सध्या सगळीकडेच कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. मागच्या वर्षी अगदी याच सुमारास कोविड रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आणि मार्चच्या अखेरीस लॉकडाऊन सुरू झालं, ते थेट वर्षभर सुरूच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही! दिवाळी नंतर हळूहळू रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आणि लॉकडाऊन सुद्धा शिथिल झालं. पण या ‘शिथिल’चा अर्थ मात्र ‘आता लॉकडाऊन संपलंच’ असा काढला जातो आहे. अर्थात लॉकडाऊन काळात सर्वार्थाने झालेली फरपट ही समाजाच्या सगळ्याच स्तरातील लोकांनी थोड्याफार प्रमाणात अनुभवली आहेच, त्यामुळे अशी प्रतिक्रिया येणं अपेक्षितच आहे. लोकांनी वर्षभर सहन केलेली बेरोजगारी, आर्थिक विवंचना, सामाजिक हानी, प्रवासाला झालेली आडकाठी, राहून गेलेले सण उत्सव आणि समारंभ या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांनी अधीरतेने घराबाहेर पडणं अपेक्षितच होतं.
या सगळ्यात नेहमीच राहून जाणारा आणि थोडासा दुर्लक्षित मुद्दा म्हणजे ‘शाळा आणि विद्यार्थी!’ लॉकडाऊन शिथिल झालं आणि शाळाही काही प्रमाणात सुरू झाल्या. सुरुवातीच्या कालावधीत नववी दहावी पुरते मर्यादित असलेले वर्ग नंतर पाचवीपासून सुरू झाले आणि विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक सर्वांनाच वाटलं की आता शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. पण मार्च महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे आणि हीच झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या पुन्हा शाळांच्या आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या मुळावर उठते की काय अशी भिती विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाढू लागलेली आहे. नुकतेच कुठे शाळा सुरळीत सुरू झाल्या असं वाटतं न वाटतं तोच पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मागच्या वर्षी अगदी याच कालावधीत रुग्णसंख्येचे आकडे वाढायला सुरुवात झाली आणि सगळ्यात आधी बंद झाल्या त्या शाळा! दहावीचा शेवटचा पेपर सुद्धा रद्द करावा लागला अशी परिस्थिती निर्माण झाली. अर्थात या सगळ्यात यंत्रणेचा दोष आहे असे अजिबात नाही. त्यावेळी आपल्याला कोविडचा नेमका अंदाजच नव्हता, सगळंच एखाद्या ब्लाईंड गेम सारखं सुरू होतं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळा बंद करण्यात आल्या हे त्यावेळच्या परिस्थिती नुसार योग्यच होतं.
सध्याची परिस्थिती मात्र त्यावेळच्या स्थिती पेक्षा जरा वेगळी आहे, खरं तर खूप सुधारलेली आहे. रुग्णसंख्या वाढते आहे हे खरं असलं तरी आता उपचारही व्यवस्थित होताहेत आणि सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे आपल्याकडे आता लस सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवणं अगदी सहज नसलं तरी शक्य आहे. काही गावांनी शहरांनी तसा प्रयत्नही करायला सुरुवात केली आहे ही जमेची बाजू आहे. आठवड्यातून एक-दोन दिवस कडक निर्बंध लावून सार्वजनिक ठिकाणचा वावर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. “जितका संपर्क कमी तितका धोका कमी” हे कोविडच्या बाबतीत खरे असले तरी संपर्काशिवाय पर्याय नाही हेही तितकेच खरे आहे. लॉकडाऊन मुळे चिघळलेली परिस्थिती ही समाजातल्या जवळपास प्रत्येक घटकाने थोड्याफार फरकाने अनुभवली आहे, चटके सोसलेले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू नये ही अपेक्षा रास्त असली तरी ती पूर्ण करणं आता सामान्य जनतेच्या हातात आहे. देव न करो पण पुन्हा लॉकडाऊन सुरू झालं आणि शाळा पुन्हा बंद झाल्या तर विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांनाच ते अजिबात परवडणारे नाही. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी जो थोडाफार वेळ मिळाला आहे तोही पुन्हा काढून घेण्यात आला तर विद्यार्थ्यांचे भरून न येणारे नुकसान होईल आणि त्याला कारणीभूत आपण सगळे असू. एक वर्ष होऊन गेलंच आहे, अजून परिस्थिती पूर्ववत व्हायला नक्की किती कालावधी लागेल हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही आणि म्हणूनच तोपर्यंत शाळा आणि शिक्षण बंद ठेवणे हे आपल्याला अजिबात परवडणारे नाही. आणि म्हणूनच परिस्थिती अजून चिघळू द्यायची नसेल तर काही बाबतीत स्वयंशिस्त पाळण्याशिवाय आपल्याकडे सध्या तरी पर्याय नाही. ती पाळली नाही तर या विद्यार्थ्यांचे आणि पर्यायाने भावी पिढीचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल आणि त्याला कारण आपणच असू हे मात्र निश्चित!
Comments