यंदा टोमॅटो लागवड वाढेल की घटेल ?

आवक घटली ; दर स्थिर

लेखन - ज्ञानेश उगले, कृषितज्ज्ञ/ कृषी पत्रकार
सह्याद्री फार्म्स, मोहाडी, जि. नाशिक

राज्यातील नगर जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अखेरच्या टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. तरी तो ऑगस्ट अखेरपर्यंत चालेल. संगमनेर बाजार समितीत दररोज टोमॅटोच्या 500 ते 600 क्रेट तर जुन्नर ( नारायणगाव ) बाजार समितीत 2000 क्रेटच्या आसपास आवक होत आहे. मागील आठवड्यात या दोन्ही बाजार समित्यांत प्रति 20 किलोच्या क्रेटला 100 ते 200 व सरासरी 150 रुपये दर मिळाला. एकंदर एप्रिल महिन्याच्या तुलनेत आवकेत व दरात निम्म्याने घसरण झाली आहे.
राज्यातील नगर जिल्ह्याप्रमाणेच कर्नाटकातील बंगळुरु भागातील टोमॅटो हंगाम जोरात सुरु आहे. येथील चिंतामणी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढती आहे. हा सर्व माल कर्नाटकासह दिल्ली, उत्तर भारत व जम्मू काश्‍मीर या भागात पाठवला जातो

हिमाचल प्रदेशातील सोलन मंडी भागातील टोमॅटोची आवक नुकतीच सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील महत्वाच्या बाजारपेठेत आवक वाढली आहे.  बाजारात टोमॅटोला क्रेटला 100 ते 200 रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. राज्यातील नगर भागातील हंगाम ऑगस्ट पर्यंत चालेल. त्यानंतर नाशिकच्या पूर्व भागातील हंगामातील सप्टेंबर पासून सुरु होईल. दरम्यान ऑक्टोबर पासून पश्‍चिम भागातील हंगाम सुरु होईल. हा हंगाम साधारणपणे मार्च 2022 पर्यंत चालतो.

फ्रेश, निर्यात तसेच प्रक्रियेला मागणी

भारताच्या विविध भागात टोमॅटो हे पिक तसे वर्षभर होत असते. त्यात महाराष्ट्र , कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश ही आघाडीची राज्ये आहेत. भारतीय ग्राहकांकडून फ्रेश टोमॅटोला सातत्याने मागणी होते. त्या शिवाय भारता लगतच्या देशांमधून टोमॅटोला मागणी होते. त्यातील बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ हे महत्वाचे आयातदार देश आहेत. या शिवाय प्रक्रिया उद्योगांकडूनही टोमॅटोला मोठी मागणी होते. मागील काही वर्षांपासून देशभरात तसेच बाहेरील देशांतूनही प्रक्रियेसाठी टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ‘सह्याद्री फार्म्स, वरुण ॲग्रो, गोंग्लू अशा कंपन्या यात आघाडीवर आहे. त्यामुळे बाजारात स्पर्धा होण्यास व टोमॅटोचे दर टिकून राहण्यास फायदा होतांना दिसत आहे.

कोरोना काळात उठाव वाढला

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर मागील वर्षीच्या हंगामात टोमॅटोचे दर टिकून राहीले. अगदी कोरोनाच्या काळातही टोमॅटोचा उठाव कायम राहिला. याचा परिणाम यंदाच्या हंगामातील उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्याच चांगला पाऊस झाला. त्यामुळे टोमॅटो लागवडीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचा हुरुप वाढला. परिणामी जून महिन्यात नाशिकच्या बहुतांश भागात टोमॅटो लागवडीस जोर आला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिली. त्यानंतरच्या काळात लागवडीची गती मंदावल्याचे दिसते. जून मध्ये टोमॅटो लागवडीसाठी उत्पादकांनी जोरदार आघाडी घेतली. जी लागवड मागील वर्षीच्या या महिन्याच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी जास्त झाल्याचे नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो रोपे पुरवणाऱ्या रोपवाटिकाधारकांचे म्हणणे आहे. मात्र जुलै मध्ये पुन्हा लागवड मंदावल्याचेही चित्र आहे. ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि बॉर्डर…

बांग्लादेशातून होणारी मागणी, पाकिस्तानची बॉर्डर खुली होणे तसेच पावसाची स्थिती या बाबींचा टोमॅटोच्या मार्केटवर दरवर्षी मोठा परिणाम होतो. येत्या काळात याबाबत अनुकूल स्थिती असेल टोमॅटोचे दर चांगले राहतील. अन्यथा बाजारभाव सध्याच्या प्रमाणात स्थिर राहतील असाच टोमॅटो व्यापाऱ्यांचा कयास आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!