विजय पगारे : इगतपुरीनामा न्युज, दि. १
पी.एफ.आर.डी.ए. कायदा मंजुर झाल्यापासुन व केंद्र सरकारने एन.पी.एस व विविध राज्य सरकारांनी अंशदायी पेन्शन योजना राज्यात लागू आहे. तेव्हापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेची फॅमिली पेन्शन, ग्रॅज्युईटी व अन्य सर्व लाभ हिरावले गेले. सरकारी नोकरी या योजनांमुळे असुरक्षित झाली असुन सरकारी कर्मचाऱ्यात याबद्धल कमालीचा असंतोष आहे. त्यामुळे बेभरवशाच्या भांडवलशाहीसाठी पोषक व कर्मचारी हितशोषक योजना बंद करून महाराष्ट्रातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना
जुनी पेन्शन योजना लागू होणे आवश्यक आहे. यासाठी राज्यभरातील प्रमुख ६० कर्मचारी संघटना एकवटल्या असुन संपूर्ण महाराष्ट्रभर पेन्शन संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या संघटना आर या पारची लढाई लढणार आहेत. या लढ्यात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी युनियन मोठ्या ताकतीने उतरेल असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी केले आहे.
पेन्शन संघर्ष यात्रा पार्श्वभूमीवर नाशिक येथे झालेल्या बैठकीत श्री. हळदे बोलत होते. यावेळी अजय कस्तुरे, प्रकाश थेटे, प्रशांत कवडे, अजित आव्हाड, ज्ञानेश्वर गायकवाड, निलेश पाटील, श्याम पाटील, संजय पाटे, श्रीरंग दीक्षित, मधुकर पुंड, प्रमोद जाधव, मधुकर आढाव, संदीप दराडे, कानिफ फडोळ, प्रियंका कुलकर्णी, मंदाकिनी पवार, संजाली पाटील, कल्याणी पवार, अर्चना दप्तरे, शीतल शिंदे, संदीप गावंडे, राजेंद्र बैरागी, दिलीप टोपे, शालीग्राम उदावंत, किरण माळवे उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यतून आंदोलनास मोठा आक्रमक केले जाईल असे बैठकीत ठरवण्यात आले.
पेन्शन संघर्ष यात्रा आंदोलनाचे टप्पे होणार असे
१ ) २२ नोव्हेंबर २०२१ ते ७ डिसेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील मुंबई ते वर्धा, सर्व ३६ जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे पदाधिकारी पेंशन संघर्ष यात्रा काढून सभा घेत जुन्या पेन्शन च्या संदर्भात जनजागृती व जनमत निर्माण करतील.
२ ) २२ नोव्हेंबर २०२१ ला आजाद मैदान मुंबई येथे जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती मधील सर्व संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांना निवेदन देऊन पेन्शन संघर्ष यात्रेची सुरुवात करतील.पेन्शन संघर्ष यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनजागृती करत ७ डिसेंबर २०२१ ला सेवाग्राम वर्धा येथे पोहचेल.
असा राहील पेन्शन मार्च
१ ) ८ डिसेंबर २०२१ पासून वर्धा सेवाग्राम येथून पेन्शन मार्च काढली जाईल. ती १० डिसेंबर २०२१ ला राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूर येथे समाप्त होईल.
२ ) ही तीन दिवसीय पेन्शन मार्च पदयात्रा असुन आपल्या सर्वांना पायी चालत जात आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. जुन्या पेन्शनचे आंदोलन हे आपल्या हक्काचे आंदोलन असुन बऱ्याच संघटना यात सहभागी आहेत. त्यामुळे या जुन्या पेन्शनच्या संघर्षात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कर्मचारी/ अधिकारी यांस करण्यात आले आहे.
पेन्शन संघर्ष यात्रा ही सरकारी कर्मचारी चळवळीतील मैलाचा दगड ठरणार आहे. बहिरेपणाचे सोंग घेणाऱ्या सरकारला हा आवाज आता ऐकावाच लागेल..! संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा निघणार असून प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पेन्शन शिलेदारांच्या नियोजनातून अभूतपूर्व प्रतिसाद मध्ये ती संपन्न होईल हा आत्मविश्वास आहे.
– प्राजक्त झावरे पाटील, राज्य कार्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पेन्शन हक्क संघटन
२००५ अगोदर नियुक्त कर्मचारी यांना पेन्शन योजना आणि नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना बंद ही बाब एकाच कुटुंबात राहणाऱ्यांना वेगवेगळा न्याय हा एक दुजाभाव केल्यासारखा आहे. अंशदायी पेन्शन योजनेतुन साधी फॅमिली पेन्शनसुद्धा मिळू शकत नाही. त्यामुळे जूनी पेंशन योजना लागू करण्यासाठी सर्वांनी या लढयात साथ द्यावी.
– विजयकुमार हळदे, जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य