बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालिकेच्या वारसाला ५ लाखांची भरपाई

माजी सभापती जया कचरे यांच्या हस्ते धनादेश वितरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

२२ जूनला इगतपुरी तालुक्यातील काननवाडी खेड येथील ३ वर्षीय बालिका गौरी गुरुनाथ खडके हिच्यावर बिबट्याने  हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. ह्या घटनेमध्ये संबंधित परिवाराला तातडीने नुकसानभरपाई द्यावी यासाठी पंचायत समितीच्या माजी सभापती जया कचरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार आज मृत बालिकेच्या वारसाला वन खात्याकडून ५ लाखांची नुकसानभरपाई देण्यात आली. माजी सभापती जया कचरे यांच्या हस्ते भरपाईचा धनादेश वारसाला सुपूर्द करण्यात आला.

गेल्या महिन्यात गौरी खडके हिला बिबट्याने जंगलाच्या दिशेने ओढून नेले. ही सर्व घटना मुलीचे आईवडील, आजोबा यांच्या समक्ष घडली असता त्यांनी आरडा ओरडा केला. पाठलाग केल्याने बिबट्याने काही अंतरावर गुरतुलेच्या झुडपात बालिकेला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. गंभीर जखमी बालिकेवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.

ह्या बालिकेच्या वारसाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी सभापती जया कचरे, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ कचरे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू आगीवले, जगन मानकर आदींनी पाठपुरावा केला. आज संबंधित वारसाला ५ लक्ष नुकसानभरपाईचा धनादेश माजी सभापती जया कचरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी, वन परिमंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!