इगतपुरीतील डॉ. सचिन मुथा व डॉ. राखी मुथा यांच्याकडून पत्रकार संघाला विविध साहित्याची मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. 21 ( वाल्मिक गवांदे, इगतपुरी )

कोरोनाच्या भयावह परिस्थीतीत मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे डॉ. सचिन मुथा व डॉ. राखी मुथा हे दाम्पत्य इगतपुरीत ओळखले जाते. त्यांनी स्वखर्चाने इगतपुरी शहरातील पत्रकार संघाच्या सभासद पत्रकार बांधवांना मास्क, सॅनिटायझर, होमोपॅथीक गोळया व ऑक्सीजनचे वाटप केले. रामनवमीच्या अनुषंगाने पत्रकार संघाला मोफत मास्क, सॅनिटायझर, होमोपॅथीक गोळयाचे वाटप करीत शहरातील धनिक व लोकप्रतिनिधींना चांगलीच चपराक दिली.
डॉ. मुथा दाम्पत्य हे गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीच्या काळातही अविरत रुग्ण सेवा देत होते. त्यांनी पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक, पत्रकार आदी फ्रंट लाईन वर्कर यांना होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम औषधाचे १ लाख गोळ्यांचे महाराष्ट्रातील विविध भागात वाटप केले. यासह गरजू व गरीब नागरिकांना मोफत सेवाही दिली.
अचानक कोरोनाची पहिल्या लाटे पेक्षाही भयावह अशी दुसरी लाट आली असुन यात ऑक्सिजनची अत्यंत गरज भासू लागली. समाजसेवेच्या ध्येयाने वेड्या झालेल्या या दांपत्याने देणाऱ्याने देत जावे व घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे या उक्तीप्रमाणे चक्क २६ स्वयंचलित ऑक्सिजन यंत्र व १० ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतले. यात त्यांना सदर यंत्र घ्यायला पैसे कमी पडत असताना त्यांनी आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून पैसा उभा करून यंत्र विकत घेतले. हे यंत्र ते गरजू रुग्णांना फक्त अनामत रक्कम घेऊन नाममात्र भाड्याने उपयोगासाठी देत आहेत.
तालुक्यातील डॉक्टर, व्यापारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी डॉ. मुथा दांपत्यांचा आदर्श घ्यावा असे मत शहरातील नागरीकांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे, राजेंद्र नेटावटे, राजु देवळेकर, वाल्मीक गवांदे, शैलेश पुरोहित, सुमित बोधक, सुनिल तोकडे, शरद धोंगडे, गणेश घाटकर आदी पत्रकार उपस्थित होते.