करिअर, विद्यार्थी आणि पालकांची जबाबदारी

लेखन : डॉ. कल्पना नागरे, मानसशास्त्रज्ञ

मुलांचे पालक होणे खूप सोपे परंतु एक जबाबदार पालक होणे तितकेच कठीण असते. पालकांचे आपल्या मुलांवर निःसंशय  प्रेम असते. आपल्या मुलांना जे जे शक्य होईल ते देण्यासाठी प्रत्येक पालक जिवाचा आटापिटा करीत असतात. मुलांचे संगोपन करताना पालक स्वतःच्या आवडीनिवडी विसरून मुलांचे कोडकौतुक करणे, हट्ट पुरविण्यात जीवनाचे सार्थक, परमसुख मानतात. आपल्याला जे सुख मिळाले नाही तेच सुख मुलांना मिळाले पाहिजे असा पालकांचा दृष्टिकोन दिसून येतो. मुलांच्या सर्व गरजा हट्ट पुरविले म्हणजे तुमची पालकत्वाची जबाबदारी पुर्ण झाली असा त्याचा अर्थ होत नाही. कारण बर्‍याच पालकांना  प्रश्न असतो की मुले का बिघडतात ? खरंच मुले बिघडतात का? याचे उत्तर असे देता येईल की पालकांच्या दुर्लकसमुळे मुलांना योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही याचा परिणाम मुले भरकटतात. पालकांनी मुलांना ज्या ज्या वेळी ते चुकतील, गोंधळतील त्या त्या वेळी त्यांना योग्य समजून सांगणे आवश्यक आहे.

आजच्या स्पर्धेच्या वातावरणात मुलांवरील ताण प्रचंड वाढले आहेत. याचा परिणाम म्हणूनच आज मुलांमधील आक्रमकता, अस्वस्थता, एकटेपणा, न्यूनगंड अशा गोष्टी वाढताना दिसतात. लहानपणापासून इंटरनेट, टीव्हीवरील नको असलेल्या गोष्टी बघण्यामुळे अगदी सुसंस्कारित व सुसंस्कृत घरातील मुले वाईट मार्गाला जाण्याचे प्रमाण वाढल्याने याची पालकांना काळजी वाटत आहे. मुले लहान असो की मोठी त्यांना योग्य काय अयोग्य काय हे समजून सांगण्याची गरज असते. तीच जबाबदारी पालकांनी पार पाडली नाही तर मुले भटकतात आणि चुकीचे पाऊल उचलतात. असे होऊ नये यासाठीच आम्ही काहीं खास टीप्स देत आहोत.

१. पालकत्वाची जबाबदारी दोघांची
अनेक घरांमध्ये मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी फक्त आईकडेच असते. इतकेच काय शाळेतील पालक मिटींगला आईच हजेरी लावते. लक्षात घ्या मुले दोघांची आहे. मुलांच्या व्यक्तीमत्व विकासात आई वडील दोघांचीही भूमिका महत्वपूर्ण आहे हे लक्षात घ्या. केवळ हव्या त्या वस्तू देऊन तुमची जबाबदारी संपत नाही तर मुलांचा अभ्यास, पालक मिटिंग यात दोघानी सहभागी व्हावे. त्यांच्या अभ्यासाच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात.

२. अति लाड करु नका
बरेच पालक मुलांनी काही मागण्याचा अवकाश की लगेच ती वस्तू हातात देतात. भलेही ती कितीही महाग असो. याचा परिणाम असा होतो की मुलांचे दिवसेंदिवस हट्ट वाढत जातात. पालकही ते पुर्ण करीत जातात. काहीच कष्ट न घेता अगदी सहजपणे सर्वच गोष्टी मिळत असतील तर मुलांना त्या वस्तूचे आणि पैशाचे महत्व कळेनासे होते. कष्ट करण्याची प्रवृत्तीही निर्माण होत नाही म्हणून मुलांना आवश्यक त्या आणि गरजेच्याच वस्तू उपलब्ध करून द्या. त्याच बरोबर पैशाचे महत्व आणि तो मिळविण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे देखील त्यांना समजून सांगा.

३. शिस्त आणि शिक्षा समन्वय
व्यक्तिमत्व विकासासाठी शिस्त लावणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु मुलांनी केल्यास एखादी चूक केल्यास त्या चुकीच्या वर्तनाला शिक्षा देणे गरजेचे आहे. ( येथे शारिरीक शिक्षा अपेक्षित नसून त्याऐवजी इतर अनेक प्रकारे शिक्षा करता येईल. जास्तीचे काम करणे. कान पकडून उठबशा काढणे आदी ) प्रत्येक वेळी केलेल्या चुकीच्या वर्तनाला शिक्षा केली पाहिजे. कधी शिक्षा तर कधी दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे शिस्तीचा अतिरेक सुद्धा नको. शिस्तीच्या नावाखाली शारीरिक शिक्षा, अपशब्द वापरू नका. यामुळे मुले भित्री बुजरी होतील किंवा बंडखोर आक्रमक होतील. थोडक्यात हसत खेळत शिस्त लावा.

४. पारितोषिक आणि प्रशंसा
जसे चुकीच्या वर्तनाला शिक्षा देणे गरजेचे आहे तसेच योग्य वर्तनाला पारितोषिक देणे गरजेचे आहे. यामुळे मुलांना चांगले काम करण्याचा हुरूप येतो. मुलांना अभ्यासाच्या दृष्टीने प्रेरित करण्यासाठी पारितोषिक आणि प्रशंसा करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा केली तर मुले चांगल्या काम करण्यासाठी प्रेरित होतील.

५. वयात येणारी मुले
वयात येताना किशोर मुला मुलींमध्ये अनेक शारिरीक आणि मानसिक बदल होत असतात. विरुद्ध लिंगी व्यक्तींविषयी आकर्षण वाटतं असते. मुले भावनिक गोंधळलेली असतात। त्यामुळे आईने मुलीला आणि वडिलांनी मुलाला या बदलाविषयी मोकळं बोलले पाहिजे. हे बदल नैसर्गिक आहेत हे लक्षात आणून दिले पाहिजे. जेणेकरून मुले भरकटणार नाहीत.

६. स्वातंत्र्य
मुलाना काही बाबतीत स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे. परंतू मुलं तरुण होण्याच्या वाटेवर असताना त्यांना एकदम स्वातंत्र्य देवून चालत नाही. ते स्वातंत्र्य क्रमाक्रमानं देणं व त्याची जबाबदारी घ्यायला लावणं. ही प्रक्रिया करायची असेल तर पालकाच्या मनातली भूमिका स्पष्ट हवी. माझं मूल हे जरी माझे काही गुणधर्म घेऊन जन्माला आलं असलं व त्याच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर असली तरी व्यक्ती म्हणून त्याच्या वेगळेपणाचा आदर मला करायला हवा. मुलाचे सगळे विचार सगळं वागणं माझ्या सारखे असेलच असे नाही. त्याची स्वतःची सुद्धा मते असू शकतात. एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणूण मुलांकडे बघा.

७. पालकांचे सुसंगत वर्तन
मुले म्हणजे आरसा आहे. पालकांचे स्वतःचे प्रतिबिंब त्यात दिसणार आहे. मूल आपले आहे. त्याचा स्वभाव, आवडनिवड इत्यादी गोष्टींचा विचार करता असे वाटते, की रात्री झोपण्यापूर्वी पालकांनी आपल्या दिवसभराच्या वागण्याचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, बोलण्यात वागण्यात योग्य-अयोग्य काय याचा स्वतःच विचार करावा. आपल्या वागण्या-बोलण्यातून मुलांवर चांगले संस्कार झाले का ? आपण वडील माणसांशी आदराने वागलो का ? माझ्यात काही बदल करणे गरजेचे आहे का इत्यादी गोष्टींचा विचार केला पाहिजे.

८. सकारात्मक विचारसरणी
पालकांची सकारात्मक विचारसरणी मुलांना परीक्षेसाठी आणि करिअर निवडीसाठी आत्मविश्वास आणि प्रेरणा देते. वर नमूद केल्याप्रमाणे मूलेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणूण विकसित होत असतात. त्यांच्या आवडी निवडी वेगळ्या असू शकतात. त्यांचा आदर करणे आवश्यक आहे. तुमच्या मुलाच्या प्रती अपेक्षा असू शकतात. त्यांची कुवत नसेल तर त्या लादण्याचा प्रयत्न करु नका. त्यांना त्यांच्या क्षमतेनुसर करिअर करायचं असेल तर त्यासाठी पाठिंबा द्या. जेणे करून ते आत्मविश्वासपूर्वक पुढे जाऊ शकतात.

९.  संगत आणि मित्र
आई वडील शाळा, शिक्षक यांच्या इतकेच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात त्यांच्या मित्रपरिवार महत्त्वाची भूमिका असते. विशेषतः मुले वयात येताना त्यांच्या मित्र परिवार त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष प्रभाव टाकतो. म्हणून आपल्या मुलांची संगत आणि मित्रपरिवार यांच्याबद्दल पालकांनी वेळोवेळी माहिती घेणे आवश्यक आहे. कारण चांगल्या घरातील मुले देखील बिघडतात केवळ संगतीमुळे. म्हणूनच आपल्या मुलांना कोणाची संगत आहे ते बघणे पालकांची जबाबदारी आहे.

याशिवाय पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले तर मूले मोकळेपणाने बोलू शकतील. घरातील वातावरण हसत खेळत असेल तर मुलांच्या मानसिक विकासाला ते पूरक ठरते. आपले मूल हे उद्याचे जबाबदार नागरिक आहे या दृष्टिकोनातून पालकांनी मुलांना घडवले पाहिजे. सर्वच निर्णय स्वतः घेतले तर मूले तुमच्या वरच अवलंबून राहतील. त्यांनाही निर्णय घेता आले पाहिजे. सुरुवातीचे निर्णय चुकू शकतात. हरकत नाही पण चुकांमधून ते नवीन अनुभव शिकतील.

( लेखिका बाल मानसशास्त्रज्ञ असून त्यांचे विविध विषयांवर पुस्तके प्रसिद्ध आहेत. 9881849578 ह्या क्रमांकावर त्यांना संपर्क साधता येईल. )