शिरसाठे येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती पथनाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम : शिरसाठे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनोखा प्रजासत्ताक दिन साजरा

     

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाठे व ग्रामपंचायत शिरसाठे यांचे संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. माझी वसुंधरा पथनाट्य ह्या कार्यक्रमाने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. या पथनाट्याच्या माध्यमातून ग्रामस्थांना पृथ्वी जल वायू अग्नी आकाश या पंचमहाभूताचे संवर्धन होणे गरजेचे आहे असा संदेश देण्यात आला. विविध नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाची पंचतत्वे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न केले. त्यात पृथ्वी घटकांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, वृक्ष संवर्धन व देशी प्रजाती वृक्ष लागवड करणे, जास्तीत जास्त हरित क्षेत्र निर्माण करणे, रोपवाटिकेची निर्मिती करणे व जैवविविधतेचे संवर्धन करण्याबाबतचे जनजागृती करण्यात आली. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत झिरो कचरा निर्मिती करणे, ओला कचरा सुका कचरा वेगळा करणे व ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. शेतातील कृषी कचरा न जाळता त्या कचऱ्यापासून वायू प्रदूषण होत असते. म्हणून कृषी कचरा न जाळता त्यापासून कंपोस्ट खत निर्मितीवरही जनजागृती झाली.

वायू घटकांतर्गत गावातील वायुचे प्रदूषण मोजमाप करण्यात येऊन योग्य ती उपाययोजना करण्याबाबत संदेश देण्यात आला. इलेक्ट्रिक वाहन वापरण्याबाबत जनजागृतीआ ई ठिकठिकाणी इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंट तयार करण्यात येत असल्याबाबतचे गावचे सरपंच यांनी सांगितले. जल घटकांतर्गत पाणलोटाचा सिद्धांत लोकांसमोर मांडण्यात आला. त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डा, विहीर पुनर्भरण, डीप सीसीटी दगडीबाध, मातीनाला बांध,पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढणे बाबतचे काम गावात करण्यात आली. जलसंधारणाची कामे सर्वात जास्त होऊन आपले गाव जलसमृद्ध होईल याबाबतचा संदेश या पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. अग्नि या घटकांतर्गत अपारंपारिक ऊर्जेवर जास्तीत जास्त भर देण्यात आला.पारंपारिक पद्धतीने चुलीमध्ये लाकडे टाकून लाकूड जाळणे व वृक्षतोड होत असते. ती थांबवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने घरोघरी बायोगॅस तयार करण्यात येऊन उज्वला गॅसच्या माध्यमातून जास्तीत जास्त अपारंपारिक ऊर्जेचा वापर करण्यात यावा. प्रत्येक घरावर सोलर युनिट व सोलर हिटर बसवण्यात यावे.जेणेकरून आपणास पाणी गरम करण्यासाठी व विजेसाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर होऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून अग्नी या घटकांतर्गत अपारंपारिक ऊर्जा वापर करणे यावर जास्तीत जास्त जनजागृती केली.

आकाश या घटकांतर्गत ई प्रतिज्ञा घेणे, ई प्रतिज्ञाची पूर्तता करणे, विविध स्पर्धांच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद शाळा शिरसाटे येथे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती बाबतच्या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा नियोजन समिती गोरख बोडके, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे,  स्वदेश फाउंडेशनचे श्री. बामणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र व एक झाड देण्यात येऊन वृक्ष लागवडीचा संदेश या सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमासाठी सरपंच गोकुळ सदगीर, उपसरपंच शितल विलास चंदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर सोपनर, तारा गणेश तेलंग, अलका दोंदे, रमेश शीत, गांगुर्डे, ग्रामपंचायत कर्मचारी भावराव गांगुर्डे, संपत सप्रे, भास्कर सदगीर, दिनकर म्हसणे, सीआरपी सुनीता ढोन्नर आदींनी विशेष सहकार्य केले. मुख्याध्यापक हरिश्चंद्र जाधव, शिक्षक गणेश पवार, मधुकर धनगर,कुणाल चव्हाण, स्वाती लोहार, सप्रेवाडीचे मुख्याध्यापक रामदास शिंदे, लोहरे सर यांनी सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन मधुकर धनगर यांनी, ग्रामसेवक हनुमान दराडे यांनी आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!