इगतपुरीनामा न्यूज ता. ८ : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून २७२९ फूट उंच आहे. नाशिक शहर हे प्राचीन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणू बंदरात उतरलेला माल जव्हार – गोंडाघाट – अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, बसगड ( भास्करगड ), हर्षगड, रांजणगिरी, अंजनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
रांजणगिरीच्या दक्षिण टोकाला असलेल्या सुळक्याचा आकार रांजणासारखा असल्यामुळे या किल्ल्याला “रांजणगिरी” हे नाव पडले असावे.
आज शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था यांची पंचविसावी दुर्गसंवर्धन मोहीम रांजणगिरी किल्ला येथे घेण्यात आली. प्रथम किल्ल्यावरील काही ठिकाणचा रस्ता घसरगुंडी सारखा असल्यामुळे टिकाव फावडे यांच्या सहाय्याने पायऱ्या करण्यात आल्या. त्यानंतर किल्ल्यावर दोन पाण्याच्या टाक्या आहे. त्यातील पाण्याच्या टाकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दगडं पडलेली होती ती दगडं हातोडा व पाहरीच्या सहाय्याने फोडून वरती काढण्यात आली. त्यानंतर तळाला असलेला मोठा गाळ व माती काढण्यात आले. जवळजवळ फूट खोली मिळाली. सर्व मावळ्यांनी मिळून कमीत कमी दोन ते अडीच ट्रॅक्टर माती व धडे बाहेर काढले. यामुळे पावसाळ्यामध्ये टाकीमध्ये जास्तीत जास्त पाणी साचून वन्यजीवांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होईल. तसेच संस्थेमार्फत लावण्यात आलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी टाक्यातल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येईल. या मोहिमेसाठी श्याम गव्हाणे, बाळू शिंदे, पुरुषोत्तम रहाडे, सोमनाथ गव्हाणे, मदन मुठाळ विजय महाले, राम दाते, रवी राव, माधव पगार, कृष्णा पगार, पुनम शिंदे, स्वराज शिंदे, साहिल शिंदे या मावळ्यांनी अथक परिश्रम घेतले.