शिक्षक समितीतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हा परिषद अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षकांच्या प्रश्नांवर लक्ष घालून न्याय मिळण्यासाठी झाली चर्चा

दीपक भदाणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

प्राथमिक शिक्षकांचे दरमहा होणारे मासिक वेतन उशिरा होत असल्याने मोठ्या अडचणींना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे. याप्रश्नी नाशिक जिल्हा शिक्षक समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य लेखा वित्त अधिकारी महेश बच्छाव यांना विविध प्रलंबित विषयांवर स्वतंत्र निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनाही निवेदन देण्यात आले.

लेखाधिकारी यांनी तात्काळ या विषयाशी निगडित ऑफिसमधील कर्मचार्‍यांना बोलावून सूचना केल्या. मात्र ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने आपण CMP प्रणाली साठी प्रयत्न करावे असे सांगितले. यावेळी संगणक वसुली स्थगिती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागील वर्षी आदेश दिले असतांनाही वसुली सुरूच आहे. त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संदर्भीय पत्राची झेराॅक्स प्रत जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांना देण्यात आली. लवकरच सर्व गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा करून संगणक वसुली स्थगित करून शिक्षकांचे वेतन वेळेत होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाळासाहेब क्षिरसागर यांनी सांगितले. निवड श्रेणीच्या प्रश्नासाठी येणाऱ्या अडचणीची चर्चा करून लवकरच त्याचा प्रस्ताव मार्गी लावण्यात येईल. फंडाची 150 बिले मंजूर असून BDS प्रणाली सूरू झाल्यास खात्यावर जमा होतील. फंडाचा हिशोब व स्लीप मिळाली नसेल तर गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत यादी पाठवावी. पदवीधर पदोन्नतीबाबत संचमान्यता झाल्यावरच विषय मार्गी लागणार असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष साहेबराव पवार, जिल्हा पदाधिकारी जिभाऊ बच्छाव, प्रल्हाद निकम, जिल्हा उपाध्यक्ष बुध्देसिंग ठोके आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या सेवेत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी कोरोना साथीच्या काळात ऑनलाईन व ऑफलाईन गृहभेटीतून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शाळाबाह्य कामे याकाळातही शिक्षकांकडू  सुरूच होते. परंतू शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटलेले नाहीत. प्रलंबित प्रश्न त्वरित सुटतील अशी अपेक्षा आहे.
– प्रकाश सोनवणे, जिल्हा सरचिटणीस शिक्षक समिती

शिक्षकांच्या वेळेत वेतन होण्यासाठी व संगणक वसुली स्थगितीसाठी लवकरच मार्ग काढणार आहोत. यासंदर्भात सर्व अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य न्याय देणार आहोत.
– बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!