दशकापासून बंद असणारा नाशिक साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत

नाशिक सहकारी साखर कारखाना एका दशकापासून बंद आहे. त्यामुळे ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर ह्या चार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. ह्या चार तालुक्यात लाखो टन उसाचे उत्पादन आजही घेतले जाते. मात्र ह्या चारही तालुक्यांना साखर कारखान्याचा पर्याय आजमितीला उपलब्ध नाही. यासह नाशिक सहकारी साखर कारखाना चालू होईल की नाही अशी शक्यता दिसत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घ्यायचे की नाही ? असा यक्ष प्रश्न ऊस चारही तालुक्यातील उत्पादक शेतकरी यांच्या समोर उभा राहिलेला आहे.
शेतीतील अर्थशास्त्र अभ्यासले तर अनुषंगिक बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे असे म्हणतात की, सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत एकच पीक घेतले तर बाजारात त्या पिकाचा पुरवठा वाढून मागणी कमी होईल. परिणामी पिकांचे भाव कोसळतील. त्याकारणाने सर्वच शेतकरी तोट्यात येऊ शकतात. त्याकरिता शेतीतील पिकांचा समतोल साधने ही शेतीच्या अर्थशास्त्रानुसार अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळेच बागायती पिके, भाजीपाला वर्गीय पिकांना भाव मिळण्यासाठी ऊसाची पिके घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. यामुळेच शेतीमध्ये समतोल साधला जाईल. अन्यथा ऊस शेती झाली नाही तर,इतर पिके धोक्यात येऊ शकतात.
उल्लेख केलेल्या चारही तालुक्यातील शेतकरी उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो ऊस विकायचा कुठे ? हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. वास्तविक पाहता इगतपुरी अन त्र्यंबकेश्वर हे आदिवासी तालुके आहेत, मात्र काळाच्या ओघात अन बदलत्या परिस्थितीला सामोरे जात ह्या दोन्हीही तालुक्यातील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात बागायती पिके, ऊसाचे उत्पादन घेत आहे. मात्र साखर कारखाना नसल्याने अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत.
सध्याच्या काळात नाशिक साखर कारखाना सुरू होण्याची कुजबुज वाढली आहे. हा महत्त्वपूर्ण साखर कारखाना सुरू करण्यासाठी यापूर्वी सुद्धा बरेच प्रयत्न झालेत. मात्र कारखाना काही सुरू झाला नाही. त्यामुळेच आताही हा कारखाना सूरु होण्याची शेतकऱ्यांना आशा वाटत नाही. मात्र इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात ज्याप्रमाणे ह्या राज्याचे महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांनी एसएमबीटी रुग्णालय उभारले. यामुळे तालुक्याच्या बरोबरच इतरही तालुक्याचा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासह इतरही विकास साधला गेला आहे. त्याच प्रकारे ह्या भागात ह्याच नेतृत्वाने नवीन साखर कारखाना मग तो खाजगी अथवा सहकारी उभारला तर ह्या  तालुक्याबरोबरच पाच ते सहा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकेल. ह्या भागाचा अधिकाधिक विकास यामुळे साधला जाऊ शकतो. ह्यासाठी गरज आहे राजकारण विरहीत दृष्टीची. तालुक्यातील राजकीय लोकांनी सुद्धा ना. बाळासाहेब थोरात, पालकमंत्री ना. छगन भुजबळ, कृषिमंत्री ना. दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्या बरोबरच इतर राजकीय वजनदार नेतृत्वाचा उपयोग योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. असे केले तर अन तरच येथील शेतकऱ्यांना भविष्य असेल. अन्यथा येथील शेतकऱ्यांच्या नशिबात भविष्यकाळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. सारांश इतकाच की चार तालुक्यातील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मनापासून प्रयत्न करून शेतकऱ्यांचा दशकभराचा आक्रोश संपवावा असे वाटते.

श्री. विठोबा दिवटे पाटील, नांदूरवैद्य
( लेखक शेती विषयातील अनुभवसिद्ध तज्ञ असून घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निरीक्षक पदावर काम पाहतात. )

श्री. विठोबा दिवटे पाटील, नांदूरवैद्य