“शेतकरी “
वाह रे देवा मला तुम्ही जगाचा पोशिंदा केलं!
पण माझ्या नशिबी शेवटी दुख:च आलं!!
माझ्या कष्टानं सारं जग सुखी झालं!
पण ऐन दिवाळीत माझं कुटुंब मात्र उपाशी मेलं!!
घाम गाळूनी भेगाळलेल्या मातीलाही पाणी दिलं!
आशेचा एक किरण दिसताच सावकाराने मातीमोल केलं!!
दमडी दमडी गोळा करून पोटच्या पोरांना म्या शिकवलं!
हाडाचे काड झाल्यावर त्याने मला अनाथ घोषित केलं!!
आयुष्यभर मी दुसऱ्यासाठी जीवाचं रान केलं!
होत नव्हतं सगळं समाजासाठी दान केलं!!
नाही मागणार भीक तुझ्यापुढे असेल शरीरात प्राण!
फाटले कपडे,मोडला संसार तरी झुकणार नाही मान!!
गोठ्यातील लक्ष्मी आण दावणीची जोडी माझ्या घराची शान!
दगडाची चूल, कुडाचे घर आण दिव्यांचा उजेड यातच मला समाधान!!
तरी वावभर दोराने तू बांधली माझी मान!
गेल्यावरही खाता येत नव्हतं म्हणून केला माझा अपमान!!
माझ्या साठी रडले ते माझे सर्जा राजा!
समाजानी दिखावा म्हणून लावला मांगबाजा!!
हंबरुनी हाक मारती रानो वनी!
अश्रू ढाळुनी मागती देवा,परत दे माझा धनी!!
सुख दुख: गेला तरी नाही कोणालाही!
एक पोशिंदा गेला म्हणून सरकार पडणार नाही!
दुख: थोडे माझे कळले मुक्या प्राण्यां!
फक्त गरजेपुरताच मला जगाचा पोशिंदा म्हणा!!
सांग देवा इथे जगाच्या पोशिंद्याच्या घामाला मोल नाही!
धरणात जीव द्यायला पाणी पण खोल नाही!
कष्टाच्या फळासाठी दुष्काळात चोहीकडे आशेने भटकतोय!
मुर्दाड या समाजात जगाचा पोशिंदा झाडाला लटकतोय!!
….जगाचा पोशिंदा झाडाला लटकतोय !!!!!!!!!!!
- प्रकाश कवठेकर, इगतपुरी
( कवी इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ह्यामध्ये वापरलेले समर्पक छायाचित्र त्यांनी स्वतःच रेखाटलेले आहे. )
10 Comments