कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
९४१५११७३७ / ७०८३२३४०२१
पंढरीच्या रे विठ्ठला,
मूर्ती तुझी रे सावळी !
भोळ्या भक्तांना रे तुझ्या,
कोण सांग रे सांभाळी !!
थांबवनां देवा आता,
नियतीची क्रुर खेळी !
तरण्या बांड पोरांचा,
जीव जातोया अवेळी !!
कोरोना विषाणू देवा,
लोकं मारतोया भोळी !
लाटेवरी लाट येता,
जीव जातायरे बळी !!
शेतां मधी राबतोया,
रात्रं दिन तुझा बळी !
ढेकळात काळ्या राना,
देतो औताची रे पाळी !!
बाळ गोपाळांची देवा,
कोरोनाने केली होळी !
कीव कर त्यांची देवा,
बांधू नको त्यांची मोळी !!
घेण्या शिक्षण पोरांना,
वाट कर तू मोकळी !
कोरोनाच्या सावटाने,
वाट लागली सगळी !!
शाळा खोली छप्पराला,
लागे कोळ्यांचीरे जाळी !
पोरांविना शाळा खोली,
दिसू पाहे नारे खुळी !!
कष्टकऱ्या मानवाची,
श्रद्धा आहे नारे भोळी !
नित्य नियमाने देवा,
गातो तुझी रे भूपाळी !!
दारापुढे उभी दिसे,
कोरोनाची क्रूर फळी !
पण करु यारे सारे,
तोडू कोरोना साखळी !!
लसीची रे घेऊ मात्रा,
अष्टगंध लाऊ भाळी !
कोरोनाच्या यमदूता,
धाडू आता रे आभाळी !!
( कवी जी. पी. खैरनार हे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक असून ते नामवंत लेखक आणि कवी आहेत. )