वाढोली सोसायटीत गैरमार्गाने कर्जवाटप : गोकुळ महाले यांनी गैरमार्गाने कर्ज घेत केली शासनाची फसवणूक

संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : इगतपुरीच्या सहाय्यक निबंधकांकडे पुराव्यांसह केली तक्रार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

सातबारा उताऱ्यावर नाव नसतांनाही वाढोली ता. त्र्यंबकेश्वर येथील गोकुळ सुदाम महाले याने गावाच्या सोसायटीकडून शेतीसाठी कर्ज काढले. वडील सुदाम हनुमंता महाले यांनी सोसायटीच्या संचालकपदाचा दुरुपयोग करून ह्या कर्ज प्रकरणाला मदत केली. विशेष म्हणजे शासनाची व्याजमाफी आणि कर्जमाफी योजनेत हे कर्जप्रकरण बसवून कर्जमाफी सुद्धा घेण्यात आली. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर अवघा ६ गुंठे क्षेत्राचा अन्य सातबारा उतारा असतांना नियमबाह्य मार्गाने महाराष्ट्र शासनाची फसवणूक करण्यात आली. ह्या प्रकरणी संबंधित गोकुळ महाले, तत्कालीन संचालक सुदाम महाले आणि सर्व संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी बाळू महाले, दिनकर महाले यांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहकारी संस्थांचा कारभार इगतपुरी येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी इगतपुरीच्या सहाय्यक उपनिबंधकांकडे आज तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची चौकशी करून कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

तक्रार अर्जात नमूद माहिती अशी आहे की, वाढोली ता. त्र्यंबकेश्वर येथील गट क्रमांक ३२४/२ ही जमीन सख्खे भाऊ आणि बहिणी यांच्या नावावर आहे. यापैकी सुदाम हनुमंता महाले यांचे नाव ह्या सातबारा उताऱ्यावर दाखल आहे. ते २०१४-१५ काळात वाढोली सोसायटीच्या संचालकपदावर होते. ह्या जमिनीवर संमती न घेता कोणतेही कर्ज देऊ नये याबाबत इतरांनी सोसायटीला पत्र देऊन कळवलेले आहे. असे असतांना तत्कालीन संचालक सुदाम महाले यांनी पदाचा दुरुपयोग केला. याबाबत इतर सहधारकांना नुकतेच समजले. त्यानुसार ह्या सातबारा उताऱ्यात नाव नसतांना गोकुळ महाले याला १ लाख २० हजारांचे शेतीसाठी बोगस कर्ज देऊन कर्जाचा ५ लाखांचा बोजा सुद्धा चढवण्यात आला. ही गंभीर बाब लक्षात आल्याने तक्रार अर्ज केल्याचे तक्रारदार शेतकऱ्यांनी म्हटले आहे. संबंधित गोकुळ महाले याच्या नावावर वाढोली येथे अवघ्या ६ गुंठे क्षेत्राचा उतारा असतांना कर्ज देण्यात आल्याने सोसायटीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वाढोली येथील गट क्रमांक ३२४/२ ह्या सातबारा उताऱ्यावर गोकुळ सुदाम महाले याचे नाव दाखल नसतांना कर्ज घेतेवेळी इतर कोणत्याही सहधारकांची कोणत्याही प्रकारे संमती घेतलेली नाही. कर्जाच्या नियमाप्रमाणे २० गुंठ्यांपेक्षा जास्त क्षेत्र असेल तरच संस्था कर्ज देत असतात. सुदाम महाले यांनी स्वताच्या संचालक पदाचा दुरुपयोग केल्याचे दिसून येते. मुलगा गोकुळ महाले याच्या नावावर संस्थेची फसवणूक करून १ लाख २० हजारांचे बेकायदा कर्ज उचलून सुद्धा गंभीर गुन्हा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख ३ टक्के व्याज सवलत योजना सुद्धा राबवण्यात आली. २०१७ मध्ये हे कर्ज महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत बसवून कर्जमाफी सुद्धा घेण्यात आली. बोगस कर्जदार गोकुळ महाले याने संचालक असणारे वडील सुदाम महाले यांच्या संगनमताने १ लाख ४५ हजार ७७७ रुपयांची कर्जमाफी योजना लाटली.

वाढोली सोसायटी संचालक पदाचा दुरुपयोग करून सुदाम महाले यांनी सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन आणि सहकारी संस्था अधिनियम आदींचे उल्लंघन केले आहे. त्यांचा मुलगा गोकुळ महाले सातबारा उताऱ्यात शेतकरी नसतांना त्याच्या नावे कर्ज उचलून शासन आणि इतर यंत्रणांची फसवणूक केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असून याप्रकरणी तातडीने चौकशी होवून सबंधित संचालक सुदाम महाले, बोगस शेतकरी गोकुळ महाले आणि इतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे असे तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबत आवश्यक ते सर्व पुरावे तक्रार अर्जाला जोडण्यात आले आहेत.

१५ दिवसांच्या आत गोकुळ महाले, सुदाम महाले आणि इतर संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता इगतपुरीच्या उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तक्रारीची प्रत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, सहकारमंत्री, कृषिमंत्री, विरोधी पक्षनेते विधानसभा /विधानपरिषद, कृषी आयुक्त, आमदार हिरामण खोसकर, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त, विभागीय सहनिबंधक सह संस्था, जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक सह संस्था, उपविभागीय अधिकारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, तहसीलदार त्र्यंबकेश्वर, पोलीस निरीक्षक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर आदींना पाठवण्यात आली आहे.