इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
अर्ध्या भाकरीच्या चंद्रासाठी जिंदगीभर काबाडकष्ट करणाऱ्या आणि मजुरीने उपजीविका करणाऱ्या कुटूंबातून ज्ञानधारांमुळे राष्ट्रपतींनाही दखल घ्यायला लावणारे कार्य घडले. देशपातळीवर केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले. ही सर्व ताकद फक्त माझ्या देवळे गावाच्या साहाय्याने घडू शकली. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगून आपल्यासह गाव आणि आईवडिलांचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन डॉ. चंद्रकांत गेणू दालभगत यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील देवळे येथे शालेय शिक्षण समिती आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ११ गुणवंत रत्नांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. सत्काराला ऊत्तर देताना डॉ. दालभगत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देवळे गावात प्राथमिक शिक्षणाचा सुरू झालेला प्रवास आयआयटी खडगपूर येथेही सुरूच आहे. संशोधित केलेला लोहयुक्त तांदूळ पंतप्रधानांकडून देशभर पुरवला जाणार आहे. यासह मधुमेही व्यक्तींसाठी उपयुक्त असणारा संशोधित तांदूळ निर्मितीच्या अंतिम टप्प्यावर आहे.
आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, देवळे येथील डॉ. चंद्रकांत गेणू दालभगत यांनी आयआयटीमध्ये लोहयुक्त तांदळाच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले. त्यांचे मार्गदर्शक संशोधन देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन विशेष कौतुक केले. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. गावातील डॉ. सखाराम सनु उघडे, गणपत बाबुराव तुपे, प्रकाश रघुनाथ तोकडे, ॲड. अनिल रघुनाथ तोकडे, ॲड. विद्या अनिल तोकडे, ॲड. गोरख गंगाराम दालभगत, ॲड. संपदा प्रशांत उबाळे, प्रवीण प्रकाश दालभगत, लक्ष्मण दत्तात्रय भागडे, स्वाती अजय उबाळे ह्या ११ जण गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक माजी सभापती जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे यांनी केले. सूत्रसंचालन गोरख तारडे यांनी केले. माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, संदीप गुळवे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे, ज्ञानेश्वर लहाने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, प्रशांत कडू, संपतराव काळे, माजी सभापती गोपाळ लहांगे, रामदास मालुंजकर, पंचायत समिती सदस्य विमल तोकडे, आगरी सेना तालुकाध्यक्ष नारायण वळकंदे, सरपंच अनिल भोपे, नंदलाल भागडे, कैलास कडू, हरीश चव्हाण, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, काशिनाथ कोरडे, धनराज म्हसणे आदी उपस्थित होते. शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्ता तोकडे, मुख्याध्यापक तुकाराम गांजवे, केंद्रप्रमुख पांडुरंग शिंदे, विशाल सोनवणे, गोरक्ष विधाते, भोरु कुंदे, मनोज भोये, राजश्री लोंढे, सुनीता हुंबरे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी उपस्थितांचे आभार मानले.