भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील मोठा पक्ष असणाऱ्या इंदिरा काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे अद्याप समोर आलेले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा उमेदवाराची निश्चिती केली नाही. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे पण “कुछ” तो बडा करनेवाले है अशी चर्चा रंगली आहे. माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र बाळासाहेब झोले यांनी अपक्ष नशीब अजमावायचे ठरवले पण अद्याप त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. माजी आमदार विठ्ठलराव घारे यांच्या स्नुषा अनिता रामदास घारे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे भाऊराव डगळे यांना तिकीट मिळालेले आहे पण अद्याप त्यांनी अर्ज दाखल केलेला नाही. ज्यांना तिकीट मिळणार नाही असे सर्व पक्षाचे इच्छुक उमेदवार बंडाची पताका हाती घेतात की तलवार म्यान करतात याकडे पण मतदारसंघाच्या नजरा खिळून आहेत. महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांची प्रचार यंत्रणा सक्रियतेने कामाला लागली असून कार्यकर्त्यांकडून ‘सोशल वॉर’ रंगले आहे. सलग दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी हिरामण खोसकर यांनी अभूतपूर्व नियोजन केल्याचे दिसून येते. उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार निर्मला गावित ह्याच इंदिरा काँग्रेसच्या उमेदवार असतील अशी दाट शक्यता वर्तवणारी चर्चा कानाकोपऱ्यात सुरु आहे. त्या निवडणुकीच्या रिंगणात नक्कीच उतरणार असून तिकिटाबाबत आज निर्णय होणे अपेक्षित आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार निर्मला गावित यांच्यातील “बिग फाईट” अनुभवण्यासाठी संपूर्ण जिल्हा आणि मतदासंघ उत्सुक आहे. त्यांनीही चांगलीच पूर्वतयारी केली असून मागील तीनही निवडणुकीतील रणनीती, अनुभव, सोशल मीडिया, कार्यकर्त्यांची फौज, प्रचाराचे नियोजन केले जात आहे. अधिकृतपणे तिकीट घोषित झाले नसल्यामुळे त्यांच्या नियोजनाला खीळ बसलेली दिसते.
इंदिरा काँग्रेसचे प्रबळ इच्छुक उमेदवार तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उमदे नेतृत्व लकीभाऊ जाधव यांची काँग्रेसतर्फे उमेदवारी घोषित झाल्याच्या पोस्ट सोशल मिडीयामध्ये फिरत आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी राज्यभरातील त्यांचे युवा कार्यकर्ते जोशात कामाला लागले आहेत. लकीभाऊ जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास प्रत्येक जिल्ह्यातून त्यांच्या विजयासाठी तरुणांचा फौजफाटा इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात डोळ्यात तेल घालून प्रचाराची आखणी करणार असल्याचे सगळीकडे बोलले जात आहे. प्रदेश काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री. जाधव यांची उमेदवारी निश्चित केली असल्याच्याही चर्चा पसरल्या आहेत. मात्र त्यांना सोडून अन्य दुसऱ्याला उमेदवारी मिळाली तर लकीभाऊ जाधव यांची भूमिका अत्यंत मौलिक ठरणार आहे. काँग्रेस, मनसे यांचे उमेदवार आज उद्या निश्चित होणार आहे. त्यानंतर राजकीय घडामोडी गतिमान होणार आहेत. सोमवारी दिवाळी पर्वाला सुरुवात होणार आहे. मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने ह्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. ह्या दिवाळीत इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात चांगलेच “लक्ष्मीदर्शन” होईल असा अंदाज आहे.