कार्यकुशल बंधू – नामदार बाळासाहेब थोरात साहेब…!

लेखन : सौ. दुर्गा सुधीर तांबे, मा. नगराध्यक्षा संगमनेर, संपर्क ९८२२५५३२५४

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगामधील “अकोले” तालुक्यातील कळसुबाईच्या कुशीत उगम पावणार्‍या अमृतवाहिनी “प्रवरा” नदीच्या तीरावर संगमनेर तालुक्याच्या पूर्वेला “जोर्वे” हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरा आहे. श्री क्षेत्र दत्त महाराजांचे पुरातन मंदिर प्रवरा नदीच्या काठावर आहे. जोर्वे संस्कृती म्हणून दिल्लीच्या पुरातत्व विभागाच्या म्युझियममध्ये (संग्रहालयात) “जोर्वे” गावाला विशेष स्थान आहे.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय चळवळीत जे परिवार पिढ्यान् पिढ्या सातत्याने सर्व कार्यात पुढाकार घेतात, त्यात “थोरात परिवार”  हा नावाजलेला परिवार आहे. कष्टाळू वृत्ती, पुरोगामी विचार, सर्वधर्मसमभावाची वागणूक, नेतृत्वगुण, दूरदृष्टी, काटकसर, आध्यात्मिकता असा सर्वगुणसंपन्न थोरात परिवार आहे. थोरात पाटील परिवाराची परंपरा वेगळी आहे. या कुटुंबाला नैतिकतेचा समृद्ध असा इतिहास आहे. आमचे पणजोबा गंगाराम पाटील थोरात, आमची पणजी मंजुळाबाई थोरात अर्थात गावची पाटलीण. या दांपत्याचा या परिसरात मोठा दबदबा व नावलौकिक होता. सगळ्या गावाला पंचक्रोशीत सांभाळून घेणारे आध्यात्मिक, राजकीय – सामाजिक सर्व क्षेत्रात पुढाकार घेणारे हे मातब्बर दांपत्य होते. त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव, काटकसर, कष्टाळू वृत्ती यांतूनच हा परिवार घडत गेला. त्यांच्या मुलांना त्यांनी त्या काळात शहरात ठेवून शिक्षण दिले. त्यामुळे माझे आजोबा संतुजी पाटील थोरात हे इंग्रजी मॅट्रिक झाले. माझी आजी सीताबाई सुद्धा दिघे पाटील या नावाजलेल्या जमीनदार परिवारातून आली. त्यांच्या पोटी ६ भावंडे (तीन मुले व तीन मुली) सर्वात थोरले माझे वडील भाऊसाहेब थोरात, पंडितराव व मधुकर हे बंधू आणि भगिनी मीराबाई, हिराबाई आणि ताराबाई. माझे वडील व त्यांची ही सर्व भावंडे अतिशय बुद्धिमान निघाली.

माझे वडील तीर्थरुप भाऊसाहेब थोरात हे वयाच्या  १८ व्या वर्षापासून महात्मा गांधींच्या “चले जावच्या” ९ ऑगस्ट १९४२ च्या चळवळीनंतर स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील झाले. पुढे वयाच्या ८६ वर्षांचे होईपर्यंत सहकाराची उभारणी, शेतकर्‍यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलने, लढे ,चळवळीत स्वत:च नेतृत्व केले. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक यामध्ये ६८ वर्षे न थकता, न थांबता काम करत राहिले. त्यांनी गावच्या सोसायटीचे चेअरमनपासून तर आमदार, अगदी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या चेअरमन पदापर्यंत उत्तमपणे काम सांभाळले. महाराष्ट्रात मोठा नावलौकिक मिळवला. सहकारी संस्था अतिशय काटकसरीने, व्यापारी ,व्यवहारी वृत्तीने जपल्या. सहकार वाढवला. दादा सुरुवातीला कम्युनिस्ट होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्यातील “कम्युनिझम ” त्यांनी जपला. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी विवाह सत्यशोधक चळवळीच्या पद्धतीने केला. कोणताही खर्च न करता हा विवाह झाला. कोल्हेवाडीच्या दिघे परिवारातील मथुराबाईंबरोबर ते विवाहबद्ध झाले.

माझे वडील तीर्थरूप भाऊसाहेब थोरात व आई मथुराबाई थोरात यांच्या पोटी आम्ही चार बहिणी, एक भाऊ म्हणजेच आज संपूर्ण महाराष्ट्राला नेतृत्व देणारे नामदार बाळासाहेब थोरात यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५३ रोजी झाला. आम्हा सर्व बहिणींचा लाडका भाऊ त्याला आम्ही “भाऊ” च  म्हणतो. पुढची पिढी “आबा” म्हणतात व जनता त्यांना “साहेब ” म्हणतात. उत्तम नेतृत्व घडते ते एका दिवसात नाही तर त्याला परंपरा असते पूर्वजांची. अशी समृद्ध परंपरा भाऊंना मिळाली. त्यात वडील हे कडक स्वभावाचे होते. वडिलांच्या सहकाराची उभारणी व इतर व्यापामुळे शेती आई बघत असे. दादांना वेळ मिळेल तेव्हा ते स्वत: शेतीत काम करत, सर्व कुटुंबाला ही सवय असल्याने भाऊही शेतीच्या कोणत्याही कामात मागे नाही. त्यांना शेतीची सर्व कामे, ट्रॅक्टरने नांगरणी, पेरणी, जनावरांचे संगोपन इत्यादी सर्व कामे येतात. आजोबांकडे स्वामी विवेकानंदांची पुस्तके व अनेक आध्यात्मिक ग्रंथ होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. वडिलांनाही वाचनाची आवड होती. त्यांच्याकडे जगातील अनेक क्रांतीकारकांची पुस्तके, चरित्रे होती. वस्तीवर, बनगरवाडी, श्यामची आई पुस्तकाचे संध्याकाळी सामुदायिक वाचन होत असे.

दादांना स्वातंत्र्य चळवळीत डॉ. अण्णासाहेब शिंदे, अ‍ॅड. रावसाहेब शिंदे, अ‍ॅड. पी. बी. कडू पाटील, धर्माजी पोखरकर इत्यादी सहकार्‍यांबरोबर नाशिकच्या तुरुंगातील सहवासात सामुदायिक वाचणाची सवय लागली व विचार समृद्ध होऊन वाचनाची आवड वाढली. भाऊंनाही वाचनाची आवड आहे. वेळ मिळेल तसे ते वाचन करतात. आता त्यांच्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. सर्वधर्म समभावाचे पिढीजात संस्कार भाऊंवर झाल्याने ते जात- पात मानत नाहीत. चुकीच्या रूढी ,परंपरा, अंधश्रद्धा ते पाळत नाहीत. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये व नंतर लॉ कॉलेजमध्ये वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. पुण्यात त्यांनी “पाणी पंचायत”  मध्ये पाणी प्रश्नांवर, परीक्षा फी माफी साठी आंदोलन केले. कारण १९७२ चा दुष्काळ खूप कठीण होता. ते स्वत: वकील झाले, व १९८० साली कामगारांच्या प्रश्नावर आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात त्यांना ९ दिवसांचा कारावास झाला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी भाग घेतला. हे काम करता करता सहकाराची सुरुवात जोर्वे दूध संस्थेची स्थापना करून केली. १९८५ साली जनतेच्या प्रेमामुळे ते “आमदार” म्हणून निवडून आले. सर्वात कमी वयाचा “आमदार”  म्हणून विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.

भाऊ कुटुंबवत्सल आहे. आत्यांपासून तर सर्व बहिणी मुलींवर त्याचे लक्ष असते. प्रत्येकीशी फोनवर बोलून चौकशी करतात. रक्षाबंधन, भाऊबीजेला सर्वांना भेटतात. त्या त्या सणाचा आनंद साजरा करतात. सौ. कांचन वहिनींचे माहेर इस्लामपूर तालुक्यातील “तांबवे” आहे. त्यांच्यात कोल्हापुरी व सांगलीकडच्या रीतीरिवाजाच्या स्वयंपाक पद्धती आहेत. त्याही भाऊंच्या बरोबरीने कुटुंब , नातेवाईक, कार्यकर्त्यांकडे लक्ष देतात. भाऊने आम्हाला कधीच मोठे भाऊ म्हणून रुबाब दाखवला नाही. आम्हाला शाळेत, कॉलेजमध्ये असताना खूप सांभाळले. होस्टेलवर सोडणे आणि मधून मधून भेटायला येणे, चौकशी करणे, तब्येत बरी नसल्यास दवाखान्यात देणे ही सर्व कामे ते आपुलकीने, मायेने करत. आम्हा भावंडांची कधीच भांडणे व मारामार्‍या झाल्या नाही. नंतर आमच्या लग्नाचे नियोजन करणे, आमच्या वस्तीवरील सर्व बहिणींना सासरी सोडणे, माहेरी आणणे, जीपमधून सर्वांना डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला सोडणे, आम्हाला मनपसंत साड्या घेणे, सर्वांना शेतात डोंगरावर फिरायला घेऊन जाणे ही सर्व कामे ते लहान वयापासून हौसेने, आनंदाने करत. माझा मोठा मुलगा सत्यजितच्या जन्माच्या दिवशी अतिवृष्टी झाली, रस्त्यावर खूप चिखल झाला. बैलगाडी चालवित आम्हाला हॉस्पिटलला पोहोचवले. माझा छोटा मुलगा डॉ. हर्षल लहानपणी रात्री खूप रडायचा. पहाटे भाऊ येऊन म्हणायचा, “बाई व तू झोप मी झोका देतो” . भाच्यांचे, पुतण्यांचे, मुलींचे लाड करणे, खांद्यावर घेऊन फिरणे, डोंगरावर करवंदे खायला नेणे. धरणावर फिरायला नेणे यासाठी सर्वांना वेळ देतात. भाऊचा स्वभाव कुटुंबवत्सल असल्याने भावंडांमध्ये, भाच्यांमध्ये, नातेवाइकांमध्ये तो आवडता आहे. भाऊ आमचे सर्वस्व आहे. त्यांच्या वलयामुळे आम्ही सर्वजण सुरक्षित, आनंदी आहोत.

भाऊंमध्ये साधेपणा ,काटकसर, दूरदृष्टी असल्याने ते राजकारणात ,समाजकारणात एवढी प्रगती करू शकले. ते मितभाषी आहेत. कोणत्याच गोष्टींचा अतिरेक त्यांच्यात नाही. जेवणही मोजून-मापून व साधेच करतात. जेवण आवडले म्हणून अर्धी पोळी सुद्धा जास्त खात नाही. आनंदाने हुरळून जाणे व दु:खाने खचून जाणे त्यांच्या स्वभावातच नाही. ते  “स्थितप्रज्ञ”  स्वभावाचे आहेत. राजकारणात, कुटुंबातही ओरडणे हे त्यांच्या स्वभावात नाही. मी सर्वात लहान असूनही त्यांनी आज पर्यंत मला शब्दांनी ही दुखावले नाही. राजकारणात वरवर गोड बोलणे, गळ्यात पडणे व खालून पाय घालून पाडणे हे कधीच केले नाही. त्यांचा स्वभाव म्हणजे आपले काम व्यवस्थित करत राहणे. ते कधीही आळसात, आरामात दिसणार नाहीत. सतत दिल्ली – मुंबई महाराष्ट्रभर, मतदारसंघात दौरे चालू असतात. सौ. कांचन वहिनी म्हणतात, “तुम्हा बहीण – भावाला बाईंनी कोणते अमृत पाजले ? तुम्ही दमतच कसे नाही ? ” जे बोलायचे असेल ते छोट्या वाक्यातच, पुढच्याला समजेल असे बोलतात. त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना सोनियाजी गांधी यांनी राष्ट्रीय वर्किंग कमिटी वर कायमस्वरूपी सदस्य करून घेतले आहे.

१९७२ च्या दुष्काळानंतर यांनी भारतात डॉ. स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली हरितक्रांती श्वेतक्रांती केली, ते आमचे मामा डॉ. अण्णासाहेब शिंदे हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. त्यांचे भाऊंवर विशेष प्रेम होते. त्यामुळे भाऊ नेहमी सुट्टीत दिल्लीला जात. मामांमुळे स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजीव गांधी यांसारख्या खूप मोठ्या माणसांचा सहवास मिळाला. मामांबरोबर परदेश दौरेही केले. त्यातूनच भाऊंचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. भाऊ शांत व संयमी वृत्तीचे आहेत. धरसोड वृत्ती त्यांच्यात नाही. पद असो वा नसो शांतपणे काम करणारा, साधेपणा जपणारा, माणसांना आपुलकीने जीव लावणारा, कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारणारा म्हणून भाऊंना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे काँग्रेस पक्षाच्या येष्ठ नेत्यांचे ते आवडते आहेत. अशा अभ्यासू ,शांत व्यक्तिमत्त्वामुळे १९९९ साली राज्य मंत्रीपद मिळाले. तर आज २०२२ पर्यंत महसूल मंत्रीपद व अनेक महत्वाची खाती मिळाली. प्रत्येक वेळी खाते सांभाळताना त्यांच्यातील अनेक गुणवैशिष्ट्यांचे पैलू आपल्याला दिसले. एवढ्या मोठ्या रायाच्या मंत्रिपदाचा, मतदारसंघाचा व्याप सांभाळत असताना त्यांनी सहकाराचे व्यवस्थापन उत्तम ठेवले आहे. सध्या संपूर्ण भारतात दिशादर्शक असलेला संगमनेरचा सहकार त्यांच्या बारीक नजर, दूरदृष्टीतून, उत्तम व्यवस्थापनातून दिमाखाने उभा आहे.

महाराष्ट्रभरच्या दौर्‍यात ते कधीच बोलण्याचा अतिरेक करत नाहीत. या लोकांच्या सहकारी संस्था मोडल्या, मोडकळीस आल्या तेच महाराष्ट्रभर भाषणे करीत फिरतात की सहकार टिकला पाहिजे. पण आमचे भाऊ येथे असणारा दिशादर्शक सहकार असूनही अहंकाराने कधीच बोलत नाही. आज संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा ११ लाख मेट्रीक टनापर्यंत गाळप क्षमता असलेला अग्रगण्य कारखाना आहे. साखर उतारा ११.८० म्हणजे महाराष्ट्रात वरच्या क्रमांकावर आहे. राजहंस नावाची साखर उत्पादन होत. तांत्रिक कार्यक्षमता, ऊर्जा बचतीची अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. उसाच्या मळीपासून डिस्टलरी प्लॅन्ट चालू आहे. नैतिकतेची जाणीव ठेवून या कारखान्यात देशी विदेशी दारुची निर्मिती न करता फक्त उच्च दर्जाचे “इंडस्ट्रियल अल्कोहोल” बनवले जाते. महाराष्ट्रात ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा, कर्मचार्‍यांचे पगार,बोनस वेळेवर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. याचे सर्व श्रेय भाऊंनाच आहे. आज महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकी संघ, मार्केट कमिट्या बंद पडलेल्या आहेत. संगमनेरचा शेतकी संघ, मार्केट कमिटी बघण्यासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात. संगमनेर तालुका दूध संघ महाराष्ट्रातील एक नंबरचा तालुका पातळीवरच्या दूध संघ आहे. रोजचे दूध संकलन ४ लाख लिटरपर्यंत आहे. राजहंस नावाने संपूर्ण महाराष्ट्रात व राज्यां बाहेर गुजरात, कर्नाटकमध्ये २,४५,०००  लिटरचे दूध पाऊच जातात. दुधाचे विविध पदार्थ दूध, दही, श्रीखंड, ताक, लस्सी, पेढे, गुलाबजाम, चीज, पनीर, मिठाई हे लोकप्रिय आहेत. तालुक्यातील गावोगावच्या दूध डेअरी व पतसंस्था यातून कोट्यवधी रुपयांचा व्यापार चालतो तो सहकारातूनच. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या दुग्ध व्यवसायातून पतसंस्थांमध्ये रुपये २१०० कोटींच्या ठेवी आहेत. तालुक्यात सुबत्ता, संपन्नता आहे. संगमनेर तालुक्यात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, एम बी ए, फार्मसी, डेंटल कॉलेज आहेत. मूक-बधिर मतिमंद विद्यालय, आश्रम शाळा आहे यातून आजपर्यंत हजारो मुले – मुली शिकून जगाच्या अनेक देशांमध्ये चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत. २१ हायस्कूल, ३ प्राथमिक स्कूल, १० ज्युनियर कॉलेज, २ सिनियर कॉलेज,  इंग्रजी माध्यमाचे मॉडेल स्कूल, सीबीएसइ स्कूल आहेत. त्यांच्या या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत “निळवंडे धरण” पूर्ण करून आता कालवे ही पूर्ण होत आहेत. हा त्यांच्या व शेतकर्‍यांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. सहकाराबरोबरच गावोगावी शेततळी, बंधारे, सभामंडप, रस्ते, तलाठी कार्यालय, अहमदनगरचे आधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय उभे केले आहे. संगमनेर शहराकडे विशेष लक्ष देऊन अनेक वर्षापासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना निळवंडे धरणातून थेट ग्रॅव्हिटीने पाणी आणून मुबलक स्वच्छ व शुद्ध पाणी दिले आहे. त्यांच्यासह हा शहरवासीयांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण होता. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवली आहे.

शहराची नवीन पुनर्रचना करताना त्यांनी शहरातून जाणार्‍या रस्त्यांचे रुंदीकरण, लाईट व सुशोभीकरण केले. बसस्थानक खूप आधुनिक बांधले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. शहरातून वाहणार्‍या पाच नद्यांचा तीर अधिक सुंदर करण्याचे काम चालू झालेले आहे. त्यांना शहर, गाव, सौंदर्याची दृष्टी स्वत:ला आर्किटेक्चरची, आधुनिकतेची त्यांना आवड असल्याने शहरात प्रांत ऑफिस, तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत, नगर परिषद इमारत, कवी अनंत फंदी नाट्यगृह, न्यायालय इमारत व इतर सर्व इमारती देखण्या व सुंदर केल्या आहे. त्यातून शहर खूप देखणे व सुंदर दिसू लागले आहेत. शहरातील इतर प्रमुख रस्त्यांसाठी निधी दिल्याने सर्व मुख्य रस्ते चांगले झाले आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत ते कधीही थकलेले दिसत नाहीत. सुखदु:खाच्या ठिकाणी आवर्जून भेटी देतात.

मंत्रिपदाच्या काळात उदाहरणार्थ कृषी, शिक्षण, पाटबंधारे, महसूलची जबाबदारी असेल ती त्यांनी नवनविन कल्पना राबवून पूर्ण केली. त्यांच्या कामांना गती, पारदर्शकता असते. काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे व एकनिष्ठपणे काम करत असल्याने त्याची दखल पक्षाने घेतली व महत्त्वाची जबाबदारी दिली. इतर राज्यांच्या निवडणुकीतही जबाबदारी दिली. पक्षाच्या वाढीसाठी ते सतत प्रयत्नशील असतात. काँग्रेस कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणीचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे घेतात. भाऊचे वक्तृत्व खूप चांगले आहे. ते कधीही अपशब्द, वादग्रस्त विधान करत नाहीत. त्यांचे बोलणे सौम्य व शांत असते. अशाही कामाच्या व्यापात त्यांच्या कन्या शरयू, सविता, जया यांच्याशी त्यांचा रोज फोनवर संवाद असतो त्यांना शिक्षणात व कामात टाळाटाळ आवडत नाही. मुलगा राजवर्धन हा अमेरिकेत  “आर्किटेक्चर” मध्ये पीजी करत आहे. सौ कांचन वहिनी नातं, गोतं, कुटुंब व्यवस्थित सांभाळत असल्याने भाऊंना काळजी नाही. पूर्वीपासूनच निसर्ग ,झाडे, पक्षी यांची खूप त्यांना आवड आहे. दादांनी सुरू केलेले “दंडकारण्य अभियान” पुढे नेत २८ कोटींच्या बियांचे बीजरोपण, ८० लाख रोपांची लागवड त्यांनी केली आहे. वास्तुशांती, वाढदिवसाला ते झाडांची रोपे भेट देत असतात. निसर्गात त्यांचे मन खूप रमते. वेगवेगळी फळे, बोरे, चिंच, कौठ, करवंदे, आंबा, जांभळे त्यांना खूप आवडतात. त्यांनी आमचे आजोबा संतुजी थोरात यांची आयुष्याच्या अखेरची काही महिने खूप सेवा केली. तीर्थरूप दादा व बाई यांची खूप काळजी घेतली. ते कर्तव्य पार पाडतात न बोलता व शांतपणे. मी दादांना म्हणायचे, “तुम्ही खूप कष्टाने हा सहकार उभा केला. आम्ही किती भाग्यवान तुमच्यामुळे आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. भाऊ किती भाग्यवान त्याला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली”.

तर दादा म्हणायचे, "बाळासाहेब स्वत: कर्तृत्ववान" मुलगा आहे. म्हणून "महाराष्ट्राचे नेतृत्व" करण्याची भाऊंना संधी मिळाली आहे. अशा आमच्या लाडक्या "बंधू" साठी आम्ही बहिणी एवढेच म्हणतो की,
"माहेरचा देवा, नाही तुला विसरत,
पाठीच्या बंधूजीचा, बेल जाऊदे पसरत"  !!१!!
"आमच्या आयुष्याची देवा, आखूड घाल दोरी,
हौशी बांधवाला माझ्या, घाल शंभरी पुरी" !!२!!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!