अवकाळीमुळे भातासह बागायती पिकांचे अतोनात नुकसान : या वर्षीही भरपाईला टाळाटाळ केल्यास विमा कंपनी विरोधात याचिका दाखल करणार : बाळासाहेब आमले

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस थांबायला तयार नाही. भात पिकासह इतर बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विमा कंपनी प्रमाणेच शासन स्तरावरही शेतकऱ्यांची अद्यापही दखल घेतली जात नाही. मागील वर्षीच्या विम्याचे पैसेही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नसुन शासनाची सबसिडी मिळाली नसल्याने विम्याचे पैसे मिळत नसल्याचे विमा कंपनीने नेमलेल्या व्यक्तींकडून सांगण्यात येत असल्याने शेतकरीही बुचकळ्यात पडले आहे. विमा कंपनीने मागील वर्षीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे विम्याचे व यावर्षीच्या विमाधारक शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजुर न केल्यास लवकरच विमा कंपनीविरोधात याचिका दाखल करून आंदोलन केले जाणार असल्याचे भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब आमले यांनी सांगितले. 

इगतपुरी तालुक्याच्या खरीप हंगामातील मुख्य असणाऱ्या भात पिकाची कापणी अंतिम टप्प्यात असुन कापणी करून शेतात, खळ्यावर पडलेले भात पावसाने सडण्याच्या अवस्थेत आहे. काही भाताला मोड आल्याची दयनीय अवस्था सध्या शेतकऱ्यांची असुन लाखो रुपये गोळा करणाऱ्या विमा कंपनीने अद्याप मागील वर्षीचेच विम्यापोटीचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही. या वर्षीही जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाची सबसिडी मिळाली नसल्यानेच शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याचे विमा कंपनीने नाशिक जिल्ह्यसाठी नेमलेल्या राहूल नामक व्यक्तीकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी बुचकळ्यात पडले असुन कृषिमंत्री हे नाशिक जिल्ह्यातील व महसूलमंत्रीही जवळच्याच जिल्ह्यातील असतांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याची खंत इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधी विमा कंपनीला धारेवर धरत असल्याच्या बातम्या केवळ दिखावा तर नाहीना असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. इगतपुरी तालुक्यातील भात पिकाला आधीच कवडीमोल भाव मिळत असल्याने लागवड खर्चही निघत नाही. त्यातच अवकाळी पावसाने पिकांचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला असुन शेतकरी हितासाठी लढत असल्याचे चित्र निर्माण करणाऱ्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी बाबतही शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून कृषिमंत्री व महसूलमंत्री यांना याबाबत अवगत करणार असल्याचे सांगण्यात आले. विमा कंपनीबाबत कडक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवुन दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षीचा विमा मंजूर करण्यास भारती एक्सा  विमा कंपनी टाळाटाळ करत आहे. याही वर्षी अवकाळीची जैसे थेच परिस्थिती असतांना विमा कंपनी टाळाटाळ करत आहे. कंपनी जबाबदारी झटकत आहे. याविरोधात याचिका दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू असुन लवकरच आंदोलनही छेडले जाईल.
- बाळासाहेब आमले, तालुका उपाध्यक्ष भाजपा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!