या शोक संदेशांमुळे खूप नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यावरही प्रबोधन होईल असे आपले मौलिक विचार मांडावे ही आपल्याला विनंती आहे.
धन्यवाद सरजी…!
शोक संदेशांमुळे नकारात्मकता वाढीची बीजे रोवली जाताहेत. त्यामुळे शोक संदेश सध्यातरी थांबवावेत अशी भयाण स्थिती आहे. लवकरच ह्यावर आपल्या सूचनेनुसार लिखाण करूयात.
धास्तावलेल्या प्रियजनांसाठी अत्यंत मोलाचा असा हा लेख दोन-तीन वेळा निवांत वाचल्यावर लक्षात येईल…की सकारात्मक विचार केल्यावर..त्याचे चांगलेच परिणाम होत असतात..छान लेख आहे….
आदरणीय साहेब, मनस्वी धन्यवाद…!
सर्वांनी जर ह्या ३ गोष्टी आचरणात आणल्या तर कोरोनाची साखळी तुटायला वेळ लागणार नाही. १ )अंतर ठेवणे २ )वारंवार हात धुणे ३) मास्क लावणे
ही सर्वांची सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आहे. बाधित रुग्णाला धीर देण्याचीही फार गरज आहे.