गिन्नी गवतापासुन इंधन निर्मितीमुळे ग्रामविकासाला येईल वेग – ॲड. इचम

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

आम्ही शेतकरी कुटुंबातील असुन इगतपुरी तालुक्यात आमची शेती आहे. तालुक्यात गिन्नी गवतापासुन इंधन निर्मिती प्रकल्प सुरु होत आहे हे कौतुकास्पद असुन अशा बायो इंधन प्रकल्पामुळे ग्रामविकासासह शेतकरी समृद्ध होऊन गती येईल असे मत इगतपुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम यांनी व्यक्त केले. घोटी येथे गवतापासुन बायो सीएनजी निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

सध्या डिझेल, पेट्रोल, गॅस आदी इंधनाचे भाव गगनाला भिडत चालले असल्याने दिवसेंदिवस महागाईचा भडका उडतांना पहायला मिळत आहे. या गोष्टीचा विचार करून पर्यायी इंधन म्हणुन भारत सरकारने प्रत्येक तालुक्यात बायो सीएनजी प्रकल्प, बायो एलपीजी तसेच सेंद्रिय खत निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे स्थानिक क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पात किमान २ हजार कुशल अकुशल कामगारांची आवश्यकता भासणार असुन या प्रकल्पामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे.

आखाती देशांतील युद्धामुळे आपल्या देशात डिझेल-पेट्रोल यांसह आयात वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वसामान्यांना बायोगॅस व सीएनजीसाठी  यापुढे आखाती देशांकडे झुकावे लागणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धत बदलून आपल्या आर्थिक उन्नतीसाठी हत्ती गवत, गिनींगोल गवताची पेरणी करावी. देश व शेतकरी बांधवांना आत्मनिर्भर करत भारतरत्न एपीजी अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन जेष्ठ पर्यावरणवादी डॉ. श्रावण माने यांनी केले.

इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथे मिरा क्लीनफुल्स लिमिटेड व श्री बाळकॄष्णअँग्रो प्रोड्यूसर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बायो सीएनजीच्या प्रकल्पाची लवकरच सुरुवात होणार आहे. ह्या प्रकल्पात हत्ती गवत/गिनींगोल गवतापासुन बायो सीएनजीची निर्मिती होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पापासुन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व इतर माहिती मिळावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम उद्योजक नेमणुक व शेतकरी सभासद नोंदणीसाठी घोटी येथे मार्गदर्शन शिबीर राबवण्यात आले. या  शिबीरात प्रकल्पाचे श्रावण माने, रेश्मा गणेश तरे, गणेश तरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गिन्नी गवत आणि त्यापासुन होणारे फायदे आदी प्रकल्पाबाबत माहिती दिली.

या प्रकल्पात शेतकऱ्यांना सभासद करणार असुन सभासद शेतकऱ्यांना बियाणे पुरवले जाणार असुन या पिकासाठी लागणारी सेंद्रीय खत देखील पुरवले जाणार आहे. त्यानंतर साधारण तीन महिन्यात हे पीक काढणीयोग्य झाल्यानंतर ही कंपनी स्वतःचे मनुष्यबळ वापरून ते विकत घेणार आहे. गिन्नी गवत साधारण दोन महिन्यात १५ ते २० फुटापर्यंत वाढते. तीन महिन्यात एकदो कापणी केली तरी साधारणपणे वर्षातुन चार वेळा कापणी होणार आहे. एक एकरमध्ये ४० ते ५० टन उत्पादन शेतकऱ्याला यातुन मिळणार आहे. या गवताला प्रतिटन भाव हा १ हजार रुपये असणार आहे. तसेच उत्पादित माल गेल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे. या पिकाला कंपनी हमीभाव देणार असुन शेतकऱ्याला वर्षाला एकरी २ लाख रुपयापर्यंत फायदा मिळणार असल्याचा दावा या शिबीरात करण्यात आला. यावेळी शेतकरी संतोष जाधव, प्रवीण गव्हाणे, सुदर्शन वारुंगसे, नंदकुमार कोकणे यांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पालघडे यांनी केले तर आभार गणेश तरे यांनी व्यक्त केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!