इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
भारत निवडणूक आयोगाद्वारे १ नोव्हेंबर २०२२.या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. ही नोंदणी १ ऑक्टो ते ७ नोहेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. पदवीला १ नोहेंबरला ३ वर्ष पूर्ण होणाऱ्या पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन पदनिर्देशित सहाय्यक मतदार नोंदणी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी तेजस चव्हाण यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे १४ जुलै २०२२ च्या पत्रानुसार १ नोहेंबर, २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासाठी विविध शासकीय, निमशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका आदी ठिकाणी जागृती सुरु आहे. यासाठी तहसील कार्यालय इगतपुरी इथे ह्या मतदार नोंदणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांची उपविभागीय अधिकारी इगतपुरी तेजस चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली.
पदनिर्देशित सहा मतदार नोंदणी तथा तहसीलदार परमेश्वर कासुळे, नियुक्त पदनिर्देशित अधिकारी, नायब तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांना संपूर्ण पदवीधर मतदार यादीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. १ ऑक्टोंबर ते ७ नोहेंबर २०२२ पर्यंत ही नोंदणी चालणार आहे. १ नोव्हेंबर पूर्वी किमान 3 वर्ष पदवी प्राप्त करणे बंधनकारक असून साधारण रहिवास हा मतदारसंघात असणे आवश्यक आहे. पात्र व्यक्तीने यासाठी नमुना नंबर १८ परिपूर्ण भरून त्यासोबत रहिवास, पदवी प्रमाणपत्र आदी जोडलेली कागदपत्रे पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडून अधिप्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. अधिप्रमाणित करून घेतलेला नमुना नंबर १८ हा आपण राहत असलेल्या कार्यक्षेत्रातील मंडळ अधिकारी कार्यालय येथे जमा करणे आवश्यक आहे. यासाठी इगतपुरी तालुक्यातील ६ मंडळ अधिकारी कार्यालय येथे मतदार नोंदणी स्विकृती केंद्राची स्थापना केलेली आहे. जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी नमुना नंबर १८ भरून पदवीधर मतदार नोंदणी करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी इगतपुरी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, निवडणूक शाखा इगतपुरी यांनी इगतपुरी तालुक्यातील जनतेला केले आहे.